गोंधळ


ब्रह्मा: काय खुडबुड खुडबुड करतोस रे पोरा? आत्ता कुठे डोळ्यांना डोळे लागत होते, तर झाली तुझी खुडबुड सुरू. काय शोधतोस तरी काय? असे काय हरवले तुझे?

नारद: हे डोळ्यांना डोळे लागले काय म्हणतोस? डोळ्याला डोळा लागला म्हणतात रे सारे.

ब्रह्मा: अरे मी साऱ्यात येत नाही. पसाऱ्यात येतो समज. मी म्हणजे सगळ्या गोष्टींचा पसाराच पसारा. चार चार तोंडं. चार चार नाकं. आठ कान, चार जिभा, आठ ओठ, एकशे अठ्ठावीस दात. आठ डोळे. पसाराच पसारा. तुमच्यासारखं एका डोळ्याला दुसरा डोळा लागून मला झोप येत नाही. चार चार डाव्या डोळ्यांना चार चार उजवे डोळे लागल्याशिवाय झोप येत नाही. म्हणून डोळ्यांना डोळे लागणे म्हटले. तुला मराठी व्याकरण समजते ना? तुला समजत नाही असे नाही. पण वेड पांघरून पेडगावला जायची तुझी सवय. जात असतो तिथे पुन्हा पुन्हा. पण शोधतो काय ते तर सांग.

नारद: अगदी मनकवडा आहेस रे ब्रह्मा. अरे खरेच काल पेडगावला गेलो होतो. तुमसर गोंदिया जवळ आहे पेडगाव. तेथे गोंधळ सुरू होता. रमून गेलो त्यात. रात्रभर जागरण झाले. व्वा. मज्जा आली.

ब्रह्मा: अरे गोंधळ, जागरण यांनी काय मजा येते? शांत रात्री गाढ झोपणे म्हणजे मजा. चातुर्मासात मस्त चार महिने ताणून देण्यातला स्वर्गीय आनंद तुला काय माहीत? अगदीच नीरव शांतता नसायची म्हणा स्वर्गात सुद्धा. कारण चातुर्मासात आम्ही देव झोपलेले मानवांना पाहवत नाही. ते टाळ्या, ढोल, ताशे वाजवत मोठ्या आवाजात सकाळ संध्याकाळ गजर आरत्या सुरू करतात. पण दूर असल्यामुळे स्वर्गापर्यंत आवाज तसा कमीच पोहोचायचा म्हणा. भुंगा, डास यांची गुणगुण समज. तरीपण झोप चाळवायची मधनमधून. पण तुला गोंधळात, जागरणात कशाची बोडख्याची मजा येते रे?

नारद: ब्रह्मा, तू नं आता अगदी ब्रह्मपुरीची अस्सल भाषा बोलायला लागला. ब्रह्मपुरी म्हणजे तुझी ती वरची, आकाशातली नाही. ती नेवजाबाई हितकारिणी की काय त्यांचे काॅलेज जेथे आहे ती ब्रह्मपुरी. काय टवळं काय, टाळकं काय, बोडखं काय! शी! त्यापेक्षा पेडगावचा गोंधळ बरा होता.

आम्ही अंबेचे गोंधळी
हो आम्ही अंबेचे गोंधळी
हो आम्ही आईचे गोंधळी
जगदंबेचे गोंधळी
तुळजाईचे गोंधळी
रेणुकाईचे गोंधळी
हो आम्ही अंबेचे गोंधळी
हो

अगदी भिनून गेला रे कालचा गोंधळ कानात.

ब्रह्मा: मुनी, फक्त काय शोधता एवढं विचारलं. तुम्ही कीर्तन सुरू केलं. कठिण आहे. शाळा कॉलेजात असे शिकवाल तर कसे होईल? त्या लैजाबाई झिडकारिणी कॉलेजात मराठी शिकवून पहा म्हणजे कळेल. दोन दिवसात नोकरी जाईल.

नारद: लैजाबाई नाही, नेवजाबाई. झिडकारिणी नाही हितकारिणी. हितकारिणी म्हणजे हित करणारी संस्था. ब्रह्मपुरी ला विद्यार्थ्यांच्या हितासाठी, त्यांना योग्य शिक्षण मिळावे म्हणून स्थापिलेली संस्था. खूप गोंधळ असतो ब्रह्मा तुझा शब्दांच्या बाबतीत. अरे नुसते शब्द नाहीत ते, शब्दब्रह्म असतात ते. देवाचे रूप. असेच वापरू नयेत. देवांच शरीर ते. ‘शब्द ब्रह्म, परब्रह्म भार्गेम्याम् शाश्वती तनु ।’ असे उगाच का भागवतात सांगितले आहे?

चैतन्यं सर्व भूतानाम् शब्द ब्रह्मेति में मतिः । तत्प्राप्य कुण्डली रूपं प्राणिनाम् देह मध्यगम् ॥
अरे, समस्त प्राण्यांमधे असणारा प्राण म्हणजे शब्द. शब्द म्हणजे नुसता नाद नव्हे. नुसती कुकरची शिट्टी नव्हे. नुसता टाळीचा आवाज नव्हे. नुसती चुटकी नाही काही. नुसता गोंधळ असतो तुझा शब्दांच्या बाबतीत.

ब्रह्मा: ठीक आहे. दाटू नको. चिडू नको. काळजी घेईन पुढे. पण माझा हा शब्दांच्या बाबतीत होणारा गोंधळ, अन् तुझा कालचा रात्रीचा पेडगावचा गोंधळ यातही गोंधळच आहे किनई? तू म्हणतो तो गोंधळ आणि मी केलेला शब्दांचा गोंधळ वेगळा  असावा असे मला वाटते. हो किनई?

नारद: छान! अगदी बरोबर. म्हणजेच शब्द हा नुसता ध्वनी नव्हे. ध्वनी हे फक्त त्याचे शरीर. अर्थ हा त्याचा प्राण. 

आम्ही शब्दांचे गोंधळी
हो आम्ही भाषेचे गोंधळी
मायबोलीचे गोंधळी
हो मायभाषेचे गोंधळी
कंठ ओठांचे गोंधळी
जीभ दातांचे गोंधळी
शब्दनादाचे गोंधळी
शब्द अर्थाचे गोंधळी
हो मरहाटीचे गोंधळी
हो आम्ही अंबेचे गोंधळी
हो आम्ही वाड्याचे गोंधळी

ब्रह्मा: अरे पुरे पुरे पुरे. काही तर सांग. हा गोंधळ म्हणजे काय? हे जागरण म्हणजे काय? ही अंबा म्हणजे काय? ही मरहाटी कोण? पुन्हा हा वाड्याचा उल्लेख कसा?  आणि माझा मूळ प्रश्न तसाच राहिला. तू काय शोधत आहेस?

नारद: अरे मरहाटी म्हणजे मराठी. वाड्याची, काकाकाकूंची मायभाषा, मायबोली. ज्ञानेश्वरांची मऱ्हाठी. अमृताहुनी गोड.

माझ्या मऱ्हाठीचिये बोल कवतिके।
परि अमृतातेहि पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिके ।
मेळवीन।

आता हीच मराठी तुझी माझी भाषा पण आहे बरे. ती देवभाषा संस्कृत आता विसरायला व्हायला लागली आहे.

ब्रह्मा: चला, एका प्रश्नाचे तरी उत्तर मिळाले. मरहाटी म्हणजे मराठी. आता उरलेला पेपर सोडवा मुनीवर.

नारद: गोंधळ म्हणजे वाड्यात लग्नमुंज कार्यानंतर होणारा देवीचा गोंधळ. वाड्याच्या कुलदेवी अंबाबाईचे कौतुकगान. तिचे आवाहन. आभारप्रदर्शन. ऋणनिर्देश. तिला Thank you बरं का म्हणणे.

गोंधळ माडिला ग अंबे गोंधळ मांडिला
माहुरगडच्या रेणुकाईचा गोंधळ मांडिला
गोंधळ मांडिला रेणुके गोंधळ मांडिला
तुळजापूर भवानी आई गोंधळ मांडिला
कोल्हापुरचे अंबाबाई गोंधळ मांडिला
नाशिकातली सप्तश्रुंगी गोंधळ मांडिला
वणी वाड्याची माय देवता गोंधळ मांडिला
आम्ही अंबेचे गोंधळी आज गे गोंधळ मांडिला
नेवजाबाईचे बाई आज गे गोंधळ मांडिला
हितकारिणीचे बाई आज गे गोंधळ मांडिला
गोंदियाईचे गोंधळी आज गे गोंधळ मांडिला
बेबाबाईचे गोंधळी आम्ही गे गोंधळ मांडिला. 

ब्रह्मा: नापास होणार आहेस पोरा तू. राहू दे आता. एक प्रश्न सोडवतो, दुसरा उभा करतो. आता ही बेबाबाई कोण?

नारद: हं. सापडला बघ गोंधळ. काल रात्रीच वाचून झाला होता. तू उठल्यावर तुला वाचून दाखवीन म्हणून इथेच कपाटात सरकवून दिला होता. पण आज तो काही केल्या सापडेना. म्हणून बेचैन होतो. 

तुला जसा अमेरिकेला योगायोगाने बाळविजय गावला, तसा काल मला हा ‘गोंधळ’ सापडला. असे काहीतरी असलेच पाहिजे असे मला बाळविजय वाचला तेव्हापासून सारखे वाटतच होते. अशीही कवने असायलाच हवीत. पण हाती येत नव्हती. काल पेडगावला गोंधळ ऐकत तल्लीन झालो असता अचानक वावटळ सुटली आणि हे काही सुटे कागद माझ्या शेंडीत येऊन गुरफटले. मला वाटले पालापाचोळा असेल. जसा आला तसा जाईल. पण तसे झाले नाही. ते जे अडकले ते अडकलेच. अडकतच गेले. जणू ते मलाच शोधत होते आणि आता घट्ट धरून होते. मी ते अलगद शेंडीतून सोडवले आणि अंधारात पुन्हा डोळे फोडून पाहिले. ‘बेबाबाईचा गोंधळ’ असे शीर्षक दिसले. मी दचकलोच. माझा होरा खरा ठरला होता.

ब्रह्मा: व्वा कीर्तनकार व्वा. किती उत्सुकता ताणता. चला पुढे चला. कोण ही बेबाबाई? तिचा गोंधळ पाहून असे दचकलात का? सांगा पटापट.

नारद: ब्रह्मा, बेबाबाई हे निव्वळ नाव किंवा शीर्षक नाही रे. बेबाबाई हे पूर्ण प्रकरण आहे. ग्रंथच आहे म्हटले तरी फार अतिशयोक्ती होणार नाही. वाड्यातील म्हातारी ९० वर्षांची झाली तेव्हा जंतुकवीने ‘नव्वद’ नावाची कविता केली होती. अर्नाळपुराणात ती आहे. त्यातील शेवटचे कडवे असे:

मोहरीर ही आई, हिजला मोह कधी सुटला नाही
मोहरीर ही बाई, हरीचा विसर कधी पडला नाही
मोहरीर ही माया, मोहरी फोडणीत जळली नाही
मोहरीर आई किमया, ब्रह्मा ‘वन्स मोर’ तुला घेई

मास्तरांच्या मोहरीर आडनावाच्या फोडी करून म्हातारीची स्वभाववैशिष्ट्ये सांगणारे हे पद मला तेव्हाही खूप आवडले होते. आताही आवडते. वाच कधी जागा असतांना. 
तसेच काहीसे बेबाबाई ह्या नावात आहे. सांग बरे काय काय, कोण कोण यात दडले आहे ते. 

ब्रह्मा: सोड रे. छळू नको. मला असा पेचात पाडू नको. मी आंब्याच्या फोडी करू शकतो. आंबेफोडणीनी आंबे फोडू शकतो. डांगर चिरू शकतो. पण शब्दच्छल हा तुझा प्रांत. ब्रह्मच्छल आणि शब्दच्छल यातच तुझा सारा जन्म गेला. चला पुढे.

नारद: वाड्यातल्या म्हातारीची आई, म्हणजे मुलांची आजी, तिला बाई म्हणत असे. बाई असं नको करू, बाई तू थोडा चहा घे नं वं, बाई तू थोडी पड असे अत्यंत कळकळीने आपल्या राब राब राबणाऱ्या मुलीला म्हणतांना मी अनेकदा ऐकले आहे. बाबा, म्हणजे मास्तर तर तुला माहीतच आहेत. बेबाई म्हणजे बेबी, त्यांची मोठी मुलगी. बेबाबाई मधे बेबाई म्हणजे बेबी, बाबा व बाई म्हणजे आई एकत्र विद्यमान आहेत. एकरूप झालेले आहेत. बेबीला आजही सारे बेबाबाई म्हणतात. बेबाबाईचा गोंधळ हे बेबीच्या स्तुतीपर अनामिकाने लिहिलेले कवन असावे. बाळविजय सारखा हा बेबीविजयच म्हण ना. तो अचानक गवसला पण लगेच हारवला म्हणून मी हादरलो होतो. आता सापडला अन जीव भांड्यात पडला. आता शेंडीलाच बांधून ठेवतो. माझे वाचून झाले की तुला देईन. मग तू वाच. हो किनई.

ब्रह्मा: चुप रे. मला काय स्वत: वाचून डोंबलं कळणार? तूच वाचून अर्थ सांग. प्लीज! आण इकडे. तुझ्या शेंडीत ठेवण्याऐवजी मी ती कागदांची सुरळी माझ्या चार डोक्यांच्या मधल्या पोकळीत व्यवस्थित ठेवून देतो. बघ कशी छान बसली. आता हयग्रीवाचा बाप चोरायला आला तरी चिंता नाही. हा घे पहिला कागद आणि हो सुरू.

नारद: अरे असे एकदम बापावर जाऊ नये. हयग्रीवाचा बाप न म्हणता हयग्रीवाचा जनक म्हणावे. अगदी नागपुरी झाला आहेस तू.  असो. थकलो आहे रे ब्रह्मा! रात्रभर जागरण झाले. उद्यापासून वाचू.

ब्रह्मा: अंत पाहू नको. आवाज काढीन कानाखाली. प्लीज म्हटलेले आहे. वाच आत्ताच. हुक्म की तालीम हो।

नारद: ओके. तू डफ वाजव. मी तुणतुणं. 

ब्रह्मा: आपल्यापाशी कुठे आहेत ती वाद्ये?

नारद: घे तू हे ताट, धर असे उभे आणि वाजव डफ समजून. मी घेतो वाटी आणि चमचा आणि करतो तुण तुण. काय हे ब्रह्मा? नाद आणि ठेका हवा. आपला हात आणि हाती येईल ती गोष्ट त्याकरिता पुरे असते. वाद्यच कशाला हवे. आपला हात जगन्नाथ. चल हो सुरू.

आम्ही बेबीचे गोंधळी, हो बेबाबाईचे गोंधळी
जेठाबाईचे गोंधळी, हो अकोलाईचे गोंधळी
गीताबाईचे गोंधळी, हो गोंदियाईचे गोंधळी
संगीताईचे गोंधळी, हो तुमसराईचे गोंधळी
बाबा आईचे गोंधळी, हो बाळ बेबीचे गोंधळी
आम्ही वाड्याचे गोंधळी, हो पाच तोंडांचे गोंधळी
आम्ही बेबीचे गोंधळी, हो बेबाबाईचे गोंधळी

छान. शेवटची डफावरची थाप तर मस्तच पडली ब्रह्मा. आज रात्रभर जागून हा गोंधळ मांडला की त्याला जागरण म्हणतात. बघ गोंधळाची, जागरणाची कशी नशा चढते ते. गोंधळ करतात ते गोंधळी. आज रात्री ब्रह्मा आणि नारद गोंधळी.

वाडेकरी आपल्या ज्येष्ठ बहिणीचा, म्हणजे बेबीचा गोंधळ घालतात व तिचे कौतुक करतात असे दिसते. जेठ म्हणजे ज्येष्ठ. ज्येष्ठ मधली कुकरची शिट्टी काढून उरलेला शब्द. याला शब्दाचा अपभ्रंश म्हणतात. बेबी जेठ म्हणून जेठी, जेठाई.  तिला बेबाबाई म्हणतात. व्यवहारातले नाव ते व्यवहारातले नाव. पण बाळ बेबी बंडू छोटू ह्या घरातल्या नावांची गोडी काही औरच असते. विठ्ठलपंत किंवा विठ्ठलराव आणि विठोबा किंवा विठू यात जो फरक आहे तोच यात आहे. बेबी या मुळातच गोड नावाचे माधुरीकरण बेबाई, आणि त्याचे नंतर बेबाबाई असावे. पुरणपोळीवर पिठीसाखर पेरावी आणि ती गुळाशी खावी तसे हे नाव.

ब्रह्मा: नारदा, तू पुरणपोळी काही विसरू शकत नाही. तुला मुनी म्हणणे म्हणजे मोठा विरोधाभास आहे. ‘उभा राहे एके चरणि धरणीते धरुनिया’ तपश्चर्या करणारा बगळा जणू. ढोंगी कुठचा.

नारद: राहू दे, राहू दे. मी तोंड उघडले तर महाग पडेल तुम्हाला देवाजी. अरे षड्रिपु कोणाला ग्रासत नाहीत. काक्रोलोमोमम कोणाला चुकले आहेत? शुकासारिखे पूर्ण वैराग्य का कोणाला प्राप्त झाले? असो. 

तर बेबी ही ज्येष्ठ कन्या मास्तरांची. सध्या अकोल्याला असते म्हणून अकोलाई. गोंदिया एजुकेशन सोसायटी च्या तुमसरच्या महाविद्यालयात सात वर्षे मराठीची प्राध्यापिका होती म्हणून गोंदियाई. म्हणूनच तुमसराई. बाळ जसा वाड्याचा आत्मा तशीच बेबीही. आई बाबा बाळ बेबी हे वाड्यातील मजबूत तक्तपसाचे, म्हणजे तक्तपोशीचे चार ठावे, माजघरातील पाळण्याचे चार गज, चार कड्या. पूजेच्या पाटाचे चार पाय, वाड्याचे चार मजबूत स्तंभ. आई बाबा बाळ बेबी यांचे वाड्यातले पाच भक्त पाच तोंडांनी बेबीचा गोंधळ करीत आहेत. तसा स्पष्ट उल्लेख नाही पण हे पाच भक्तगण म्हणजे विश्राम, विजया, अरुण, वृंदा, राजू असावेत असे मला वाटते. 

ब्रह्मा: हो का? मला वाटले आपले दोघांचे मिळून पाच तोंडं. माझे चार व तुझे एक. आणि आपण पाच तोंडांचे गोंधळी. 

नारद: छान. तसेही समजायला हरकत नाही आज रात्री तरी. घे डफ हातात.

गोंधळ मांडिला गोंधळी पाच खालच्यांनी
बाळ कळवळे पाठीवरती पाय तुझा पडुनी
स्वातंत्र्याला दोनच उरता वाड्या आली धनी
सातव्यातल्या सातव्यास येई भुईवर भगिनी
गोंधळास येई आज गं बये सांख्ययोगिनी
दुसऱ्या अध्यायास पीतसे लीलया भवानी
यावे गीता गीताई बेबाबाई नावानी
गोंधळ मांडिला गोंधळी पाच खालच्यांनी

ब्रह्मा, बेबाबाईच्या पाच लहान भावंडांनी मांडलेला हा तिचा गोंधळ आहे. बाळाच्या पाठीवर पाय देऊन ती आली होती, म्हणजे बाळानंतर आईबाबांना झालेली ही कन्याप्राप्ती. ७ जुलै, १९४५ ता तिचा जन्म. ७ जुलै, म्हणजे इंग्रजी सातव्या महिन्यातला सातवा दिवस. १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याला केवळ दोन वर्ष राहिले असतांनाची, म्हणजे १९४५ची ही घटना. वाड्याच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग. आईबाबांनी तिचे नाव गीता असे ठेवले. ती अपत्य शृंखलेचा दुसरा मणि, दुसरा अध्याय. म्हणून गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा उल्लेख असावा. तो अध्याय सांख्ययोगावर तसाच कर्मयोगावरही आहे हे तर तू जाणतोसच. म्हणून बेबाबाईला सांख्ययोगिनी म्हटले आहे. आणि तसेही बेबाबाईचे आयुष्य म्हणजे सांख्ययोगाचे जिवंत उदाहरणच आहे. म्हणून ही गीता गीतेचा दुसरा अध्याय कोळून प्यायली आहे असे तिचे पाच गोंधळी म्हणतात. तिला आदराने गोंधळाला यायचे निमंत्रण देतात.

ब्रह्मा: बापरे! आपल्याला तर यातले काहीच कळले नसते बा. अगदी ‘गाढवापुढे वाचली गीता’ अन् गाढव म्हणे ‘कालचा गोंधळ बरा होता’ अशी माझी गत आहे. तो सांख्ययोग काय, तो कर्मयोग काय, मला काय माहित. असो. घेऊ का डफ हातात पुढच्या गोंधळाला?

नारद: अरे थांब, थांब. दुसरा अध्याय वाचायचाच असेल मराठीत तर घे ही लिंक.
आणखी एक गोष्ट आठवली ती सांगतो. बाळविजय मधील एक पद तुला आठवते का बघ.

तूच पुढारी, तूच चैत्र, म्हणुनी तू येसी चैत्रात
तूच पायवा, तूच मानकरी यशशिखराचा रे खचित
ग्रहमालेचा तूच गुरू, तू आद्य, ज्येष्ठ, अद्वितीय तू
पाउलवाटा अनुजांना देणारा अग्रज तू तू तू

प्रमोदविषयी त्याच्या सहा भावंडांचे हे विचार होते. बेबीविषयी तिच्या पाच लहान भावंडांचे विचार व्यक्त करणारे असेच एक पद मला त्याच काव्यात साठ कडवे आटोपल्यावर रचलेले दिसले होते. ते बाळविजयचा भाग नव्हते पण पुढे येणाऱ्या काव्याची नांदी होते. तेव्हापासूनच मला वाटत होते की असे काहीतरी येणार, येणार. आणि काल रात्री आलेच वावटळीबरोबर.

ब्रह्मा: अरे पण ते साठानंतरचे कडवे काय हे तर सांग.

नारद: अरेच्चा, विसरलोच. माझ पण वय झालं रे!

तूही पुढारी, तूही ज्येष्ठ, म्हणुनी तू येसी ज्येष्ठात
तूही स्वयंभू, तूही मानकरी यशशिखराची गं खचित
मानवनिर्मित काव्य नसे तू, हरिवचना तू, तू गीता

द्वितियोध्यायी सांख्ययोगिनी, सप्तसूर तू संगीता


हेच काहीसे भाव थोडेफार बेबाबाईच्या गोंधळात पण आहेत. आणखीही काही संदर्भ आहेत. ते पुढे येतीलच. आताच सांगत नाही. मजा जाईल. 

चल घे डफ हातात. बडव. 

गोंधळ मांडिला तुझा तू ये सांगायाला
गं बेबे ये सांगायाला
आम्ही नव्हतो जेव्हा पाठीवर तू पाय दिला
जमीनीवर तू पाय दिला
ज्येष्ठाच्या त्या सरी भारी पडती गं वळचणीला
गर्जती घन आकाशाला
वद्य त्रयोदशीस येशी आजोळी वणीला
खबर पोहोचे मग वाड्याला
आई मोठीआई अण्णाजी तुझिया दिमतीला
मावशी शांत सोबतीला
तुझ्या गोंधळी सांग तूच भोकांड गोंधळाला
दाखवी रडून पाचाला
कशा दिशा दुमदुमल्या ऐकुनी तव कंठरवाला
ऐकुनी तव कंठरवाला
गोंधळ मांडिला तुझा, तू ये सांगायाला
गं बेबी ये गोंधळाला
गं बेबी ये सांगायाला
गं बेबी ये गोंधळाला

ब्रह्मा: संपलं का रे? वेगळाच ठेका होता या वेळेस. पण मजा आली. बडवून बडवून काकूंच ताट मात्र जरा चपकलं. भांडेवाल्या बाईचं काही आता खरं नाही. काकू काढतील तिची खटाई. ताटाऐवजी मी ती परात घेऊ का? जरा जाडजूड आहे.

नारद: घे. फळं डायनिंग टेबलवरच काढून ठेव. काही होत नाही. ब्रह्मा, बेबीचा जन्म बाळासारखा नागपूरचा नाही. तिचा जन्म वणीचा. म्हातारीचे जन्मगाव. मुलांचे आजीआजोबा तिथेच असत. मुले आजोबांना अण्णाजी व आजीला मोठीआई म्हणत. ज्येष्ठ वद्य त्रयोदशीचा तिचा जन्म. म्हणजेच सात जुलै, १९४५चा. तिचीही पंच्याहत्तरी दोन वर्षावर आली. जाऊ आपण भेटायला कधीतरी. 

जन्माच्या वेळी ज्येष्ठाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. इतक्या की कौलारू घराच्या वळचणीला जणू पाण्याचा धबधबा वाटावा अशी संततधार लागली होती.

गोंधळी म्हणजे बेबाबाईचे लहान भाऊबहिण तेव्हा अर्थातच नव्हते. मग ते कसे जन्माचे वर्णन करणार? त्यामुळे ते तिलाच त्यांनी मांडलेल्या तिच्याच गोंधळात येऊन तिच्या जन्माचे वर्णन करावे असे म्हणतात. कशी ती प्रमोदच्या पाठीवर पाय देऊन धरतीवर अवतरली, कसा तिने भोकांड पसरून गोंधळ केला व तिच्या सेवेला तत्पर आई, मोठीआई, अण्णाजी, व शांता मावशी यांना सळो की पळो करून टाकले ते तिनेच सांगावे असे ते म्हणतात. तिने रडून दाखवावे असेही तिची पाच गोंधळी भावंड सुचवतात. मजा वाटली वाचतांना. पुन्हा एकदा म्हणावे असे वाटते. आण ती परात इकडे. मी बदडतो. तू म्हण चारही तोंडांनी आपल्या भसाड्या आवाजात. दुमदुमू दे दाही दिशा.

ब्रह्मा: घे तर.

गोंधळ मांडिला तुझा तू ये सांगायाला
गं बेबे ये सांगायाला
आम्ही नव्हतो जेव्हा पाठीवर तू पाय दिला
जमीनीवर तू पाय दिला
ज्येष्ठाच्या त्या सरी भारी पडती गं वळचणीला
गर्जती घन आकाशाला
वद्य त्रयोदशीस येशी आजोळी वणीला
खबर पोहोचे मग वाड्याला
आई मोठीआई अण्णाजी तुझिया दिमतीला
मावशी शांत सोबतीला
तुझ्या गोंधळी सांग तूच भोकांड गोंधळाला
दाखवी रडून पाचाला
कशा दिशा दुमदुमल्या ऐकुनी तव कंठरवाला
ऐकुनी तव कंठरवाला
गोंधळ मांडिला तुझा, तू ये सांगायाला
गं बेबी ये गोंधळाला
गं बेबी ये सांगायाला
गं बेबी ये गोंधळाला

नारद: तुला एक मस्त व्यवसाय सापडला ब्रह्मा. तू  पट्टीचा गोंधळी होऊ शकतो. काय तो आवाज! काय ते पोकळ नरडं! काय ती आवाजाची फेक! काय ती ऊर्जा! काय तो जोश!

ब्रह्मा: काय ते हरबऱ्याचे झाड! पुरे आता टिंगल. चला पुढे.

नारद:

गोंधळ मांडिला जेठीजेठे ये चौकीवरी
आले बाबा घरी पहाया पोरी ती गोजिरी
गोंधळ मांडिला गं पोरी पाळणा बांधिला
साता साताची सातशेची सांगितली तुला
बाळोबा बोबडे बोल गीता गीता वदला
पहिला तो अध्याय, बेबी तू दुसरा साथीला
जाता पाच आठोडे आली तू आता वाड्याला
गोंधळ मांडिला ओसरीत ये गोंधळाला
सपरीमधे ये, अंगणी ये गोंधळाला
उतरावे अंगणी लंगडी टिक्करबिल्याला
बेबी बाळा खेळा आता नदी पहाडाला
झबले परकर पाचवारी दावी तू प्रगतीला
गोंधळ मांडिला तुझा गे ये गोंधळाला
गं बेबी ये गोंधळाला
गं गीते ये गोंधळाला
संगीते ये गोंधळाला

ब्रह्मा: व्वा! खूपच मज्जा मज्जा येते आहे. सगळच समजतं असं नाही. पण अगदीच वेदांसारखं डोक्यावरून जात नाही. ते साता साताची सातशे वगैरे गणित नाही समजलं. पण तू आता आपल्या मंजुळ, नादमधुर, कोकिळकंठी आवाजात समजावून सांगशीलच. करा सुरू कीर्तन.

नारद: टोमणे मारण्याचा माझा गुण नक्कीच आनुवंशिक आहे याची खात्री पडली ब्रह्मा. असो.

तर पाच गोंधळी जेठीजेठेला, म्हणजे आपल्या ज्येष्ठात जन्मलेल्या (म्हणून ज्येष्ठी) ज्येष्ठ भगिनीला (म्हणून ज्येष्ठी किंवा जेठी) गोंधळात यायला पाचारण करतात. जन्माची बातमी जशी नागपूरला वाड्यावर पोहोचली तसे बाबा तडक बसने वणीला आले. त्या काळी ३-४ तास घेत असे बस ते १०० किलोमीटर अंतर कापायला. आपल्या गोजिरवाण्या नवजात कन्येला पाहून ते सुखावले. बाराव्या दिवशी बारशाचा जंगी कार्यक्रम झाला. भगवंतराव काकाकाकू, पुराणिक, अडोणी, तत्वादी, कमाविसदार, अणे सारी सारी कुटुंबे आली होती. अणे म्हणजे मोठीआईचे माहेर. लोकनायक बापूजी अणे तिचे बंधु. पाळणा सजवण्यात आला. मुलीला पाळण्यात टाकण्यात आले. कानात नाव काय सांगितले? तर साता साताची सातशेची. अगदी सोप्पे आहे. तुला कळलेच असेल.

ब्रह्मा: अर्थातच. चल पुढे. सातीसाती एकोणपन्नास. असं कोणी नाव ठेवतं का रे? हा तर रोल नंबर झाला. 

नारद: अरे, साता साताची म्हणजे सात जुलैची. आधी सांगितले होते मी तुला. सातशेची म्हणजे सातशे श्लोकांची. अरे म्हणजे आपली ती अठरा अध्यायांची. ती नाही का, आपली ती म्हणजे ही नाही का रे? तुझं म्हणजे .... आपलं म्हणजे .... हे म्हणजे .... खूपच बा. कितीही स्पष्ट सांगितलं तरी तुला कळतच नाही. 

ब्रह्मा: बरं मी आहेच मुळी ठोंब्या. काय म्हणायच आहे तुला? पण सांग तर सातशेची, अठरा अध्यायाची म्हणजे कोण?

नारद: अरे गीता. गीतेत बरोबर ७०० श्लोक आहेत. १ त्या आंधळ्याचा, ४० त्याच्या खबऱ्याचे, म्हणजे त्या संजयचे, ८४ पळपुट्या अर्जुनाचे आणि उरलेले ५७५ आपल्या त्या ह्याचे. म्हणजे आपला हा रे. काय त्याचं नाव बरे! अगदी जीभेवर आहे रे पण ओठावर येत नाही. छे, हे वय मोठं खराब बाबा.

ब्रह्मा: अरे कृष्णाचे असतील. एवढे श्लोक त्याचेच असतील ना? म्हणून तर गीता त्याने सांगितली असे म्हणतात ना? थोडफार वाचन माझही आहे बरं! 

नारद: छान! मी अशीच तुझी परीक्षा पाहिली रे. ब्रह्मा, गोंधळ हा एक लोककलेचा भाग आहे. खास करून महाराष्ट्रात प्रचलित आहे. संगीताचे, साहित्याचे व्याकरणबद्ध, काटेकोर बंधन याला नसते. ते पांढरपेशांना, उच्चभ्रूंना लखलाभ असो. लोककलेचा संबंधच मुळी जनसामान्यांशी. त्यांना शास्त्रोक्त संगीत येत नसेल, रागदारीचे ज्ञान नसेल, भाषेचे सौंदर्यशास्त्र समजत नसेल, समासालंकाराची जाण नसेल, सुरेल आवाज नसेल, कसलेला गळा नसेल, पण आयुष्याच्या आखाड्यात ते तयार झालेले असतात. त्यांनाही भावना असतात. कुठलाही देखावा निर्माण न करता भावनांना व्यक्तरूप देणारी कला म्हणजे लोककला. गोंधळ हा त्याचा उत्कृष्ट नमुना. साहित्य संगीताच्या राजवाड्यासमोर ही सुदाम्याची झोपडी. रागसुरांच्या जंगी मेजवानीत हा गोपाळांचा गोपालकाला. ज्याला आवडतो त्याला आवडतो. पेडगावच्या गोंधळात मी जो गोंधळाचा भक्त झालो तो झालो. पंडितकाव्य, भागवत सोडून मी गोंधळावर फिदा झालो. असो.

ब्रह्मा, गोंधळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातली संदर्भप्रचुरता. ते संदर्भ कळले म्हणजे आणखीनच मजा येते. हा आपल्या बेबाबाईचा गोंधळ त्या दृष्टीने मला सोपा जातो आहे समजायला. बाबांबरोबर मीही त्याच बसने वणीला गेलो होतो. नाहीतरी आई, बाबा व बाळ वणीला असल्यावर मी वाड्यात काय करणार होतो. चढलो त्याच बसमधे. बसलो ड्रायव्हरच्या बाजूच्या त्या गिअरबाॅक्सवर. मजा आली. एक दोनदा तर मीही पोंगा वाजवून पाहिला. पों पों. खूप मजा येते रे. 

तर बेबीचे नाव गीता ठेवण्यात आले. बाळ दोन वर्षाचा. बराच बोलू लागला होता. त्याने तर गीता गीता असा जपच लावला. त्याच्याकरिता तो नवीन शब्द होता. आपल्यापेक्षाही कोणी छोटे आहे, म्हणजेच आपण आता मोठे झालो ही कल्पनाही त्याला सुखावून गेली होती. 

बारसे मोठे थाटात पार पडले. पाहता पाहता सव्वा महिना झाला. आई व बाळ गोपाळकृष्णाच्या व मोठ्या महादेवाच्या देवळात जाऊन आले. आता पाचही जण पुन्हा नागपूरला वाड्यात परतले.

ब्रह्मा: पाच कोण रे? आई बाबा बाळ बेबी चारच झाले. हा पाचवा कोण?

नारद: अरे मी काय तिथेच राहून जाणार होतो? मीही परत आलो. अदृश्य मी. आपले गोंधळीही आता वाड्यावर लक्ष केंद्रित करणार असे दिसते. आपल्या बेबाबाईला ते माजघरातून ओसरीत, म्हणजे सपरीत म्हणजे पडवीत यावे असे सांगतात. तिथून मग दोन पायऱ्या उतरून आंगणात पाचारण करतात. वाड्यातले महत्त्वाचे मैदानी खेळ म्हणजे लंगडी, टिक्करबिल्ला, नदी की पहाड इत्यादी. बेबीला तशीही खेळांची बरीच आवड. पुढे जाऊन ती शाळेत खोखो सुद्धा खेळली. आता लहानपणी प्रमोदबरोबर हे आंगणातले खेळ खेळायला आईला उतरावे लागत नसे. बाळ बेबी यांची मस्त चमू तयार झाली होती.   पाहता पाहता दिवस गेले. झबल्यातली बेबाई पुढे जाऊन परकरात आली. पुढे पाचवारी साडीत. पण आता मात्र ती झबल्यातच होती व तिचे पाऊल शाळेत पडणार होते. 

बाळासारखीच बेबी पाठांतरात तरबेज होती. आजही तिला विष्णुसहस्रनाम मुखोद्गत आहे. विश्वम् विष्णु: पासून अक्षोभ्यः सर्वप्रहरणायुध: पर्यंत ती हजार नावे घडाघडा म्हणते. मोजणाऱ्याने मोजत बसावे. एक कमी नाही की एक ज्यास्त नाही. हजार म्हणजे हजार.

ब्रह्मा: नारदा, सुरुवातीची दोन नावे सोपी वाटली रे. पण ते नउशे नव्व्याण्णवावे अक्षोभ्य आणि हजारावे सर्वप्रहरणायुध: फार क्लिष्ट आहेत. राग येत नसेल तर सांग अर्थ.

नारद: अरे राग कशाला येईल. तुझ्याकरिता तरी मी अक्षोभ्य आहे. कितीदाही विचारले, काहीही विचारले तरी मला राग किंवा क्षोभ येणार नाही. ते शक्य नाही. विष्णू हाही तसाच. अगदी अक्षोभ्य. काहीही झाले, कितीही चिथवले तरी न रागावणारा, क्षोभ न करणारा. रागीट वाघोबा म्हणजे शिवा. व्याघ्रासनावर बसून बसून तोच वाघ झाला जणू. पण विष्णूचे तसे नाही. माझा नारायण तो. भक्तांची सर्व पापे माफ करणारा. अगदी अजामिळ सुद्धा का असेना. म्हणून माझी धडगत आहे. कारण खोडी काढल्याशिवाय मला चैन नसते. दुसरा कोणी असता तर मी कधीच सुळावर चढलो असतो. शिवाच्या तर मी सावलीला सुद्धा जात नाही. 

ब्रह्मा: म्हणजे विष्णू चिडका नाही असेच ना? बरे मग ते सर्वप्रहरणायुध म्हणजे?

नारद: म्हणजे कुठलाही प्रहार झाला तरी त्याचा प्रतिकार करण्याची क्षमता असणारी आयुधे ज्याच्याकडे आहेत असा जो तो. अगदी ब्रह्मास्त्र का असेना. कुठल्याही संकटाचे विमोचन करण्याची क्षमता असणारा माझा विष्णू.

ब्रह्मा: किती सहज सोपे नाव आहे रे. विष्णु सहस्रनाम तोंडपाठ असणाऱ्या बेबीने आपल्या नातवाचे नाव मग आरव कां ठेवले असावे? सर्वप्रहरणायुध किती छान वाटले असते. हाक मारायला ही किती सहज. सर्वप्रहरणायुधा, ये बाळा मम्मम् करायला.

नारद: आणि शाळेत टाकतांना पण फाॅर्मवर first name म्हणून सहज Sarvapraharanayudh लिहिता आले असते. हो किनई? ते राहू दे आता. तो शाळेत जाईल तेव्हा जाईल. दोन पिढ्यांपूर्वी मात्र आपल्या गोंधळात होकिनईचे पाऊल आता शाळेत पडणार होते. घे संबळ हातात.


गोंधळी गोंधळ मांडिती आता शाळेचा
पहिला वहिला बेबी गुंफते मणी यशमाळेचा
मध्य प्रांत वऱ्हाड प्राथमिक चार तुकड्यांचा
बाळाचे धरुनिया बोट चालली रस्ता शाळेचा 
तो चौथ्या तुकडीत, बेबाई जाई पहिलीला
बहिणा प्रमोदची, अपेक्षा पूर्ण तू गं केल्या
तेच तेज, तीच आभा गणपति सरस्वती एक
टालाटुले धन्य, आधी तो, मागुनी ही लेक
पाटी पेंसिल दौत टाक शस्त्रे ह्या अंबेची
रोज निघतसे वारी घरूनी पाताळेश्वराची
गोंधळी गोंधळ मांडिती आता शाळेचा
अकोलाईचा, छोटीआईचा, होकिनाईचा
ये बेबाई रंगव किस्सा तुझिया विजयाचा

ब्रह्माई, तू मस्त संबळ वाजवली. संबळ आणि तुणतुणं ही गोंधळाची दोन मुख्य वाद्ये.

ब्रह्मा: आतापर्यंत डफ म्हणायचा, आता त्यालाच संबळ म्हणतो. तू असा कसा बदलू शकतो रे? अगदी अक्षोभ्य विष्णू सुद्धा चिडून जाईल तुझ्या अशा वागण्याने. 

नारद: अरे नावात काय आहे? जे वाजते ते वाद्य. चलती का नाम गाडी. डफ म्हण तुला हवे तर. संबळ आणू कधीतरी. ताणलेले चामडे, त्यावर एखाद्या काडीने मारले की किती सुंदर आवाज काढते. हे अगदी प्राचीन ग्रामीण लोकवाद्य. एकंदरीत काय. तू मस्त वादक झाला आहे एवढेच मला म्हणायचे होते माझे ब्रह्माबाई.

तर बेबीही बाळाच्याच शाळेत जायला लागली. C. P. & Berar Education Societyची प्राथमिक, म्हणजे इयत्ता पहिली ते चौथीकरिता असलेली शाळा. C.P. म्हणजे Central Provinces, म्हणजे भारताचा मध्य भाग, व Berar म्हणजे वऱ्हाडचे इंग्रजांनी केलेले आंग्लीकरण. काहीतरी उच्चार समजून ते स्पेलिंग करून टाकीत. ब्रह्मदेशाला burma म्हणायचे. म्हणजे तू बर्मा त्यांच्या भाषेत. वऱ्हाड आणि मध्यप्रदेशातील मुलांना कसदार शिक्षण मिळावे म्हणून गोखले कागभट लुले मुरकुटे या चौघांनी सुरू केलेली संस्था. त्यांच्या नावावर जाऊ नकोस. ते ऐरेगैरे नव्हते. चांगले बाणेदार व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्याच शाळेत बाळ जात असे. आता बेबी. बाळ बहुधा चौथीत असतांना बेबाबाई पहिलीत दाखल झाल्या. वाड्यापासून पाताळेश्वराच्या मागे असलेल्या टालाटुले बिल्डिंगमध्ये तेव्हा ही शाळा भरायची. ‘आमची शाळा पडल्यामुळे आमचे वर्ग टालाटुले बिल्डिंग मध्ये भरतात’ असे मुलांकडून वदवून घेत असत. वाड्यात ही मुले हे घोषवाक्य हेल काढून म्हणत असत. मजा यायची. 

बाळाचे बोट धरून शाळेत जाणारी ही मुलगी बाळासारखीच हुशार होती. तीच बुद्धीची कुशाग्रता. प्रमोदने आधीच सर्वांच्या अपेक्षा खूप उंचावल्या होत्या. बेबाईनेही काही कसर सोडली नाही. या जोडीने शाळेत जो विजयोत्सव सुरू केला त्यामुळे नंतर येणाऱ्या पाच गोंधळ्यांना बरेच कठिण गेले. बाळबेबीची उंची तसे कोणी गाठू शकले नाही हे खरे. पण शेवटी हाताची बोटेच ती. सारखी कशी असणार?

बेबी वक्तृत्त्व, वादविवाद, पाठांतर, निबंधलेखन, समयस्फूर्त वक्तृत्व यात तर बाळासारखी तरबेज होतीच पण खास मुलींकरिता होणाऱ्या रांगोळी स्पर्धेत तिचा हात धरणारे कोणी नव्हते.

रांगोळीवरून आठवले. वाड्यात रोज आंगणात रांगोळी काढली जाई. साधीसुधी नाही. तर १६ थेंबी आठ ओळी वगैरे. रांगोळी चिमटीत घेऊन समान अंतरावर एका सरळ रेषेत १६ थेंब सोडायचे. मग त्याच्या खाली वरच्या थेंबांच्या मधोमध येतील असे १५ थेंब. मग त्याखाली तसेच १५ च्या मधोमध १४, मग १३, मग १२, मग ११, १०, ९, ८. तसेच १६ थेंबाच्या वरही. असे थेंब काढून झाले की मग एका ठराविक पॅटर्नने ते रांगोळीची रेष सोडत जोडायचे. ह्या एका जाडीच्या सरळ रेषा काढणे महाकठिण. मग तयार आकृतीत जमले तर रंग भरायचे. पहात राहावे अशी रांगोळी तयार होत असे. दिवाळीत तर आंगणभर रांगोळ्याच रांगोळ्या. बेबी, नंतर आलेल्या विजया, वृंदा रांगोळीकलेत तरबेज होत्या. आईकडून बेबी, तिचे पाहून विजया व वृंदा शिकल्या असाव्यात. 

ब्रह्मा, एकदा मलाही रांगोळी काढायची इच्छा झाली. सगळे झोपल्यावर मी स्वयंपाकघरात रांगोळी काढून पाहिली. दुसऱ्या दिवशी आई खूप ओरडली ‘कोणी ही रांगोळी सांडवली? रांगोळी की फेदक्का? अरुणच असेल. आणखी कोण? कुचिंद कुठला!’. नंतर त्याने व मी कधीही रांगोळीला हात लावला नाही. ब्रह्मा, एक वेळ सृष्टी निर्माण करणे सोपे. पण ही रांगोळी काढणे म्हणजे कठिण कर्म रे बाबा. काढून पहा कधी. गर्वहरणाची खात्री. असो.

तर रांगोळी स्पर्धेत बेबीचा नेहमीच पहिला नंबर असे. स्पर्धा शाळेतली असो की सार्वजनिक गणेशोत्सवातली की शारदोत्सवातली. पहिला नंबर काही गेला नाही. 

श्रोत्यांसमोर अत्यंत आत्मविश्वासाने बोलण्यात बेबीचा हातखंडा होता. त्यामुळे वक्तृत्व, वादविवाद, परिसंवाद या स्पर्धात ती नेहमीच पहिली येत असे. तो काळ जुना होता. मुलांइतका मुलींना वाव साधारणतया मिळत नसे. तसे असूनही तिने ही कला कशी आत्मसात केली हे नवलच आहे. मला असे बरेचदा वाटते की दक्षिणामूर्ती मंदिरातील बाळशास्त्री हरदास, म्हणजे तिच्या मावशीचे यजमान, यांचा तिच्यावर खूप प्रभाव पडला असावा. त्यांच्या कीर्तनांना व व्याख्यानांना ती आवर्जून जात असे. ही भाषणकला पुढेही तिला महाविद्यालयात उत्कृष्ट अध्यापिका करून गेली. साधे बोलतानाही ती भाषण देते आहे असे वाटते. शिकवते आहे असे वाटते. ऐकणारा जरा बुद्धीने  कमीच आहे असे तिला वाटते बहुधा. साध्यासाध्या गोष्टीही जोमाने समजावून सांगते. साध्या विनोदाला ती सामान्यांसारखी हसून मोकळी होत नाही. काय विनोद होता ते आधी समजावून सांगते. वरून हो किनई असे विचारून खुंट हालवून बघते. हे हो किनाई तर इतके प्रसिद्ध झाले की ब्रह्मपुरीच्या लैजाबाई झिडकारिणी काॅलेजात तर ती होकिनाई मॅडम म्हणूनच प्रसिद्ध होती. हो किनाई?

ब्रह्मा: चुप बैस. लैजाबाई झिडकारिणी नाही, नेवजाबाई हितकारिणी. 

नारद: मी बघत होतो तू जागा आहेस की डोळ्यांना डोळे लागले काय ते. म्हणून जरा गंमत केली. पण तू तर चक्क जागा आहेस. मला आजकाल बरेचदा संशय येतो की आपण बेबाबाईसारखे बोलत राहतो तर समोरचा झोपी तर जात नाही ना. पण ब्रह्मा, बाळबेबीचे ते शाळेचे दिवस आठवले की माझे भान हरपते. तसेच आताही झाले. मला ती भाषणे, ते निबंध आठवतात. चित्रगुप्ताने त्यांची टिपणे ठेवली नाहीत. पण ती बरीचशी ‘अध्यक्ष महाराज’ मध्ये आजही वाचायला आहेत. वाच कधी. 


असो. बाळ आणि बेबी यांनी तब्बल चौदा वर्षे शाळेत अक्षरश: गाजवली.  पण आता शालेय शिक्षण संपून बेबामाई महाविद्यालयात जायची वेळ आली. बाळ तीन वर्षांपूर्वीच विज्ञानसंस्थेत गेला होता. इथे मात्र बेबीने वेगळा मार्ग निवडला. कदाचित बाळ आणि बेबी ह्या सामान्यनामात त्या काळी समाजात जो भेद रूढ होता त्याचेच ते प्रकटीकरण असावे.

ब्रह्मा: म्हणजे? ती त्याच्या मागोमाग विज्ञानसंस्थेत नाही का गेली? की तिचे शिक्षणच संपुष्टात आले? चल पुढे. बघ मी डफ हातात घेतला सुद्धा. 

चल गं अंबे, ये गं अंबे, अंत नको पाहू
रथ विद्येचा पुढे जाऊ दे, नको इथे थांबू
डफ हाती ब्रह्माच्या, तुणतुणतुणतुण नारद करी
डड डाडा डड डाडा डाडा गोंधळ देवाघरी

नारद: अरे व्वा! अगदी उत्स्फूर्त काव्य आद्यकवी. हेच गोंधळाचे वैशिष्ट्य. अंतरीचे बोल ओठावर. उरीचा ठेका डफावर. काही मेकअप् बीकअप् नको. नुसता भाव. चल तर पुढे.


उघड उघड उघड उघड उघड उघड उघड
बेबाई तू बिंझाणीचे किवाड आता उघड
उघड उघड उघड उघड उघड उघड उघड
शारदाई तू आठीआठे जेठीसाठी उघड 
उघड उघड उघड उघड उघड उघड उघड
ब्रह्माई तू आता नवनाट्याचा पडदा उघड
उघड उघड उघड उघड उघड उघड उघड
गजवदनाई तुझा खजिना बेबईसाठी उघड
उघड उघड उघड उघड 
उघड उघड उघड उघड 
उघड उघड उघड उघड
उघड उघड उघड

काय मस्त वाजवतेस तू ब्रह्माई. अगदी चेव आल्यासारखा वाजवत सुटला.

धधड धधड धधड धधड धधड धधड धधड
धधड धधड धधड धधड धधड धधड धधड

खूपच मजा आली.

ब्रह्मा: हं. माझ्या आठही कानात तो आवाज भरून गेला. पण त्या कानांच्या मध्ये असलेल्या चार डोक्यात मात्र फारसा प्रकाश पडला नाही. तो पाडणे तुझे काम नारदाई. करा सुरू आपली:

बडबड बडबड बडबड बडबड बडबड बडबड बडबड
बडबड बडबड बडबड बडबड बडबड बडबड बडबड

नारद: ब्रह्मा, बेबाबाई शालेय शिक्षण संपवून आता महाविद्यालयात जायची वेळ आली. ती इतकी हुशार होती की तिला कुठेही प्रवेश सहज मिळाला असता. ती सहज बाळाच्याच मागोमाग विज्ञानसंस्थेत जाऊ शकली असती. पण तो १९६१-६२ चा काळ होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे. शालेय शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना विज्ञान, कला किंवा वाणिज्य, म्हणजे science, arts किंवा commerce अशा तीन शाखांमध्ये स्नातक, म्हणजे bachelor, होता येत असे. चार  वर्षांच्या अभ्यासक्रमानुसार B.Sc, B.A. वा B.Com. अशी पदवी मिळत असे. बाळा B.Sc. करणार होता. बेबीला कलाशाखेत B.A. करिता प्रवेश द्यायचे ठरले. घराजवळच शाळेच्याही थोडे आधीच बिंझाणी महिला महाविद्यालय नावाचे नावाजलेले कॉलेज होते. तिथे बेबीने प्रवेश मिळविला. या महाविद्यालयाची मजबूत बांधणी व त्याचे भव्य प्रवेशद्वार आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. ते द्वार आता स्वत:साठी उघड असे आर्जव आपले गोंधळी बेबीला करतात. 

ब्रह्मा: आणि हे आठीआठे म्हणजे रे काय? सातासाताची म्हणजे सात जुलैची तसेच आठीआठे म्हणजे आठ ऑगस्ट की काय? 

नारद: Good try ब्रह्माजी. पण हे प्रकरण जरा वेगळे आहे. बेबीने कलाशाखा निवडली. विज्ञानाऐवजी ती आता कलेत प्रभुत्व मिळविणार. वाङमय व इतर मानवीकी, म्हणजे humanitiesशी निगडित मानवांच्या प्रगतीस विज्ञानाएवढेच, किंबहुना त्याहूनही अधिक कारणीभूत असलेले विषय शिकणार होती. शारदा ही विद्येची, कलेची अधिष्ठात्री देवता. शारदा म्हणजे आपली सरस्वती रे. गणपती व शारदा हे चौदा विद्या व चौसष्ट कलांचे दैवत. यांची यादी तुला हवी असेल तर बघ. लिंक देतो.


यात शिवणकाम, यंत्रनिर्मिती, रांगोळी, हार गजरे करणे, खाट विणणे, शीघ्रकवित्व, चरखा टकळीने सूत कातणे, उखाणा घेणे, खाणींविषयी ज्ञान वगैरे सर्व काही आहे. वाचनयोग्य यादी आहे. म्हणशील तर तुला या सर्व कला शिकायचा क्लास लावून देतो. अकोल्याला चौविचौक नावाच्या बंगल्यात वर्ग भरतात. चौविचौक म्हणजे चौदा विद्या चौसष्ट कला. नेटाने जावे मात्र लागेल. मास्तरीणबाई मोठ्या कडक आहेत. अर्नाळपंताप्रमाणे पळून आलेले मला मुळीच चालणार नाही. पैसे आणि वेळ वाया जायला नको. असो. 

तर चौसष्ट कला म्हणजे आठ गुणिले आठ कला. आठीआठे. अशा चौसष्ट कलांनी बेबीला, म्हणजे जेठीला युक्त करावे, तिच्यासाठी ती सारी कलादालने उघडावी असे आर्जव गोंधळी शारदेला करतात. गणपतीलाही आपला सर्व विद्येचा खजिना बेबीला उघडा करून द्यावा असे कळकळीचे आर्जव आहे. तुला पण गोंधळी मागणे मागत आहे. ते तुला पोहोचलेच असेल.

ब्रह्मा: पुढे सांग रे. मी कुठे आलो मधेच?

नारद: ब्रह्मा, बाळविजयमधे आई जे म्हणाली तेच तिचे गोंधळी कन्यापुत्र म्हणतात.

शास्त्र आमुचे इतुके साधे खापर ब्रह्माच्या माथी
भले घडो, न घडो, ब्रह्मार्पण हेच शब्द ओठी येती
तोची लेखक तव नाट्याचा, पंचमुखी दिग्दर्शक तो
रंगमंच तो, पडदा ओढी, पडदा सोडी जो तो तो

बाळाच्या प्रगतीचा जसा तू शिल्पकार, कर्ताकरविता, तसेच आता बेबाबाईच्या आयुष्यातील हा नवा प्रवेश तू सुरू करावा व पडदा वर ओढावा असे ती तुला म्हणतात. ती सारी तर तू लिहिलेल्या, तू दिग्दर्शिलेल्या नाटकातील आपआपली भूमिका वठविणारी पात्रे आहेत रे. केवळ नाममात्र. सर्व काही तूच आहेस. 

ब्रह्मा: आणि मीच लिहिलेले नाट्य तू मलाच समजावून सांगत आहेस. ते तू तसे करावे हेही मीच लिहून ठेवलेले असेल. खूपच छान. उत्तम. I am so proud of your father.

नारद: अरे चिडू नको. हे त्यांचे संस्कार आहेत रे. तू म्हणजे जो तो स्वत:. म्हणून तर अहं ब्रह्माऽऽस्मी. जो तो ज्याचे त्याचे भविष्य स्वत: घडवितो असा त्याचा अर्थ. पण तो अर्थ कुठेतरी लुप्त झाला. महाविद्यालयात लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र शिकलेली बेबाबाई सुद्धा ते झुगारून चार तोंडाचा ब्रह्मदेव आकाशात असतो असे मनापासून मानते. त्याला तू मी काय करणार? अरे, विश्वासाची भिंत कुडाची, तिला तडा का जाणार? हे विश्वास खूप जुने, भक्कम, मुरलेले आहेत. ते रुजायला जर शतके लोटली तर विझायलाही वेळ नाही का लागणार? तुला मलाच तर आपले स्वत:चे सत्य कळायला Y2K चा भूकम्प व्हावा लागला. असाच भूकम्प पुढे कधीतरी होईल व ही मानवजात दीर्घ स्वप्नातून खडबडून जागी होईल. धीर धर. सबूर कर.

ब्रह्मा: खरे आहे रे. पण मला वाटते मनुपुत्रांना हे हळूहळू समजायला लागले असावे. कालच मी तुझ्या एका टिपणातला श्लोक वाचला. आवडला. तू इंग्रजीत अर्थ दिला होता म्हणून समजला देखील. आणि मला वाटते हे वाड्यालाही समजले होते. उलट वाडेकरी त्याचे उत्तम उदाहरण आहेत.

मनुष्य: स्व विश्वासेन निर्मित: ।
यत् विश्वास करोति तेन इव भवति ।।

Man is made by his belief.
As he believes, so he is.


नारद: छान. उद्याच्या कीर्तनाकरिता काढलेली टिपणे आहेत ती. चोरून वाचतोस होय? पण ब्रह्मा, मला तुला येथे तुझ्या नाट्यलेखनाबद्दल काही तरी सांगायचे आहे. तुझ्या नाटकात मुलांना नेहमी एकेरी भूमिका व मुलींना नेहमी दुहेरी तिहेरी भूमिका असते. डबल ट्रिपल रोल करतात सगळ्याच मुली. आता बेबाबाईचीच गोष्ट घे ना.

बेबी दहावी मॅट्रिक झाली ते बहुधा १९६१ साल असावे. म्हणजे आपल्या पाच गोंधळ्यापैकी राजू सोडून बाकी चौघे जन्माला आले होते. बिंझाणी कॉलेजात असताना राजूचाही जन्म झाला. बेबी आईखालोखाल सर्वात मोठी असल्यामुळे व कुटुंबही मोठे असल्यामुळे तिच्यावर घरकामाचाही बराच भार पडत असे. कुडव कुडव गहू तांदूळ निवडत बसलेल्या आई व मुली हा स्वयंपाकघरातील नेहमीचाच सीन असे. अडीअडचणीला मातीच्या चुलीवर लाकडे जाळून स्वयंपाक. इतरही कामे. त्यामुळे शिक्षण व घरकाम ह्या दोन भूमिका सर्वच मुली नित्यच पार पाडीत असत. म्हणूनही की काय पण मुलांना जसे दूरच्या महाविद्यालयात जाऊन विज्ञान विषय शिकणे सहज साध्य होते तसे मुलींना नसावे. सामाजिक बंधनेही मुलींना ज्यास्तच. हे सर्व पाहिले की बेबीचे यश वरपांगी दिसते त्यापेक्षा नक्कीच अधिक दैदिप्यमान होते यात मला तरी संशय नाही. बेबाबाई जर बाबूबोवा असती तर तिचा प्रवास नक्कीच वेगळ्या मार्गानी झाला असता असे मला वाटते. पण आत्याला मिशा असत्या तर ती काका नसती का झाली? किंवा मला तार तोंडे असती तर मीच ब्रह्मदेव नसतो का झालो? 

पण मुलांना व मुलींना एकाच तराजूने मोजण्यात काहीतरी कमतरता आहे असे मला वाटते. नाटक लिहितांना तू तुळशीचं पान मुलींच्या पारड्यात टाकायला हवे. थोडा न्याय करायला हवा ब्रह्मा. असो. 

घे पुन्हा हाती डफ. गुरू, हो जा शुरू.

घ्या ना बाई चुलीची माती
दारावरती आली होती
घोटून गिरवून बेबाबाईनं 
मातीची चूल बनविली होती

चुलीवरती रांधा झाला
धूरामधे वाढून झाला
थाळ्यानंतर उष्टी काढा
दिवस गेला, संपला पाढा

रोज रात्री दुसरा पाढा
पायली पुसा, गूल काढा
मिणमिण मिणमिण उजेड पाडा
शास्त्रे वाचून डोळे फोडा

उकळा उकळा तर्कशास्त्र
समाजशास्त्र, मानसशास्त्र
तत्वज्ञान चवीला घोळा
काढा कोळून उतरा गळा

गोंधळी जोडीला काढती गळा
तुला त्यांचा किती कळवळा
काय गावे छोटीआईच्या गोंधळा
फुकाचे बोल, शब्दांचा मळा

ये गं बाई तू गोंधळा
ये गं तुझिया तू गोंधळा
ये गं माई तू गोंधळा
ये गं ताई तू गोंधळा

चला ब्रह्मदेव, सांगा तुम्हीच या अंकाचा अर्थ.

ब्रह्मा: कशाचा ब्रह्मदेव रे? नुसता ढम्मदेव आहे मी. अ का ढ ते कळत नाही. तुम्हीच सुरू करा कीर्तन.

नारद: हं. रागावलास की तुझ्या चारही जीभांवर सरस्वती नाचते. ढम्मदेव नाव आवडले. ऐका तर ढम्मदेव.

५०-६० वर्षांपूर्वीचा तो काळ. आजसारखे काहीच नव्हते. असे ३-४ बर्नरचे गॅस स्टोव्ह नव्हते. नुसती कळ फिरवली की पेटत नव्हते. मातीच्या चुली होत्या. त्याही विकत मिळत नसत. स्वत: तयार कराव्या लागत. चिक्कण माती भिजवून तिचे गोळे केले की त्यांना हवा तसा आकार देता येत असे. पण चिक्कण माती ही काही अंगणात, बगीच्यात मिळत नाही. टोपलंभर चिक्कण माती विकत घ्यावी लागे. नवी चूल बांधायची झाली की आई सर्वांना सांगून ठेवत असे की चिक्कण माती विकणारीचा आवाज आला की धावत जाऊन रस्त्यावरून तिला वाड्यात घेऊन या. मुलेही मग ‘घ्या ना बाई चुलीची माऽऽतीऽऽऽ’ ह्या ओळखीच्या हाकेची वाट बघत असत. ती विकणारी बाई आली की तिला बोलावून आणत. आपण आईचे केवढे मोठे काम केले असा विजयी भाव त्यांच्या चेहऱ्यावर असे. मग दोन आण्याची टोपलंभर चिक्कण माती विकत घेण्यात येत असे. 

चूल बांधणे हा मोठा उत्सव असे. मोठीआई, आई, बेबाई अशा तीन पिढ्या कामाला लागत. घोटून गिरवून सुबक चूल तयार होत असे. जोड चूल असेल तर विचारायलाच नको. ही मोठी कलाच आहे ब्रह्मा. हस्तलाघव कला. चौसष्ट कलांमधे आहे बरे ही कला.

चिक्कण मातीची नवी चूल केली की ती ३-४ महिने टिकत असे. नंतर ती खचून जाई. मग पुन्हा घ्या ना बाई चुलीची माती. तुझ्या सृष्टीनिर्मितीसारखी नसते चूलनिर्मिती. एकदा केली की मग झोपा असे नसते. पुन्हा पुन्हा निर्मिती करावी लागते. असो.

तर अशा स्वनिर्मित चुलीवर लाकडे जाळून त्यावर रोज स्वयंपाक. धूरच धूर. रांधा, वाढा, उष्टी काढा  हाच रोजचा पाढा. बहुतांश काम आईच करत असे. पण बेबीवरही बरेचदा भार पडतच असे. हा पाढा त्याकाळच्या बायांच्या पाचवीला पुजला होता.

हा पाढा आटोपला की मग रात्री अभ्यासाला बसणे. वीज वगैरे प्रकार नव्हता. मातीच्या तेलाचे दिवे. लहानसा दिवा म्हणजे बेडलॅंप (bedlamp). मोठा स्टॅंड. त्यांच्या काचेच्या पायल्या रोज काजळून जायच्या. काजळ काढायला रांगोळीने पायल्या आतून घासल्या की चक्क व्हायच्या. वात थोडी वर काढून तिच्या वरच्या भागावर जमलेला गूल, म्हणजे जळून गेलेला भाग काढावा लागत असे. मग रात्रभर तरी पुरेल एवढे मातीचे तेल टाकून रात्रीकरिता प्रकाशाची तयारी करून ठेवावी लागे. रात्री अपरात्री मग या मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात पुस्तके वाचावी लागत. आजसारखा बटन दाबली की उजेड असा प्रकार नव्हता. वाड्यात विश्राम मॅट्रिक होईपर्यंत वीज नव्हती. बाळ बेबीचे तर पूर्ण शिक्षण वीजेच्या दिव्याशिवाय झाले. ब्रह्मा आज ती कल्पना करणेही कठिण आहे.

बेबीचे BA चे विषय तत्वज्ञान म्हणजे philosophy, मानसशास्त्र म्हणजे psychology, थोडेफार तर्कशास्त्र म्हणजे logic व समाजशास्त्र म्हणजे sociology होते. जोडीला मराठी म्हणजे मरहाटी व इंग्रजी म्हणजे english होतेच. ही सर्व शास्त्रे व भाषा बेबी कोळून प्यायली होती असे गोंधळी म्हणतात. 

घरकाम व अभ्यास यांच्या जोडीला आपल्या पाच लहान रडक्या भावंडांनाही तिला वेळ द्यावा लागत असे. तेही एक घरकामच होते. ब्रह्मा, म्हणून मी म्हणालो की तू तुझ्या नाट्यात मुलींना नेहमीच डबल रोल देतो. बेबाबाईने हा कठिण डबल ट्रिपल रोल सफाईने पार पाडला व ती BA झाली. कलास्नातक झाली. पण शिक्षण इथेही थांबले का? छे! स्नातक पारंगत ज्ञान्यांचा हांडा ज्या वाड्यात होता तिथे शिक्षणाची गाडी अशी सहजासहजी थांबत नसे. तिला फक्त पुढे जाणेच माहीत होते. 

ब्रह्मा, आता पुढच्या शिक्षणाचा गोंधळ तू वाच. तूच म्हणाला की तू ब्रह्मदेव नसून ढम्मदेव आहे. म्हणूनही पुढचा अंक तूच वाचायला हवा. कारण आता गोंधळी हाती ढोल घेऊन गजर करणार आहेत. त्या वाद्याच्या आवाजातच तू आहेस. घे वाच.

ब्रह्मा: आण. पाहू काय आहे ते.

ढम्म ढम्म ढम्म ढम्म
छडी विना छम्म छम्म
विद्या आली घम्म घम्म
ढम्म ढम्म ढम्म ढम्म

शारदाई हो प्रसन्न
शास्त्रे मरहाटी अनन्य
दुहेरी स्नातकी संपन्न
धन्य धन्य धन्य धन्य
ढम्म ढम्म ढम्म ढम्म

पुढे दुहेरी पारंगत
विद्यापीठ करी स्वागत
साहित्य संघही पुरस्कृत
अध्यापकी येत चालत
तटाहून राणी घोडा फेकत
बाळानंतर वाडा सोडत
करी नवे आव्हान स्वीकृत
गोंधळ्यां आठवे बऱ्हम्म
ढम्म ढम्म ढम्म ढम्म

ढमक ढमक ढम्म ढम्म
कीर्ती ढोल ढमक ढम्म
तुमसर आणि पुरीब्रह्म
कीर्ती लडी धाड धुडुम
ज्ञानदान परम ब्रह्म
होकिनाई देई घम्म
सर्वदूर लक्ष्मि बम्म
ढम्म ढम्म ढम्म ढम्म

नारदा, ब्रह्मदेव नाही मी ढम्मदेव आहे असे मी म्हणालो रे. पण आता असे वाटते तेही नाव योग्य नव्हे. ढम्म ढम्म सोडून यातलेही काही कळले नाही. मी ढप्पदेव की काय?

नारद: तसं नाही रे. ही कथा तुला माहीत नाही. त्याशिवाय कसा अर्थ लागणार? मी सांगतो ना. पण ढोल काय मस्त वाजला. हा अंक म्हणजे बेबाबाईची यशोदुंदुंभीच आहे. ढोलताशे आहेत. अंगावर रोमांच उभे झाले रे पुन्हा. यातले ‘फेकला तटाहुन घोडा’ हे मी अनुभवले आहे. आणि प्रमोद मागोमाग वाडा सोडून स्वारीवर निघालेल्या बेबीला पाहून मी पण पाच गोंधळ्यांसारखा तेव्हा गोंधळून गेलो होतो. तिच्या घोड्यांच्या टापांचा वाडेकऱ्यांचा भविष्यावर पडलेला प्रभाव मला बाळविजयाची आठवण करून देतो. ‘डबके सोडुनी बाळा तू सागरविजयासी गेला’ हे आईचे बोल आठवतात. बाळाच्या जागी बेबी टाकले तरी सार्थच होईल.

ब्रह्मा: हं, आता बरे वाटले. तू समजूत मात्र खूप छान काढतोस बरे. लग्न करून लेकुरवाळा झाला असता तर रुसलेल्या मुलांची छान समजूत काढली असती. चला सांगा गोंधळ समजावून या वृध्द बाळाला.

नारद: ब्रह्मा, तू माझं गोड कुकुलं बाळ आहेस असे मला बरेचदा वाटते रे. ऐक तर.

ब्रह्मा, विद्यार्थ्यांना शिक्षा करणे, चूक झाली की हातावर वेताच्या छडीने मारणे, उठबश्या करायला लावणे, बाकावर उभे करणे ही त्याकाळी आम गोष्ट होती. पालक सुद्धा त्याचे समर्थन करीत कारण तसे केल्याने आपले मूल सुधरेल, शिक्षेच्या धाकाने का होईना, अभ्यास करेल व नाव काढेल असे त्यांना वाटे. छडी लागे छम छम, विद्या येई घम घम अशी म्हणच होती मुळी. पण वाड्यातील मुले मुळातच हुशार व अभ्यासू होती. नको तितका अभ्यास आपण होऊनच करायची. त्यामुळे त्यांना शिक्षा न करताच सर्वत्र त्यांच्या हुशारीचा घमघमाट पसरेल अशी विद्या प्राप्त झाली. बाळाप्रमाणे बेबीच्या हुशारीचाही गवगवा झाला. इतर कलांमध्येही बेबीला बाळासारखीच गुणवत्ता प्राप्त असल्यामुळे तर नागपूर परिसरात जणू काही ढम ढम ढोल पिटून, दवंडी पिटवून, छतावरून ओरडून सांगावे असे बेबाबाईचे नाव झाले. म्हणून ढम्म ढम्म ढम्म ढम्म. तू ढम्मदेव आहे म्हणून तुला चिडवायला काही गोंधळी तसे म्हणत नाहीत बरे. तुला कोण चिडवेल सृष्टिकर्त्या? ती कोणाची हिम्मत नाही. मी करतो चावटपणा कधी कधी. 

बिंझाणी महिला महाविद्यालयात पहिल्याच वर्षी बेबीने जे केले ते अद्वितीय होते. स्वामी विवेकानंद जन्मशताब्दीनिमित्त एक अखिल भारतीय आंतरविद्यापीठ निबंध स्पर्धा आयोजित केली होती. ‘असे होते स्वामी विवेकानंद’ असा निबंधाचा विषय होता. बेबाबाईंचे अवांतर वाचन आणि मराठीवरचे प्रभुत्व पणाला लागले व तिने सुंदर निबंध बांधला. स्वरचित निबंध स्वत:च्या हस्ताक्षरात थोडीफार सजावट करून पाठवण्यात आला. कालांतराने असाच एक दिवस परीक्षकांचा निर्णय आला. प्रथम क्रमांक. दुसरे काही तिला माहीतच नव्हते जणू. पारितोषिक वितरण समारंभ मुंबईला आयोजित करण्यात आला होता. बेबीला घेऊन बाबा मुंबईला गेले. त्यावेळचे भारताचे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या हस्ते तिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. मला सांगायला संकोच वाटतो पण मीही गेलो होतो ब्रह्मा. माझा पहिला वहिला गाडीचा प्रवास. बसलो होतो वर सामानात. 

पारितोषिकाबरोबरच बेबीला जन्मशताब्दी समितीतर्फे विवेकानंदांचे समग्र साहित्य देण्यात आले. ते आजही तिच्या संग्रही आहे. ब्रह्मा, बाळ मुंबईला जायला अजून अवकाश होता. त्याआधीच बेबाबाई मुंबई जिंकून आल्या. पहिल्याच वर्षी बेबीने हे मोठे यश मिळविल्यामुळे तिची बिंझाणी महाविद्यालयात खूप कीर्ती झाली. 

बिंझाणी महाविद्यालयात बेबीने समाजशास्त्र, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, व तत्वज्ञानात तर महारथ प्राप्त केलेच पण आपली अनन्य भाषा मराठी हाही तिचा फार आवडता विषय होता. किंबहुना मराठी भाषा तिची नियतीच होती म्हण ना. नागपूरला विदर्भ साहित्य संघ ही साहित्याला, खास करून मराठी साहित्याला वाहून घेतलेली संस्था गेले ८० वर्ष कार्यरत आहे. मराठीत ते साहित्य स्नातक व साहित्य पारंगत अशा दोन परीक्षांचे आयोजन करतात. स्नातक ही B.A. व पारंगत ही M.A. समकक्ष परीक्षा आहे. बेबीने नागपूर विद्यापीठाची B.A. ही पदवी जशी मिळविली तशीच विदर्भ साहित्य संघाची मराठी साहित्य स्नातक परीक्षाही ती उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण झाली. उत्तम तऱ्हेने काय, प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकावर आली. मराठीमधे प्रथमश्रेणी मिळणे तसे दुरापास्त दुर्मिळच. पण ते इतरांना. असो. अशा तऱ्हेने बेबी double B.A. झाली असेच म्हणावे लागेल. ही चारही वर्षे तिला भारत सरकारची शिष्यवृत्ती होती. हाही मोठा मान आहे.

B.A. चा अभ्यासक्रम आटोपला. पण बेबाबाईचे शिक्षण संपले नाही. तिला M.A. करायचे होते. तिची इच्छा मानसशास्त्रात M.A. करायची होती. पण बाबांचा कल मराठीत M.A. करण्याकडे होता. बाबा स्वत:ही मराठीचे M.A. होते असे तर होतेच पण एकंदरीतच वाडेकऱ्यांचे मराठीवर अपार प्रेम होते. मराठी निबंध, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धाच तर त्यांनी शालेय जीवनात गाजवल्या होत्या व नाव कमावले होते. त्यामुळे बेबाईने मराठीत M.A. करायचा निर्णय केला. आता वर्ग घराजवळच्या बिंझाणी महाविद्यालयात नाही तर आपण सध्या जिथे राहतो त्या पश्चिम नागपूरात नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर विभागात भरत. आतापर्यंत सर्व शिक्षण घरासमोरच्या पाताळेश्वर मार्गावरच होते. आता बेबाबाईला बसने वगैरे जावे लागे. पों पों. हेही तसे एक मोठे पाऊलच होते त्या काळी. 

मराठी शिकवायला त्याकाळचे दिग्गज साहित्यिक व समीक्षक असत. प्राध्यापक द भि कुळकर्णी, प्रभुदेसाई, बाबगावकर, शं. दा. पेंडसे, भ. श्री. पंडित या दिग्गजांच्या नावाचा बरेचदा उल्लेख होत असे. घरी मराठी साहित्यावर अनेक अभ्यासपूर्ण पुस्तके दिसू लागली. मीही ती चाळत असे. माझाही बराच अभ्यास झाला. 

काही गोष्टी मला खूपच आवडल्या. सध्या वापरात असलेल्या मराठी शब्दांची व्युत्पत्ती काय यावरचे ज्ञान तर मला माझ्या कीर्तनात खूपच कामी येते. वापरातला शब्द तत्सम आहे, की तद्भव आहे हे कळले. ब्राह्मण हा मूळ संस्कृतातला शब्द. आजही  तसाच वापरतात. म्हणून तो तत्सम. पण बामन म्हणाल तर तो मूळ संस्कृत शब्द ब्राह्मणचा घासून झिजून झालेला अपभ्रंश. ब्राह्मण पासून उद्भवलेला शब्द. म्हणून तत्सम नसून तद्भव. सांग बरे मग शेंडी हा तत्सम की तद्भव शब्द.

ब्रह्मा: हं. तत्समोद्भव किंवा तद्भवोत्सम असेल. काय लेकरा, दिले की नाही उत्तर?

नारद: लई हुशार आहेस रे बाबा. अरे इतके वर्ष मी अभिमानाने शेंडी बाळगतो. पण तो शब्द मूळ संस्कृत नसून तद्भव आहे हे मला कळायला बेबाबाईला M. A. करावे लागले. मूळ संस्कृत शब्द शिखंडिका आहे म्हणे. मग तोच झिजून, शिहंडिका झाला व आणखी कुरतडल्या जाऊन कालांतराने शेंडी झाला. काय माहीत, काही शतकांनंतर शेणी सुद्धा होईल. असो. बाळ अभ्यास करतांना जसे ग्रीक मूळाक्षरातले गॅमा, लॅंबडा, अल्फा, बीटा असे ऐकू येई तसेच बेबी तद्भव शब्दांच्या व्युत्पत्ती घोटतांना शिखंडिका, शिहंडिका, शहंडी, शेंडी असे काहीतरी सतत घोटत असे असे मला आठवते. सुरुवातीला मला असे वाटायचे की माझे वाड्यातील गुप्त वास्तव्य ह्या हुशार मुलीच्या लक्षात आले आहे व ती मला म्हणूनच मुद्दामून चिडवीत आहे. पण नंतर कळले की व्युत्पत्ती हा अभ्यासक्रमातला एक विषय आहे व ती शेकडो शब्दांची व्युत्पत्ती पाठ करीत आहे. त्यातच एक शब्द शेंडी. चोराच्या मनात चांदणे, आणखी काय?

ब्रह्मा, तू मला लेकरू म्हणाला. हा शब्द संस्कृतजन्य नाही. इतर कुठल्याही भाषेतून आला नाही असे म्हणतात. अशा शब्दांना देशीय शब्द म्हणतात. तत्सम, तद्भव, देशीय व इतर भाषातून आलेले अशी मराठी शब्दांची वर्गवारी करता येईल. अशी समावेशक वृत्ती असल्यामुळे मराठी भाषा अत्यंत समृद्ध झाली आहे. जिवंत आहे. नाहीतर तीही मृत झाली असती. उगाच संस्कृतनिष्ठता जपली तर भाषा सामान्यांपासून दूर जाते. आता तूच मला ‘तुझा उनाडपणा मला आवडत नाही’ ऐवजी ‘तुझे औनाड्य मला आवडत नाही’ म्हणाला किंवा ‘तुझे कीर्तन थिल्लर असते’ असे म्हणण्याऐवजी ‘तुझे कीर्तन थैल्लर्यशील असते’ असे म्हणाला तर तुझेच हसें होईल. हे मी अशासाठी सांगतो की आपली बेबाबाई मराठीची विदुषी असली तरी तिच्या आयुष्याच्या आजवरच्या प्रवासात तिने इतके काही स्थानीय शब्द सामावून घेतले आहे की तिचे लेखन व बोलणे काही शुद्धतेच्या भक्तांना कदाचित आवडणार नाही. खूप गदगद असली तर ती ‘काय प्रचंड उकाडा आहे’ असे न म्हणता ‘अगदी पिच्च वाटते’ असे म्हणते. हा पिच्च व इतर शब्द तिचे खास आवडीचे आहे. पण कधी कधी ती मधेच शब्दांचा शब्दश: अर्थ घेऊन मनोरंजनही करते. वाड्यातला एक प्रसंग मला आठवतो. मास्तरांच्या राहत्या घराची माडी, म्हणजे वरचा मजला, रिकामा आहे का असे कोणी चौकशी करायला आला होता. बिचाऱ्याने नागपूरच्या भाषेत बेबीला विचारले की माडी खाली आहे का? तर बेबी त्याला हसून म्हणाली ‘नाही, माडी वर आहे.’. आता घ्या म्हणावं. तो माणूस जो उसळला तो सरळ माडीवरच गेला.

सावरकरांनी गांधींच्या अतिसत्यतेवर एक व्यंगपूर्ण लेख लिहिला होता. त्यात एका सोनूबाई नावाच्या बाईला ते म्हणतात ‘तू काही खरी सोन्याची नाही. मग स्वत:ला सोनूबाई कां म्हणतेस? असा खोटेपणा करू नये. तू ठेंगू आहेस, तर स्वत:ला ठेंगूबाई म्हण. आणि तुझ्या मुलाचे नावही बदलून ठैंग्य ठेव. ब्रह्मा भाषेच्या बाबतीत शुद्धतेचा आणि सत्याचा अतिरेक झाला तर विचारांची सुलभ देवाणघेवाण हे जे भाषेचे मूळ कार्य आहे तेच धोक्यात येईल. मराठीची विद्वान बेबाबाईने हे भान नेहमीच ठेवले आहे. तिची मराठी ही अत्यंत प्रवाही व सर्वसमावेशक असते. कुणाला आवडो, नावडो. तू तिचा ब्लाॅग वाच. म्हणजे तुला समजेल मी काय म्हणतो आहे ते. घे ही लिंक. 


पण एक गोष्ट मात्र मला कधीकधी थोडिशी खटकते. ती लिहून झाले की ते पुन्हा वाचत नसावी. वाचून एकदा आपलेच समाधान करून घेतले, एखादा मुद्दा विस्तारला, कुठे थोडीफार काटछाट केली तर तिचे लिखाण अधिकच देखणे व प्रभावी होईल. पण लगेच वाटते की तसे केले तर त्यातील उत्स्फूर्तपणा, ओघ, आंतरिक जिव्हाळा, त्यातील बेबाबाईची वाट लागेल. जे सहज ते सहज. तू वाचच हा ब्लाॅग. त्यातील बाळशास्त्रींवरचा लेख तर वाचच वाच. त्यांचे पण हे जन्मशताब्दीचे वर्ष आहे.


ब्रह्मा: अरे आधी हा बेबाबाईचा गोंधळ तर पूर्ण कर. किती होमवर्क देत असतो रे.

नारद: अच्छा चल पुढे. पण ब्रह्मा, मला वाटते हा तिच्या गोंधळाचा पूर्वार्धच आहे बरे. उत्तरार्ध येईल पण ते पाच गोंधळी वेगळे असतील असे म्हणतात. सध्याचे पाच गोंधळी तिच्या पूर्वाश्रमावरच गोंधळ करतात. उत्तराश्रमाचा गोंधळ असाच कधीतरी वावटळीत माझ्या शिखंडिकेत येऊन अडकेल याची मला खात्री आहे. मग आपण तोही वाचू. मधल्या काळात तू तिचा ब्लाॅग वाचून भूक भागव.

दोन वर्षात बेबीने M.A. चा अभ्यासक्रम पूर्ण केला व तिला नागपूर विद्यापीठाची पदवी मिळाली. याच काळात बेबाबाईने विदर्भ साहित्य संघाची मराठी साहित्य पारंगत ही पदवीही मिळविली. त्यातही ती प्रथम श्रेणीत पहिली आली. अगदी First Class First. एकमेवाद्वितीय. विदर्भ साहित्य संघाने सुवर्ण पदक प्रदान करून तिचा सत्कार केला. तिचे महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्तीवर झाले. M.A. मध्ये तर तिला किंग एडवर्ड मेमोरियल स्काॅलरशिप मिळाली. त्या काळी दरमहा १०० रुपये. पण पैसा तसा गौणच. त्यामागे तिच्या हुशारीची घेण्यात आलेली दखल व त्यात अभिप्रेत असलेला जो सन्मान तो महत्त्वाचा. 

असे दुहेरी यश मिळाल्यावर मग काय? तिला ब्रह्मपुरीच्या नेवजाबाई हितकारिणी संस्थेने मराठीची अध्यापिका म्हणून त्यांच्या ब्रह्मपुरीच्या महाविद्यालयात रुजू होण्याकरिता विनंती केली. सारा वाडा हादरलाच. प्रमोद मुंबईला गेला. आता बेबाबाई ब्रह्मपुरीला जाणार? 

मुलींनी परगावी एकटे राहून नोकरी करणे हे त्याकाळी जवळजवळ अमान्य होते. तशी मुभा फक्त मुलांना होती. पण वाडा काही सामान्य नव्हता. तो मोहरीरांचा वाडा होता. सर्व विचारांती आईबाबांनी बेबीने चालून आलेली संधी स्वीकारावी असे ठरविले. ठरविले काय, तिला तशी अनुज्ञा दिली. आणि बेबाईनेही हे आव्हान तत्कालीन विरोधाला नजरअंदाज करून स्वीकारायचे ठरविले. गोंधळी याची तुलना झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने राज्यावर संकट येताच आपण एक स्त्री आहोत हे विसरून झाशीच्या किल्यावरून रात्रीच्या काळोखात अश्वारूढ होऊन स्वारीवर जाण्याचा जो निर्णय घेतला व तटाहून घोडा फेकला त्या घटनेशी करतात.

बेबीनेही शिक्षण क्षेत्रातच प्रवेश घेतला. मला पुन्हा बाळविजयातले आईचे ‘कुठेतरी वाडा तुज अंगी, शिक्षण वाड्याचा पेशा’ हे शब्द आठवतात. बेबीचे हे पाऊल एका दृष्टीने ‘पाउलवाटा अनुजांना देणारा अग्रज तू तू तू’ शी मेळ खातात असेही मला वाटते. ‘तू’चे ‘ती’ आणि ‘देणारा’ चे ‘देणारी’ केले की झाले. बाळ आणि बेबीचा हा समानांतर प्रगतीचा आलेख ‘बुद्धिबळाने वाड्याचा तू कायापालट करशील’ या आईच्या विश्वासाला सार्थक ठरवीत त्यावर शिक्कामोर्तबच करतो.

ब्रह्मा: हं. आता मला कळते की बाळ आणि बेबी ही ज्येष्ठ पुत्र व कन्या यांची नावे इतकी रूढ कां झाली. नावावर न जाता त्या दोघांनी घरोघरी असा कायापालट करावा अशी सर्वांचीच अपेक्षा असावी. आता मी पण नारूला बाळ आणि सरूला बेबी म्हणत जाईन.

नारद: आता हे नारू आणि सरू कोण?

ब्रह्मा: अरे नारू म्हणजे नारद. सरू म्हणजे सरस्वती. तुम्हा बहिणभावांच्या नावाचं लडिवाळीकरण केलं मी, जसे हे मानव आपल्या मुलांच्या नावाचं करीत असतात.

नारद: I see. नशीब नाऱ्या म्हणाला नाहीस. असो.

तर ब्रह्मा, बेबीने ब्रह्मपुरी अक्षरश: गाजवली. तिची उत्कृष्ट अध्यापिका म्हणून ख्याती व कीर्ती झाली. एक वर्षातच तिला गोंदिया शिक्षण संस्थेने त्यांच्या तुमसरच्या महाविद्यालयात अध्यापिकेची नोकरी देऊ केली. मराठी कसे शिकवावे याचा दर्जेदार नमुना त्यांच्या संस्थेलाही जवळून पाहता यावा हाच त्यांचा उद्देश असावा. ब्रह्मा, एकदा झाशी सोडल्यावर काल्पी काय आणि ग्वाल्हेर काय. बेबाबाईनेही तुमसरला कूच केले व आपले सर्वस्व ज्ञानदानाला झोकून दिले. तब्बल सात वर्षे तिने हे व्रत केले. बाळासारखेच ‘ज्ञानदान नव अध्यायी ज्ञानार्जन नव नित साथीला । पाहता पाहता आवडता तू होशी रे विद्यार्थ्याचा ।।’ बेबीलाही लागू पडते. बाळासारखा संघर्ष मात्र हिच्या वाटणीला आला नाही. आपण बरे, आपले काम बरे अशीच तिची वृत्ती असल्यामुळे असेल कदाचित. तिचे अस्खलित बोलणे व ‘हो किनई’ म्हणत म्हणत खुंट हालवून बळकट करून घेणे तर इतके प्रसिद्ध झाले की ती होकिनाई मॅडम म्हणूनच प्रसिद्ध झाली.

होकिनाई मॅडममुळे या सर्व गावी मराठीच्या विद्यार्थ्यांना घम घम विद्या आली. त्या काळी दिवाळीत लक्ष्मीबॉंब नावाचा फटाका त्याच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे प्रसिद्ध होता. बेबीची कीर्तीही त्याच तोडीची होती असे गोंधळी म्हणतात. ढम्म ढम्म ढम्म कीर्तीढोल वाजतच राहिले. पण काळ का कधी थांबला आहे? नदीचे पाणी काय वाहायचे थांबले आहे? बेबाबाईच्या नदीचेही आता पात्र बदलले. नदीने नवीन वळण घेतले. तू घे हाती ढोल.

गोंधळ मांडिला गं अंबे गोंधळ मांडिला
गोंधळ मांडिला ग बेबी गुंता किती झाला
फणी घेउनी आईनी तो गुंता सोडविला
गोंधळ मांडिला ब्रह्माई गोंधळ मांडिला
गाठी मारता जगभऱ्याच्या गुंता किती केला
चातुर्मासी जागजागुनी तू गं सोडवला
गाठ सापडे मुकुंद गीता चित्रगुप्त वदला 
स्वत: येउनी सेवासदनी पुन्हा गाठ बांधिला
सात पावले बेबाई अन मुकुंद सोबतीला
फार व्याप केला बाबा, बाईने पदर बांधिला
धुडुम धाड वाजंत्री वाजे बार अता उडविला
गोंधळ मांडिला गोंदियाई ये गोंधळाला
गोंधळ मांडिला अकोलाई ये गोंधळाला
गोंधळ मांडिला ग अंबे गोंधळ मांडिला
गोंधळ मांडिला नारदे गोंधळ मांडिला 
गोंधळ मांडिला मुनीने गोंधळ मांडिला

ब्रह्मा: हं, कळल बरं मला. शेवटी दोन ओळी तू घुसडून दिल्या. आपलही नाव यावं म्हणून. पण तो मिस्किलपणा मला मुनीच्या खट्याळ डोळ्यात दिसला. मी तुला चांगलाच ओळखून आहे गोंधळ्या.

नारद: अरे गंमत केली. तू उगीच ऐकायच म्हणून ऐकतो आहेस की मन लावून ऐकतो आहेस हे जरा पाहायचं होत. चांगले शिक्षक शिकवताना असे करतात. मधूनच असे काही असंबद्ध, चूक बोलतात, फळ्यावर लिहितात आणि पाहतात मुले काही आक्षेप घेतात का ते. शिकवणाऱ्याला कळते वर्ग जागा आहे की झोपला आहे ते. बरं ते असू दे. आज आपल्याला लग्नाला जायचे आहे. चल लवकर.

ब्रह्मा: कोणाचे लग्न? आधी काही तू बोलला नाहीस. 

नारद: अरे तूच ठरविलेले लग्न आहे. गोंधळाच्या ह्या अंकात त्याच तर लग्नाचा उल्लेख आहे. स्वर्गामधे बसून तू अहो आणि अगंच्या अगणित गाठी मारत असतोस. त्या मग एक एक करून चित्रगुप्त पृथ्वीवर आणतो व तशीच गाठ मग नवरदेवाच्या सोवळ्याची व नवरीच्या शालूच्या पदराची मारतो. अशी गाठ बांधून अग्नीच्या साक्षीने सात पावले चालले की झाले लग्न. तुला घेऊन गेलो होतो मी श्रीनिवास कल्याणीच्या  आणि कौस्तुभ वैजयंतीच्या लग्नाला हे सर्व दाखवायला. 

बरेचदा तुझ्या वेंधळेपणामुळे तू बांधलेल्या गाठींचा गुंता होऊन जातो. एक वेळ लांब केसांचा झालेला गुंता सोडवता येईल. पण तू केलेला गुंता सोडवायला महिनोनमहिने लागतात. बरेचदा मग तू चातुर्मासात सर्व देवांची सुटी रद्द करून त्यांना गुंता सोडवायला लावतो. १९७५ मध्येही असेच झाले. असाच महागुंता सोडवता सोडवता चित्रगुप्ताला तू बेबीची मुकुंदाशी बांधलेली गाठ सापडली. ताबडतोब तो ती गाठ घेऊन पृथ्वीवर आला. आणि गीता सदाशिव मोहरीरचे मुकुंद गोविंद पाटखेडकरशी लग्न झाले. लग्न आईबाबांच्या अथक प्रयासाने बर्डीवरच्या सेवासदनला संपन्न झाले. धूमधडाक्यात. पूर्वाश्रमीची गीता आता संगीता मुकुंद पाटखेडकर झाली. तिचे वैवाहिक जीवन सुरू झाले. कुटुंबाची जबाबदारी आपल्या आईसारखीच सक्षमतेने पार पाडता यावी म्हणून की काय, बेबाबाईने नोकरीवर पाणी सोडले. अध्यापिका आता गृहिणी झाली. गीता आता संगीता.

एक अध्याय संपला. ब्रह्मा, वाड्यातल्या पाच गोंधळ्यांचा गोंधळ इथेच संपतो. पण बेबाबाईचा गोंधळ संपत नाही. बेबाबाई २ वर्षांनी पंच्याहत्तरी गाठेल. आता तिचे स्वत:चे ५ गोंधळी आहेत. ते गोंधळाचा उत्तरार्ध मांडतील अशी आशा करू या. बेबेश्वरीच्या आयुष्यपटाच्या त्या भागाचे तेच खरे साक्षीदार. 

ब्रह्मा: फारच अकस्मात गोंधळाचा हा भाग संपवला रे. तास संपला की जसे शिक्षकांना आटोपते घ्यावे लागते तसेच. असो. थोड्यात गोडी, पुढे यावी गोंधळ्यांची नवी पिढी. 

नारदाई, बाळविजय जसा आपण सलग शेवटी वाचला होता तसे करायचे का? एका दमात बेबाबाईचा गोंधळ वाद्यासकट पुन्हा एकदा करू. 

ब्रह्मा नारद गोंधळी
बेबाबाईचे गोंधळी
अकोलाईचे गोंधळी
हो बेबाबाईचे गोंधळी

नारद: चल तर. तू वाच कागद घेऊन. मला आता पूर्ण पाठ झाले आहे. होऊ दे दोघांच्या आवाजात गोंधळ. आज तिचा जन्मदिवस पण आहे. ज्येष्ठ वद्य त्रयोदशी. सूर्योदयापर्यंत गोंधळ करू. पण इथे नको. काकाकाकू उठतील. चल बाहेर मैदानात.

आम्ही अंबेचे गोंधळी
हो आम्ही अंबेचे गोंधळी
हो आम्ही आईचे गोंधळी
जगदंबेचे गोंधळी
तुळजाईचे गोंधळी
रेणुकाईचे गोंधळी
हो आम्ही अंबेचे गोंधळी
हो


आम्ही शब्दांचे गोंधळी
हो आम्ही भाषेचे गोंधळी
मायबोलीचे गोंधळी
हो मायभाषेचे गोंधळी
कंठ ओठांचे गोंधळी
जीभ दातांचे गोंधळी
शब्दनादाचे गोंधळी
शब्द अर्थाचे गोंधळी
हो मरहाटीचे गोंधळी
हो आम्ही अंबेचे गोंधळी
हो आम्ही वाड्याचे गोंधळी


गोंधळ माडिला ग अंबे गोंधळ मांडिला
माहुरगडच्या रेणुकाईचा गोंधळ मांडिला
गोंधळ मांडिला रेणुके गोंधळ मांडिला
तुळजापूर भवानी आई गोंधळ मांडिला
कोल्हापुरचे अंबाबाई गोंधळ मांडिला
नाशिकातली सप्तश्रुंगी गोंधळ मांडिला
वणी वाड्याची माय देवता गोंधळ मांडिला
आम्ही अंबेचे गोंधळी आज गे गोंधळ मांडिला
नेवजाबाईचे बाई आज गे गोंधळ मांडिला
हितकारिणीचे बाई आज गे गोंधळ मांडिला
बेबाबाईचे गोंधळी आम्ही गोंधळ मांडिला. 

आम्ही बेबीचे गोंधळी, हो बेबाबाईचे गोंधळी
जेठाबाईचे गोंधळी, हो अकोलाईचे गोंधळी
गीताबाईचे गोंधळी, हो गोंदियाईचे गोंधळी
संगीताईचे गोंधळी, हो तुमसराईचे गोंधळी
बाबा आईचे गोंधळी, हो बाळ बेबीचे गोंधळी
आम्ही वाड्याचे गोंधळी, हो पाच तोंडांचे गोंधळी
आम्ही बेबीचे गोंधळी, हो बेबाबाईचे गोंधळी

गोंधळ मांडिला गोंधळी पाच खालच्यांनी
बाळ कळवळे पाठीवरती पाय तुझा पडुनी
स्वातंत्र्याला दोनच उरता वाड्या आली धनी
सातव्यातल्या सातव्यास येई भुईवर भगिनी
गोंधळास येई आज गं बये सांख्ययोगिनी
दुसऱ्या अध्यायास पीतसे लीलया भवानी
यावे गीता गीताई बेबाबाई नावानी
गोंधळ मांडिला गोंधळी पाच खालच्यांनी

गोंधळ मांडिला तुझा तू ये सांगायाला
गं बेबे ये सांगायाला
आम्ही नव्हतो जेव्हा पाठीवर तू पाय दिला
जमीनीवर तू पाय दिला
ज्येष्ठाच्या त्या सरी भारी पडती गं वळचणीला
गर्जती घन आकाशाला
वद्य त्रयोदशीस येशी आजोळी वणीला
खबर पोहोचे मग वाड्याला
आई मोठीआई अण्णाजी तुझिया दिमतीला
मावशी शांत सोबतीला
तुझ्या गोंधळी सांग तूच भोकांड गोंधळाला
दाखवी रडून पाचाला
कशा दिशा दुमदुमल्या ऐकुनी तव कंठरवाला
ऐकुनी तव कंठरवाला
गोंधळ मांडिला तुझा, तू ये सांगायाला
गं बेबी ये गोंधळाला
गं बेबी ये सांगायाला
गं बेबी ये गोंधळाला

गोंधळ मांडिला जेठीजेठे ये चौकीवरी
आले बाबा घरी पहाया पोरी ती गोजिरी
गोंधळ मांडिला गं पोरी पाळणा बांधिला
साता साताची सातशेची सांगितली तुला
बाळोबा बोबडे बोल गीता गीता वदला
पहिला तो अध्याय, बेबी तू दुसरा साथीला
जाता पाच आठोडे आली तू आता वाड्याला
गोंधळ मांडिला ओसरीत ये गोंधळाला
सपरीमधे ये, अंगणी ये गोंधळाला
उतरावे अंगणी लंगडी टिक्करबिल्याला
बेबी बाळा खेळा आता नदी पहाडाला
झबले परकर पाचवारी दावी तू प्रगतीला
गोंधळ मांडिला तुझा गे ये गोंधळाला
गं बेबी ये गोंधळाला
गं गीते ये गोंधळाला
संगीते ये गोंधळाला


गोंधळी गोंधळ मांडिती आता शाळेचा
पहिला वहिला बेबी गुंफते मणी यशमाळेचा
मध्य प्रांत वऱ्हाड प्राथमिक चार तुकड्यांचा
बाळाचे धरुनिया बोट चालली रस्ता शाळेचा 
तो चौथ्या तुकडीत, बेबाई जाई पहिलीला
बहिणा प्रमोदची, अपेक्षा पूर्ण तू गं केल्या
तेच तेज, तीच आभा गणपति सरस्वती एक
टालाटुले धन्य, आधी तो, मागुनी ही लेक
पाटी पेंसिल दौत टाक शस्त्रे ह्या अंबेची
रोज निघतसे वारी घरूनी पाताळेश्वराची
गोंधळी गोंधळ मांडिती आता शाळेचा
अकोलाईचा, छोटीआईचा, होकिनाईचा
ये बेबाई रंगव किस्सा तुझिया विजयाचा


उघड उघड उघड उघड उघड उघड उघड
बेबाई तू बिंझाणीचे किवाड आता उघड
उघड उघड उघड उघड उघड उघड उघड
शारदाई तू आठीआठे जेठीसाठी उघड 
उघड उघड उघड उघड उघड उघड उघड
ब्रह्माई तू आता नवनाट्याचा पडता उघड
उघड उघड उघड उघड उघड उघड उघड
गजवदनाई तुझा खजिना बेबईसाठी उघड
उघड उघड उघड उघड 
उघड उघड उघड उघड 
उघड उघड उघड उघड
उघड उघड उघड

घ्या ना बाई चुलीची माती
दारावरती आली होती
घोटून गिरवून बेबाबाईनं 
मातीची चूल बनविली होती

चुलीवरती रांधा झाला
धूरामधे वाढून झाला
थाळ्यानंतर उष्टी काढा
दिवस गेला, संपला पाढा

रोज रात्री दुसरा पाढा
पायली पुसा, गूल काढा
मिणमिण मिणमिण उजेड पाडा
शास्त्रे वाचून डोळे फोडा

उकळा उकळा तर्कशास्त्र
समाजशास्त्र, मानसशास्त्र
तत्वज्ञान चवीला घोळा
काढा कोळून उतरा गळा

गोंधळी जोडीला काढती गळा
तुला त्यांचा किती कळवळा
काय गावे छोटीआईच्या गोंधळा
फुकाचे बोल, शब्दांचा मळा

ये गं बाई तू गोंधळा
ये गं तुझिया तू गोंधळा
ये गं माई तू गोंधळा


ढम्म ढम्म ढम्म ढम्म
छडी विना छम्म छम्म
विद्या आली घम्म घम्म
ढम्म ढम्म ढम्म ढम्म

शारदाई हो प्रसन्न
शास्त्रे मरहाटी अनन्य
दुहेरी स्नातकी संपन्न
धन्य धन्य धन्य धन्य
ढम्म ढम्म ढम्म ढम्म

पुढे दुहेरी पारंगत
विद्यापीठ करी स्वागत
साहित्य संघही पुरस्कृत
अध्यापकी येत चालत
तटाहून राणी घोडा फेकत
बाळानंतर वाडा सोडत
करी नवे आव्हान स्वीकृत
गोंधळ्यां आठवे बऱ्हम्म
ढम्म ढम्म ढम्म ढम्म

ढमक ढमक ढम्म ढम्म
कीर्ती ढोल ढमक ढम्म
तुमसर आणि पुरीब्रह्म
कीर्ती लडी धाड धुडुम
ज्ञानदान परम ब्रह्म
होकिनाई देई घम्म
सर्वदूर लक्ष्मि बम्म
ढम्म ढम्म ढम्म ढम्म

गोंधळ मांडिला गं अंबे गोंधळ मांडिला
गोंधळ मांडिला ग बेबी गुंता किती झाला
फणी घेउनी आईनी तो गुंता सोडविला
गोंधळ मांडिला ब्रह्माई गोंधळ मांडिला
गाठी मारता जगभऱ्याच्या गुंता किती केला
चातुर्मासी जागजागुनी तू गं सोडवला
गाठ सापडे मुकुंद गीता चित्रगुप्त वदला 
स्वत: येउनी सेवासदनी पुन्हा गाठ बांधिला
सात पावले बेबाई अन मुकुंद सोबतीला
फार व्याप केला बाबा, बाईने पदर बांधिला
धुडुम धाड वाजंत्री वाजे बार अता उडविला
गोंधळ मांडिला गोंदियाई ये गोंधळाला
गोंधळ मांडिला अकोलाई ये गोंधळाला
गोंधळ मांडिला ग अंबे गोंधळ मांडिला


ब्रह्मा नारद गोंधळी
बेबाबाईचे गोंधळी
अकोलाईचे गोंधळी
हो बेबाबाईचे गोंधळी
हो

पूर्वार्ध संपन्न

अरुण सदाशिव मोहरीर
ज्येष्ठ वद्य त्रयोदशी
जुलै ११, २०१८


Popular posts from this blog