बाळ
नारद: ब्रह्मा, चल रे बाबा परत. जरा बदल हवा, पाणी तुंबू नये म्हणून देवघर सोडले. गेले आठ दहा महिने बरीच भटकंती झाली. आपल्या अखत्यारीत नसलेले, वेगळेच देव मानणारे, आपली पूजा न करणारे, संस्कृत तर सोड, पण मराठी हिंदी सोडून वेगवेगळ्याच भाषा बोलणारे, काही आपल्या कन्हैय्यापेक्षाही कृष्णतर तर काही आपल्या राधेपेक्षाही अधिक गौरवर्णी, तरीही अगदी आपल्या मनुपुत्रांसारखीच घडण असलेले, तसेच नाकी डोळी नीटस, थोडाफार मेकअप केला तर अगदी मानव वाटतील असे इतर जीवही पाहिले. त्यांचेही देव पाहिले. त्यांचीही आपल्या मंदिरांचाच दर्जा असणारी पूजास्थाने पाहिलीत. त्यांच्या प्रार्थनेतला एक शब्द कधी कळेल तर शपथ, पण ते कोणाचा तरी धावाच करीत आहेत यात शंका नसावी असे त्यांच्याच भिन्न भिन्न भाषातले मंत्रोच्चार ऐकले. आपल्या नागपूर नगरीकडे जेवताना जसे हात जोडून
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।।
किंवा
जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।।
म्हणतात व नंतरच घास घेतात, तसेच येथेही जेवणापूर्वी हाताची फुली छातीवर ठेवून किंवा हाताने हवेतच अधिकचे चिन्ह गिरवून
God is great and God is good
And we thank Him for our food
By His hand we all are fed
Give us God our daily bread
म्हणतात. कुठेतरी वाटते की त्यांचेही ब्रह्मा विष्णु महेश, स्वर्ग नरक असावेत. त्यांचेही सण असावेत, नवरात्र असावेत, त्यांच्या भाषेतल्या प्रार्थनेचाही भाव
अन्नं ब्रह्मा रसो विष्णुः भोक्ता देवो महेश्वरः ।
इति संचिंत्य भुञ्जानः अन्नदोषैः न लिप्यते ॥
असाच असावा. यांचाही पापपुण्याचा हिशोब ठेवणारा चित्रगुप्त असावा. सर्व काही आपल्यासारखेच असावे, फक्त देव आणि भाषा वेगळी असेल असे वाटते. येथे आल्यापासूनच मला यांचेही प्राचीन गद्य पद्य वाचावे असे बरेचदा वाटले. यांचेही व्यास असले पाहिजे अशी मला दाट शंका होती. काकाकाकूंकडे जसे आपण चोरून इंटरनेटवर काहीतरी शोधून वाचत असू तसे येथेही मी करून पाहिले. येथेही जाॅन-जेनी झोपले की सारे घर, काँप्यूटर आपलेच असते. काँप्यूटर मात्र सर्वत्र सारखेच दिसते. येथे सफरचंदाचे काँप्यूटर असते असे म्हणतात. यांच्या भाषेत अॅपल की काय म्हणतात. आपल्यासारखे कंट्रोल आल्ट डिलीट नसते, पण लाॅगइन, पासवर्ड तसेच. तोच 'तिळा तिळा दार उघड'चा प्रकार. इंटरनेटवर यांचेही काही भागवत वगैरे आहे काय शोधले. आपल्या महाभारतासारखेच यांचेही एक महाकाव्य सापडले. 'होमर' नावाच्या गृहस्थाने, म्हणजे यांच्या भाषेत जेंटलमनने, रचले आहे असे म्हणतात. तोच यांचा व्यास असावा. हजार किंवा हजारो वर्षापूर्वीची ही रचना Homer's Odyssey म्हणून प्रसिद्ध आहे. पण वाचताना मजा नाही आली रे. 'नारायण नारायण' म्हणणारा नारद ज्यात नाही ते काय भागवत झाले? ती काय ओडिसी झाली? असो! आपण काय त्यांना सांगावे!
पण ब्रह्मा, आता मात्र ओढ पुन्हा घराची.
घरून निघतांना परत तेथे कधी जाऊ असे वाटले नव्हते. वाटले होते की एवढी अफाट तुझी सृष्टी आहे. ती पाहता पाहता सहज कल्प संपेल. नव्या कल्पात आपण असू नसू कोणास ठाऊक! तुझे ते आपण पृथ्वीवर मुक्काम हालवण्याआधीचे शब्द खरे असतील तर याही कल्पात, या युगात, या काळात, या घडीला तरी आपण कुठे आहोत? तुझ्या मते आपण कल्पनेत आहोत, निराकार आहोत, निर्गुण आहोत, देवळा-रावळात आहोत, देवघरात आहोत, तसबिरीत आहोत, मनामनात आहोत. पण तरीही माया आहोत. ब्रह्मा, त्या नसलेल्या स्वर्गात मी तुला विचारले होते की सत्य काय आहे. तेव्हा तू मला जे सांगितले होते ते ब्रह्मज्ञान मला काल एका ब्लाॅगवर योगायोगानेच पुन्हा दिसले. वाचून पुन्हा जुने धागे गवसले.
नारदा माझ्या हातात काही रे नाही
निसर्ग सर्वोपरी रे, मी कोणी नाही
चित्रगुप्ताच्या वहीची रे कोरी पाने
जीवबुध्दीवर त्याचा अंकुश नाही
मानवाची कल्पना मी, त्याचा निर्माता नाही
त्याने ना मानता मी कोणी ब्रह्म नाही
कैलास नाही, वा आकाशी स्वर्ग नाही
मी ब्रह्म नाही, वा माझी माया रे नाही
नारदा सत्य हे कधीही दबत नाही
नारदा तूही नाही नी मीही रे नाही
मानवच श्रेष्ठ, त्याची आपण छाया
मी ब्रह्म नाही रे, आहे मी त्याची माया
मजा आली वाचून. बाकी हा इंटरनेट प्रकार मात्र फार छान हं. घरापासून इतके दूर, अनोळखी प्रदेशात आपण वाट चुकलेले अदृश्य दोघे. पण या जाॅनच्या आयपॅडवर काल चोरून जरा सर्फिंग करू जाता पुन्हा ते ओळखीचे संदर्भ दिसले रे. पुन्हा एकदा सदाशिवसृष्टी सापडली. पुन्हा एकदा मी वाडा वाचले. आणि पुन्हा एकदा मन वाड्यात गेले. आज रात्री जाॅन आणि जेनी झोपले की तूही वाच. मग तू म्हणशील तर जाऊ पुन्हा परत आपल्या ओळखीच्या टापूत.
http://sadashivsrushti.
ब्रह्मा: नारदा, काल तू झोपल्यावर असेच नेटवर सर्फिंग करता करता मलाही ही 'बाळ' नावाची कविता आढळली. तुला सांगणारच होतो. अरे चक्क आपल्या भाषेत ही कविता. म्हणजे संस्कृत नाही, पण मराठीत. नारदा, मन वढाय वढाय रे! पुन्हा नकळत थेट नागपूर नगरीत गेले. इच्छास्थळी मुने, चल, धर माझे बोट, कर परतीची इच्छा, आणि चल क्षणात तेथे. तीच आपली धरती अन् तेच आपले आकाश. जाऊ दे आपल्या दोन सावल्या पुन्हा काकाकाकूंकडे. पण जरा बाळ कवितेचा प्रिंटआऊट घेतोस का? काकाकाकूंचा काँप्यूटर बंद असेल तर पंचाईत येईल. तेथे पोहोचल्यावर मग वाच आणि मलाही समजावून सांग. पहिल्या दोन ओळी मी वाचल्या, चारही डोकी खाजवली, पण फारसा काही उजेड पडला नाही. रामायणाचा संदर्भ काही नीटसा कळला नाही.
१४ वर्षे झाली बाळा तू वनवासाला गेला
परत राम सुद्धा आला रे, तू कैसा नाही आला?
नारद: हं. मी येतो तेवढे काम करून. मी आलो की आपण निघू. इथेच थांब. जाऊ नकोस कुठे.
हं. आलो बघ घेऊन. घे हा प्रिंटआऊट. नीट ठेव. हलगर्जीपणा नको. नाहीतर हयग्रीव चोरून न्यायचा वेद चोरले तसा. तू चातुर्मासात झोपला असतांना तुझ्या नाकावाटे डोक्यात जाऊन त्याने वेदांची चोरी केली होती.
ब्रह्मा: पण तुला इतका उशीर कां झाला? पूर्ण कविता वाचत बसलास की काय? तुझे डोळे असे सुजलेले कां? रडला बिडला की काय?
नारद: नाही रे ब्रह्मदेवा. रडलो बिडलो नाही. अंधारातच पूर्ण कविता वाचली. डोळ्यांवर ताण पडला. डोळा चुरचुरला म्हणून चोळला थोडा. चोळला काय, अगदी रगड रगड रगडला. म्हणून थोडा तांबुसला असेल. बरं, ते सोड. धर माझे बोट. मीट डोळे.
बघ आलोही आपण देवघरात.
ब्रह्मा: अरे खरेच. हेच तर आपले घर. ही आपलीच खोली. हे आपलेच स्वयंपाकघर. भिंती मात्र नव्यासारख्या चकाकतात. रंगरंगोटी झाली वाटते आपण गेल्यावर.
नारद: अरे पण हा खमंग वास कसा? किती युगांनी नाकपुड्यांना मेजवानी. कांद्याचे भजे की काय? ते पिझ्झा, वाॅफल, बरीटो, केसडिया पाहून आणि हुंगून अगदी वीट आला होता. व्वा. अहाहा. ओहो. अगदी कांदेनवमी आहे असे वाटते. अरे खरेच. भिंतीवरचे कॅलेंडर परवाची आषाढीची सुटी दाखवत आहे. म्हणजे आज नवमी. अगदी कांदेनवमीच.
ब्रह्मा: अरे वा! म्हणजे परवापासून चातुर्मास सुरू. देतो चार महिने ताणून. मला तेवढ्यासाठी तर चातुर्मास आवडतो.
नारद: ब्रह्मा, परदेशात जाऊन आलास पण कणभर सुद्धा बदलला नाहीस रे. तुला नेहमी झोपायचीच पडली असते.
ब्रह्मा: तुला नाही का नेहमी खायचीच पडली असते? आज काय कांदाभजी. परवा द्वादशीला काय, पुरणपोळी. मग काय चार महिने सणामागे सण. मार ताव जे दिसेल त्यावर. पण बाबा रे, आधी ती कविता वाच. समजावून सांग. मग मी झोपतो. आठ महिन्यांपासून जागा आहे मी सृष्टिकर्ता.
नारद: ओक्के. तर ब्रह्माजी, ही कविता कोणी लिहिली, कोणावर लिहिली हे मी सांगत नाही. ते तुझे तू समजून घे. तसेही तू बरेच वाचन केले आहेस. तुला कळेलच.
ब्रह्मा, पहिल्या दोन ओळी तू वाचल्याच आहेस. तेथूनच सुरू करू.
१४ वर्षे झाली बाळा तू वनवासाला गेला
परत राम सुद्धा आला रे, तू कैसा नाही आला?
ब्रह्मा, आपल्याच पुत्र कन्यांना आपणच त्यांचे बारसे करून आवडीने दिलेल्या नावांनी त्यांचेच मातापिता कधी हाक मारीत नाहीत. बायका जसे नवऱ्याचे नाव घेत नाहीत तसेच. बायकोने नवऱ्याला अहो म्हणायचे, नवऱ्याने बायकोला अगं म्हणायचे, अगदी तसेच. नाव फक्त आधार कार्डासाठी. मोठ्या मुलाचा व मुलीचा नावाने उल्लेख करणे तर आईबाप कटाक्षाने टाळतात. दृष्ट लागते म्हणे. मोठा मुलगा म्हणजे बाळ, मोठी मुलगी म्हणजे बेबी हे तर घरोघरी असते. तसाच हाही एक बाळ असावा. तो कुठेतरी १४ वर्षांपूर्वी गेला असावा व अजून परत आला नसावा म्हणून त्याच्या आईने केलेला हा विलाप आहे असे समज. नेमकी चौदा वर्षे झाली म्हणून रामायणातल्या रामाचा उल्लेख असावा. कदाचित ह्या आईचा बाळही त्या रामासारखा एकवचनी, एकबाणी असावा. असेही कवीला सुचवायचे असेल. कदाचित राम जसा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र तसा कवितेतल्या आईचा हा बाळही तिचा ज्येष्ठ पुत्र असावा. वनवासाला गेलेला राम जर चौदा वर्षे उलटूनही परत आला नसता तर कौसल्येची किती निराशा झाली असती असा विचार कर. वनवासाला गेला तरी चौदा वर्षांनी का होईना पण माझा बाळ परत येईल या एका आशेवर तर त्या माउलीने चौदा वर्षे काढली असतील. तो येता ना तर तिच्या मनाचा बांध फुटलाच असता ना?
ब्रह्मा, अशा अनेक छटा या दोन ओळीत आहेत. बांधाला तडा जाणार की काय असे ह्या दोन ओळी सुचवतात.
ब्रह्मा: बापरे! इतका का विचार करायचा असतो कविता वाचताना? करतो म्हणा तसा प्रयत्न. पण तुझ्यासारखे जमेल असे काही वाटत नाही. लेस्सी.
नारद: अरे लेस्सी काय? जाॅन जेनीच्या तोंडी हे फार होते. Let us see, 'पाहू आपण काय होते ते' असा त्याचा अर्थ. तू आपला नुसता उच्चार उचलून घेतला. त्या लोकांचे उच्चार असेच निसटते असतात. More ला नुसते 'मो' म्हणतात. फारच फार तर मोर. काका काकू बघ कसा ठसठशीत 'मोऽऽअर' असा उच्चार करतात. आपणही तसेच करावे. निसटते गुळगुळीत उच्चार संस्कृतला कदापि मान्य नाहीत. तो भाषेचा अपमान आहे. एकदा असेच गीतामंदिरात एक मुलगी गीता म्हणताना 'अथैतदप्यशक्तोऽसि' ऐवजी 'अथतदपसक्तोसी' म्हणाली तर ती वाड्यातली मंडळी काय हासायला लागली. तसं आजकाल ब्राह्मणाला बामन म्हणतातच म्हणा. म्हणजे ब्रह्माला बम म्हणतील. बम बम भोले म्हणतात तसेच. असो. कालप्रवाहात सगळ्याची झीज होतेच. पण आपण ती टाळली पाहिजे. आपण आपली संस्कृतनिष्ठा सोडू नये. असो.
ब्रह्मा: ओऽऽक्के, लेट्ट अस्स स्सी. ब्रऽहऽम्म. झाले समाधान? चल आता पुढे. विषयांतर व पाल्हाळ यात तुझा हात कोणी धरू शकणार नाही. मी तुझे कधी चरित्र लिहिले तर त्याचे नाव गोष्टीवेल्हाळ किंवा पाल्हाळ ठेवीन. वाचा पुढे मुनीवर.
नारद: ऐक तर....
चैत्रमासी कृष्णपक्षी माझा कृष्णच आला होता
चैत्रजन्मा ज्येष्ठापत्या! बाबांचा तू रामच होता
रणरणत्या उन्हाने वाडा अनोखा उजळला होता
चौघड्याच्या आवाजाने स्वागताला सज्ज होता
ब्रह्मा, हा कवितेतल्या बाळाच्या जन्माचा अध्याय दिसतो. चैत्राच्या कृष्णपक्षात त्याचा जन्म झाल्यामुळे त्याच्या मातेला तो कृष्णासारखाच होता. नाहीतरी ब्रह्मा, कृष्णाच्या बाललीलांचा जनमानसावर इतका पगडा आहे की प्रत्येक आईला तिचा पुत्र बाळकृष्णच हवा असतो, बाळकृष्णच भासतो, बाळकृष्णच दिसतो. तिच्या बाळानेही कान्हासारखे खूप खोडकर व्हावे असे तिला वाटते. 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव' असा नवविवाहितेला आजही आशिर्वाद देतात. 'नको ग बाई, एकच पुरे' असे ती म्हणते. पण ते एकुलते एक अपत्यही तिला बाळकृष्णच हवे असते. तसेच लोभस, तसेच दैवी, तसेच पराक्रमी. तो भागवतातला कृष्ण अनेक संकटांनतर, विपरीत परिस्थितीत जन्माला आला होता. तोही आठवा पुत्र होता हे प्रकर्षाने लक्षात घ्यायला हवे. म्हणूनच तर 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव' प्रचलित झाले नसावे ना असे मला नेहमीच वाटते. तुझ्या घरी तो आठवा पुत्र कृष्णच अवतरो असा अर्थ त्यात अभिप्रेत असावा. आणखी एक गोष्ट म्हणजे कृष्ण हा आपल्या विष्णूचा नेमका आठवा अवतार. तो तुझ्या कुशीत पुत्र म्हणून येवो असाही त्या अष्टपुत्रा ... आशिर्वादात अर्थ असावा कदाचित.
आपली कवितेतील आई कृष्णभक्त असावी. म्हणून कृष्णपक्षात आलेला आपला बाळ कृष्णच असावा, बाळकृष्ण असावा असे तिला वाटते. तसा कृष्णाचा जन्मही कृष्णपक्षातलाच म्हणा. त्याचाही येथे ओझरता उल्लेख आहे. साध्या साध्या योगायोगात काहीतरी दैवी, शुभ संकेत शोधायची या मनूच्या वंशजांना सवयच आहे म्हणा.
पण ह्याच बाळाचा पिता मात्र रामभक्त दिसतो. राम चैत्रातला. राम दशरथाचा ज्येष्ठपुत्र. म्हणून त्याचा चैत्रात जन्मलेला ज्येष्ठपुत्रही त्याच्याकरिता रामच. एकच घटना. एकच बाळ. पण मातापित्यांना त्यात वेगवेगळा संकेत जाणवतो. तिला कृष्ण दिसतो, त्याला राम. तसे पाहिले तर दोघेही तसे विष्णूच म्हणा! आपला तो सहस्रनामी विष्णू. सातवा काय, आठवा काय, राम काय, कृष्ण काय, कुंद काय, कुंदर काय, कुमुद काय, प्रमोद काय! तोच तो. कोणी का असेना. कोणी का भासेना. माता आणि पिता दोघांचीही मनोकामना पूर्ण करणारा पुत्रजन्म वाड्यात झाला हे मात्र खरे. एकत्र झालेल्या रामजन्म आणि कृष्णजन्माने वाडा मात्र आनंदला.
रोजच उन्हाने न्हाऊन निघालेला वाडा पुत्रजन्मानंतर चैत्राच्या प्रखर उन्हात न्हाऊन अधिकच उजळला. एरवी चैत्राच्या सूर्याची नकोशी उष्णताच जाणवणाऱ्या वाड्याला पुत्रजन्मानंतर मात्र त्याचा प्रकाश भावला. वाड्यात पुत्रजन्माचा उत्सवच सुरू झाला. राम जन्मला गं सखी, राम जन्मला.
ब्रह्मा: कठिण आहे रे पोरा तुझे. हे सारे खरेच कवीला सुचवायचे आहे की तूच कवीच्या शब्दांच्या पात्यात आपल्या विचारांचं सारण भरून करंज्या करतो हे सांगणे कठिण आहे. चल पुढे.
नारद: ब्रह्मा, नकळत तू फार सुंदर विचार मांडला. कविता म्हणजे करंजी. व्वा! खरेच. कवितेचे शब्द म्हणजे फक्त करंजीचे पाते. त्यातला गर्भित अर्थ म्हणजे तिचे सारण. महालक्ष्यांच्या फुलोऱ्यातील पात्या, साटोऱ्या व करंज्यांची आठवण झाली. ज्याला कविता उमजत नाही त्याच्याकरिता ती पातीसारखी बेचव. ज्याला थोडीफार कळते त्याला ती साटोरी. ज्याला त्यातील कविमानसाला अभिप्रेत अर्थ आणि त्याही पलिकडील भावना कळतील त्याच्याकरिता ती करंजी. व्वा. काव्यफुलोरा! असो! चला फुलोऱ्यातल्या पुढच्या करंज्या चाखू.
अकरा दिवस कसे गेले सूर्यालाही कळले नाही
बारसे बाराव्या दिवसाला, आनंदाला पार नाही
गोविंदा गोपाळासाठी आजोळाहून ये पाळणा
त्यात दिसले तुझे पाय, माझ्या डोळ्यातही मावेना
ब्रह्मा, जन्मापासून बाराव्या दिवशी होते ते बारसे. नवजात अपत्याचे नामकरण करायचा दिवस. नवागमनाचा आनंद इतका असतो की दिवस कसे जातात ते कळत नाही. बाळाच्या आईला त्रास होत असेल म्हणा, पण तीही दहा दिवसात बऱ्यापैकी सावरली असते. त्यामुळे बारसे थाटामाटात करतात. आपण जाॅन आणि जेनीकडे असतांना त्यांनाही मूल झाले होते. पण ही मजा तिकडे नाही रे. तेथे जन्माआधीच नाव ठरवावे लागते. पुत्र झाला तर काय आणि कन्या झाली तर काय नाव ठेवायचे हे प्रसुतीपूर्वीच सुतिकागृहात लिहून द्यावे लागते. सगळी मजाच जाते रे. इकडे मात्र अजून तरी तशी प्रथा नाही. नाव काय ठेवले हे बारशाच्या दिवशीच कळते. मी मास्तरांच्या वाड्यातल्या सगळ्या सातच्या सात बारशांना आवर्जून हजर राहत असे. अशाच एका बारशाचे वर्णन वाडा कवितेतही आहे. आपण वाचली होती मागे एकदा.
दिवसामागून दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले
उन्हाळ्यात आईबाबांना पुन्हा तेच बाळ झाले
तेच गुण, जन्मखुण, फक्त भाळी लेख न लिहिलेले
मुभा त्यास पूर्ण, देवदैवदत्त ना काही मिळाले
बारसे हो यथासांग, कानी काय नाव उच्चारले?
उत्कंठा सर्वास फार, कान सारे टवकारले
प्रमोद कानास येता सारे जन आनंदले
'नारायण नारायण, पितळ उघडे की रे पडले'
तशाच एका चैत्रजन्मा ज्येष्ठापत्याचा या कवितेत उल्लेख आहे. पाळणा त्याच्या आजोळहून आला. तशी प्रथाच आहे. आजीआजोबाच पाळणा देतात. त्यात मग मुलाला किंवा मुलीला बाराव्या दिवशी टाकतात. आई आधीच मनात ठरविलेल्या नावाचा उच्चार प्रथम अपत्याच्या कानात करते. मगच इतरांना सांगते. सगळ्यांनाच उत्कंठा असते काय नाव ठेवतील हे जाणून घेण्याची.
नाव ठेवेपर्यंत तो लहानसा जीव गोविंद गोपाळच असतो. खुद्द बाळकृष्णच. आठवा अवतार. 'कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या' म्हणत त्याला सारे हातोहात उचलतात. नंतरच काय ते नाव ठेवतात. ते ठेवलेले नाव नंतर विसरून आईबाप मात्र त्याला जन्मभर बाळ किंवा बेबीच म्हणतात. असो.
ब्रह्मा, 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' अशी एक म्हण आहे. पाळण्यात त्या बारा दिवसांच्या मासाच्या गोळ्याला आडवे झोपवतात. त्याच्या गालाला व दोन्ही तळपायांना काजळाचा एक टिळा, म्हणजे कुंकवासारखा एक गोल, उमटवलेला असतो. दृष्ट लागू नये, ईडापीडा टळावी म्हणून. कवितेतल्या आईला त्याचे ते लहानसे तळपाय प्रकर्षाने दिसतात. तेच पुढे जमीनीला टेकतील, ठुमक ठुमक चालतील, दुडुदुडु धावतील, झपाझप चालतील व कालांतराने सारे जग पादाक्रांत करतील असे तिला वाटते. 'पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा' अशी तिची आपल्या पुत्राविषयी कामना असते. भविष्य कोणी जाणले म्हणा. पण ते उज्ज्वल घडविण्यास पडतील ते सर्व कष्ट उचलण्याची तिची तयारी असते. भविष्याच्या गोड कल्पना ती करते. ती भावना, तो दृढनिश्चय म्हणजे तिला त्याचे पाळण्यात दिसणारे पाय. तेच यशोदेला झालेले बाळकृष्णाच्या मुखातले विश्वरूपदर्शन. ते साऱ्याच मातांना होते. तसेच आपल्या कवितेतील आईलाही तिच्या बाळाचे पाय पाळण्यात दिसले. तिलाही भविष्य दिसले.
ब्रह्मा: हं. आवडला हा कार्यक्रम. नारदा, तसा मग तूही माझा राम आणि कृष्ण. वैशाख कृष्ण प्रतिपदेचा म्हणून कृष्ण. आणि ज्येष्ठापत्य म्हणून राम. राम कृष्ण तेव्हा यायचे होते म्हणा. आजही वैशाख कृष्ण प्रतिपदेला सारे कीर्तनकार तुझा जन्मदिवस नारद जयंती म्हणून साजरा करतात. ते असो. पण मीही तुझे बारसे करायला हवे होते. नाव ठेवायला हवे होते. पण मी स्वत: अजन्मा, अविवाहिता असल्यामुळे तुला आजोळ नाही रे. पाळणा कुणी दिला असता? असो. मला तुझे पाय पाळण्यात दिसले नाही म्हणून तू काय त्रिलोकसंचारी झाला नाही काय? खरे म्हणजे त्रिलोकी ज्याचा झेंडा, असा तू एकमेवाद्वितीयम पुत्र गुंडा. हो किनई?
नारद: ब्रह्मा, छान वाटले रे. 'हो किनई' तर कित्ती दिवसांनी कानावर पडले. ते जाॅन आणि जेनीचे समानार्थी 'इझंटीट' ऐकून अगदी वीट आला होता. हे म्हातारीच्या मुलीचे 'हो किनई' ऐकून खूप काळ मागे गेला. असो. चल पुढे.
टिळवटलेली तुझी पाउले मळवटलेल्या जमिनीवरती
कधी उतरली, कशी ठुमकली, ओसरीतुनी अंगणी आली
माडीवर ती सहजी गेली, पडली, उठली, पहा धावली
तुझी पाउले वाडाभर, स्पर्शाला वंचित जागा नुरली
दिनमपि रजनी सायं प्रात:, वसंत शिशिरे येता जाता
हरिविजया मी पुन: वाचता, वाटे तुझीच तीही गाथा
तुझे बालपण अंगी भिनले, तुझे रूप मी मनी भरविले
तू निजला असताही तव रडणे हसणे मम कानी आले
दोन जीवांची नवमासांची माझी जाणीव जरी पुसटली
बालपणीची सारी वर्षे तुझा जीव मी क्षणक्षण जगली
श्वासोश्वासी तुझीच चाहुल, नजरेआडही तुझीच छाया
धन्य वाटले मला, तृप्त मी, हीच खरी ब्रह्माची माया
ब्रह्मा, सांग काय कळले. तुझ्या मायेचा उल्लेख आहे या भागात.
ब्रह्मा: नको रे बाबा. तो आपला प्रांत नव्हे. पण अगदी कळलेच नाही असे नाही बरें. जे कळले तेवढ्यानेही मी भारावून गेलो आहे. आता तू रसग्रहण करून सांग. तू आद्य कीर्तनकार आहेस. मी नाही. वान्नबी, पण आज तरी नाही. मी नंतर कधी प्रयत्न करीन एखादे साधे सोप्पे कडवे आले तर.
नारद: ब्रह्मा, हे वान्नबी काय? तू आजकाल भाषेच्या बाबतीत फार सरमिसळ करतोस बघ. अरे वान्नबी हा 'वाँट टु बी' म्हणजे 'मला व्हायला आवडेल' चा जाॅनजेनीचा अधर अधर उच्चार आहे. तू फारच धेडगुजरी बोलतोस आजकाल. संस्कृतचे संस्कार हरवू लागले आहेत. असो.
बमा! म्हणजे ब्रह्मा! लहान मुलाच्या प्रगतीचा वेग अफाट असतो. दिन दूनी, रात चौगुनी, म्हणजे दिवसा दुप्पट, रात्री चौपट अशी प्रगती होते. केव्हा पाळण्यातले पाय जमिनीवर येतात, केव्हा चालायला लागतात, केव्हा धावतात सांगणे कठिण. सोनेरी दिवस ते. पाहता पाहता जातात. ऋतूमागून ऋतू जातात, ऋतुचक्र, वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर हे सहा ॠतूंचे चक्र, अव्याहत फिरत असते.
प्रत्येक बालपण प्रत्येक आईला यशोदेच्या बालकृष्णाच्या बालपणासारखे, कौसल्येच्या रामाच्या बालपणासारखे असते. घरोघरी यशोदा, घरोघरी कृष्ण, घरोघरी कौसल्या, घरोघरी रामचंद्र, घरोघरी हरिविजयातील, रामविजयातील बालकांड सतत घडत असते. घरोघरी रामचंद्र ठुमक ठुमक चालत असतात. घरोघरी कृष्ण बाललीला दाखवत असतो. हाच खरा हरिविजय आणि रामविजयाचा विजय. हीच खरी हरिविजय, रामविजयाची पारायणे. वाचा, नका वाचू, पारायणामागून पारायणे प्रत्येक चार भिंतीत सुरूच असतात. रम्य ते बालपण असे प्रत्येकच आईला वाटते. आपल्या बाळाचे आईलाही या मंतरलेल्या दिवसात बाळाचे सारेच तसेच रम्य, मधुर वाटते.
अधरं मधुरं वदनं मधुरं
नयनं मधुरं हसितं मधुरं
ह्रदयं मधुरं गमनं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरं
हे कृष्णाकरिता रेखाटलेले शब्द प्रत्येक आईच्या बाळकृष्णाकरिता तंतोतंत लागू पडतात. कवितेतल्या आईला तर विशेष करून.
ब्रह्मा, मी वाड्यात अनेक बालपणे पाहिलीत. एक बालपण दुसऱ्यासारखे नाही. तरीही सारी एकसारखी. लहान मुलाचे हूं हूं करणे, त्याचे कानात भिनून जाणारे खरे खोटे रडणे, बाळ घरी नसले तरी त्याचे रडणे ऐकू येणे हे अनुभव प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळणे कठिण. आई आणि मूल यांची एकजीवता, यांचे अद्वैत अद्वितीय आहे. सर्व प्राणीसृष्टीत ही माया, ही ममता भरली आहे. आई म्हणजे माय. तिची अखंड ममता म्हणजे माया हा सृष्टीचा अविभाज्य घटक आहे. तू सृष्टिनिर्माता आहेस. म्हणून मायेची माया ही तुझी माया आहे.
ब्रह्मा ही कविता वाचताना माझे मन कडव्यासरशी नकळत वाड्यात जाते. वाटते, ही तर मी अनुभवलेली कविता. धन्य रे तुझी माया!
ब्रह्मा: नारदा, छान. पुष्कळ दिवसांनी ते 'अधरं मधुरं वदनं मधुरं' ऐकायला मिळाले. तूच मला छंद, वृत्त वगैरे समजावतांना हे तोटक वृत्ताचं उदाहरण सांगितलं होत. मला तेव्हाही ते खूप आवडलं होते. घोड्याच्या टापांसारखं ते 'खबडप् खबडप् खबडप् खबडप्' चालत असतं. तुझी कविता पण तशीच घोड्याच्या वेगाने पुढे जाऊ दे जरा.
नारद: घाई काय ब्रह्मा. आधी जरा 'गरमम् गरमम् वदनम् कवळम्' करावे म्हणतो. गरम गरम कांदाभजी समोर आहेत. वदनि कवळ घ्यावे म्हणतो. कशी वाटली कल्पना? आवडली असेल तर एका जीभेवर तू वास कर, एकीवर मी. सरस्वतीची मात्र मजा असते हं. ती नेहमी लोकांच्या जीव्हेवर वास करते म्हणतात. हुशार आहे तुझी पोर! आपल्यालाही तिच्यापासून शिकायला हवे. चला जीभ पकडा.
ब्रह्मा: कल्पना तशी बरी वाटते मला पण. चल. पण नंतर मात्र कविता हं.
नारद: हं. मजा आली. आता नागदिवाळीपर्यंत कांद्याला हात नको लावायला. ऐक पुढे कविता.
वाड्यामध्ये तूच एकटा, तुला न कोणी सवंगडी
मीच सोबती, सखा, सखी खेळायाला पकडापकडी
टिक्करबिल्ला, लपंडाव, अन् नदी की पहाडासाठी
मी गेले माझ्या बालपणी बाळा रोज तुझ्यासाठी
लटके माझे रोज हारणे, तुझे जिंकणे नित्याचे
बुद्दु म्हणे मी नित्य स्वत:ला कौतुक करुनी रोज तुझे
पुढे जाउनी, मोठ्ठा होउनि, तूही ते केले बाळा
मला भावले तुझे हारणे, होता तू लेकुरवाळा
शाळेमाजी तू जाता तव प्रगतीला आला वेग
परंतू तुला ना भावे ओनाम्याचा त्यांचा वेग
अआ-क्षज्ञ वा कका-कंक:, अंक नि पाढे मुखोद्गत
शुद्ध नेटके लिहिशी, भिनला दासबोध तव अंगात
शाळेमध्ये विजय पताका अव्वल नंबर पहिलीत
टिक्करबिल्ला जणू खेळिसी, उडी थेट मग तिसरीत
पुढे पुढे तर डंका वाजे, उंच अपेक्षा सर्वांच्या
नवल न कोणा अव्वल येशी बोर्डामध्ये प्रांतात
स्पर्धा साऱ्या तुझा अखाडा, मल्ल न दूजा गावात
चषक शृंखला अव्याहत ये चालुनी तुझिया हातात
निबंध भाषण वादविवादी नुरले कोठे आव्हान
मशाल हाती तुझिया, मागे सहोदरांचीही साथ
ब्रह्माजी, आता तुमची पाळी. कापूस पिंजून अर्थाचा उलगडा करा. 'ससा ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवला जसा' असे वाटायला पाहिजे.
ब्रह्मा: हं. मोघम मोघम कळलं रे, पण तू जसा अर्थ उलगडून सांगतो, तू जशा करंज्या करतोस तसे मला जमणे अशक्य आहे. रसग्रहण करणे मला नाही रे जमत. ते कौशल्य फक्त तुझ्यापाशी आहे.
नारद: ब्रह्माजी, आता मी मोठा झालो आहे. तू जाणून बुजून स्वत:कडे कमीपणा घेतो आणि मला जिंकण्याचा आनंद देतोस, माझे खोटे कौतुक करतोस. हे मला समजते आता. सारेच आईबाबा मुलांपुढे हारण्यातला आनंद जाणतात. तेच तर या कवितेत पण आहे. मला पण मुले असती तर मीही मोठेपणी तेच केले असते. आनंदाने मुलांशी स्पर्धेत हारलो असतो. तेच तर बाळाची आईही करीत होती. बाप झाल्यावर बाळानेही तेच केले. तू तर माझा बाप व माझी आई दोन्हीही आहेस. म्हणून मला नेहमी हरबऱ्याच्या झाडावर चढवतोस. नाहीतर तुला येत नाही असे काय आहे? खरे म्हणजे तू आद्यकवी आहेस. सृष्टी ही तुझी अनन्य कविता. मी केवळ एक साधासुधा कीर्तनकार. असो.
वाड्यामधे बाळ आपल्या आईबाबांचा पहिलाच मुलगा असल्यामुळे तो लहान असतांना तो कुणाशी खेळणार? त्याची आईच त्याची सवंगडी. तिला त्याच्याकरिता लहान व्हावे लागले. लपाछपी, नदी का पहाड, लगोरी, टिक्करबिल्ला, लंगडी, आंधळी कोशिंबीर, पकडापकडी, सावकारबाजी, सापशिडी, सारे सारे खेळ तीच बाळाला शिकवायची व तीच त्याच्याबरोबर खेळायची. खरे म्हणजे तिची आणि बाळाची बरोबरी का होणार? ती मग मुद्दामून हारायची व बाळाला जिंकून द्यायची. मग त्याच्या चेहऱ्यावरचा विजयाचा आनंद तिला सुखावून जायचा. यशोदा जशी कृष्णाला खोटे खोटेच रागवायची, बांधून ठेवायची तोही यातलाच प्रकार. सारेच लटके.
ब्रह्मा: मुनी, कवितेचा अर्थ सांगताना तुम्ही आपल्या हातचे पण बरेच घुसडून देता. लपाछपी, लगोरी, लंगडी, आंधळी कोशिंबीर, सावकारबाजी, सापशिडी वगैरे कवितेत नव्हते काही.
नारद: ब्रह्मा, नकळत असे होत आहे रे. कवितेतला बाळ आणि म्हातारीचा बाळ यात इतके काही साम्य आहे की मी कवितेतल्या वाड्यातून मास्तरांच्या वाड्यात नकळत जातो. ब्रह्मा, असेच मास्तरांच्या वाड्यातही व्हायचे. मी स्वत: अनुभवले आहे. या कवितेचा रंगमंच तो वाडाच आणि पात्रेही वाड्यातलीच असे वाटावे इतके साम्य. योगायोग, आणखी काय?
पाच सहा वर्षांचे मूल झाले की त्याला शाळेत टाकतात. कवितेतला बाळही शाळेत गेला. पण त्याआधीच त्याला मुळाक्षरे, बाराखड्या, पाढे, उलटे पाढे यायचे. अक्षर तर इतके सुंदर की पाहतच राहावे. दासबोधात रामदासस्वामींचा उपदेश अगदी त्याच्या गळी उतरलेला. 'शुद्ध नेटके लिहावे, लेहोनि शुद्ध वाचावे, वाचोनि शुद्ध बोलावे' हा त्यांचा उपदेश.
शाळेत पहिलीत प्रवेश घेतल्यावर वर्गात पुन्हा सुरुवात ओनाम्याने व्हायची. ती पायरी तर बाळाने कधीचीच ओलांडलेली. अ आ पासून क्ष ज्ञ पर्यंत मूळाक्षरे त्याची कधीच गिरवून झाली होती. क का कि की पासून कं कः पर्यंत क ख ग घ पासून ह ळ क्ष ज्ञ पर्यंतच्या बाराखड्या तो लिहू शकत असे. त्यामुळे त्याला शाळा म्हणजे वेळेचा अपव्यय वाटायचा. चढलेला गड उतरून पुन्हा इतरांबरोबर चढण्यासारखे ते होते.
ब्रह्मा: ओनामा म्हणजे काय रे? पुन्हा त्या जाॅन आणि जेनीचा एखादा निसटता उच्चार की काय? की ओबामाचा भाऊ ओनामा? तेथे असताना ओबामा उच्चारतांना त्यांना मी बरेचदा ऐकले. तसाच हा ओनामा की काय?
नारद: नाही रे ब्रह्मा. ओबामा त्यांच्या देशाचा राष्ट्रपती होता. त्यांचा इंद्रच म्हण ना! पण ओनामा म्हणजे ॐ नम: शिवाय चा अपभ्रंश. पाटीवर लिहिणे शिकताना आधी ॐ लिहितात व शिक्षणाला सुरुवात करतात. नंतर मग अ आ इ ई गिरवायला सुरुवात होते. ती सुरुवात म्हणजे ओनामा. शिक्षणाचा श्रीगणेशा. आता श्रीगणेशा म्हणजे काय ते विचार. श्रीगणेशा म्हणजे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात. वक्रतुंड हा विद्येचा देव. प्रत्येक शुभकार्यात त्याची आधी पूजा. व्यापारी रोज पहिल्या कमाईला जसे बोहनी म्हणतात तसे. आता बोहनी म्हणजे काय ते विचार. अरे बोहनी म्हणजे भवानी. जगदंबा. ब्रह्मा, यांच्या पावलोपावली आपले देवांचे स्मरण असते. यशाची गॅरंटी वाटते त्यांना तसे करण्यात. भाव भोळा असतो ब्रह्मा. अगदी आपल्या शिवासारखा. असो.
ब्रह्मा, बाळ शाळेत गेला. त्याची आधीच झालेली तयारी पाहून त्याला डबल प्रमोशन देण्यात आले. पहिलीनंतर तो थेट तिसरीत गेला. टिक्करबिल्यात फुली असलेल्या घरात जसे पाऊल न टाकता पुढच्या घरात सरळ उडी मारतात तसेच काहीसे. ही उडी बाळाच्या यशाची नांदी होती. पुढच्या यशाची ही आकाशवाणीच समज.
घरी खेळात आई बाळाला जिंकू देत असे. पण एकदा का शाळेत गेले की खरीखुरी स्पर्धा सुरू होते. प्रत्येकच जण पहिले येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. प्रत्येकच जण आपल्या आईचा बाळ असतो. कृष्ण असतो. आता मात्र या अनेक कृष्णांमधली चढाओढ खरी असते. आपल्या कवितेतला बाळ नित्यच प्रथम येत असे. अभ्यास असो वा अभ्यासेतर स्पर्धा. शाळेतली स्पर्धा असो वा आंतरशालेय. बाळ नेहमी प्रथम. शालेय स्पर्धातील या आखाड्यात या मल्लाला तोड नव्हती. सगळे प्रतिस्पर्धी चीत व्हायचे. वक्तृत्व, निबंध, वादविवाद, परिसंवाद, भेंड्या, काहीही असो. कवितेतल्या बाळाला वैयक्तिक पारितोषिके व चषक हमखास मिळत. अगदी माझ्या वाड्यातल्या म्हातारीच्या बाळासारखेच.
कालांतराने मॅट्रिकच्या परीक्षेत साऱ्या प्रांतात कवितेतला बाळ प्रथम आला. त्याने ही पेटवलेली मशाल त्याच्या मागून येणाऱ्या त्याच्या भावंडांनाही प्रकाश देती झाली. तीही आपापल्या परीने त्यानेच उजळलेल्या मार्गाने प्रगतिपथावर अग्रेसर झाली.
ब्रह्मा: नारदा, मला पण ही वाड्यातल्या म्हातारीच्या बाळाचीच कथा वाटते रे. मी एकच ललाटलेख चुकून दोन भाळी लिहिला की काय? होते रे म्हातारपणी अशी चूक कधी कधी. ओशिट!
नारद: ब्रह्मा, पुन्हा जाॅन जेनीची भाषा बोललास. मी अर्थ पण सांगू शकत नाही तुला. पण सोडून दे हा शब्द. जीभ विटाळते. काढून टाक अगदी वापरातून. चल पुढे.
तूच पुढारी, तूच चैत्र, म्हणुनी तू येसी चैत्रात
तूच पायवा, तूच मानकरी यशशिखराचा रे खचित
ग्रहमालेचा तूच गुरू, तू आद्य, ज्येष्ठ, अद्वितीय तू
पाउलवाटा अनुजांना देणारा अग्रज तू तू तू
शाळेतील तुझी यशगाथा नभास नेती आकांक्षा
परंतु पाय तुझे जमिनीवर, विनय परिश्रम मितभाषा
विद्यापीठ महाविद्यालय विज्ञानाचा वारकरी
भौतिकी गणिताचा विद्यार्थी, अगम्य मज, कौतुक भारी
परीक्षेस तू जाता हाती दही शर्करा देतांना
दारातून वाड्याच्या जाता तुला मागुनी बघतांना
मनी मनोमन जगदंबेला 'उदे गं अंबे' म्हणतांना
तोच पाळणा, तीच पाउले, दिसती पुढती जातांना
बाळ खऱ्या अर्थाने पुढारी. ज्येष्ठापत्य म्हणून पुढारी. अग्रज. चैत्र जसा बारा महिन्यांच्या वार्षिक शृंखलेचा अग्रणी, तसाच आईबाबांच्या अपत्यशृंखलेचा हा अग्रणी. बाकी सारे पाठीवर पाय देऊन आलेले. म्हणून त्याचा जन्म चैत्रातला असे आई म्हणते. बाळाचं यश खूप मोठं. पण सर्व स्वबळावर कमावलेले. तो यशशिखरावर पोहोचला असला तरी ते यश देवदत्त वा दैवदत्त नव्हते. त्या यशशिखराचा पायवा त्यानेच बांधला. तोच पायवा, तोच शिखर. 'बाळे माझ्या रचिला पाया, बाळचि झालासे कळस' असेच काहीसे.
ब्रह्मा, आपण मागे सूर्यमालेची यात्रा करतांना काही ग्रहांवर गेलो होतो. नंतर तुला घराची आठवण आल्यामुळे परत आलो. नाहीतर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह, गुरू, आपण पाहिला असता. आकाराने हा इतर सर्व ग्रह एकत्र केले तरी त्या काल्पनिक संयुक्त ग्रहापेक्षाही मोठ्ठा. गुरुस्थानी असलेला हा ग्रह. बुद्धीचा ग्रह. बृहस्पती. तसेच या आईच्या बाळाचे. सर्व भावंडात तो मोठा. वयाने, कीर्तीने, गुणांनी. अद्वितीय. अतुलनीय. अनन्य.
आईच ती. तिला तिची सारीच मुले प्रिय असावी. पण बाळ तो बाळच असे ती सुद्धा म्हणते.
ब्रह्मा, येथेही वाड्यातल्या म्हातारीच्या बाळाची प्रकर्षाने आठवण येते. तिचा बाळ, प्रमोद म्हणजे 'झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु या सम हा' या तोडीचा. अनन्वयाचे उत्तम उदाहरण. आणि मुख्य म्हणजे, त्याचे सारे भाऊबहिण हे आनंदाने मानतात. त्याच्या पावलावर पाऊल टाकून ते वाटचाल करीत आहेत. तसेच या कवितेतल्या बाळाने निर्माण केलेल्या पाउलवाटांवर त्याचे लहान बंधु व भगिनी त्याच्या मागोमाग चालतात. तो पोहोचलेल्या शिखरावर जायचा आपापल्या परीने प्रयत्न करतात. प्रगतीचा मानक, हात न पोहोचेल असा मानक, म्हणजे आईचा बाळ. अगदी म्हातारीचाच बाळ म्हण ना. कवितेतल्या आईचा बाळ आणि वाड्यातल्या म्हातारीचा बाळ अगदी समानांतर रेषाच वाटतात मला तरी.
ब्रह्मा: हं. गडबड आहे काहीतरी. एक ललाटलेख दुसऱ्यासारखा नसतो. पण इथे तर अगदी झेराॅक्स. तू तरी मूळ नारद आहेस की त्याची प्रतिमा? काय फरक पडतो म्हणा. 'प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट, ज्योतिने तेजाची आरती'. चालेल मला. चल पुढे.
नारद: ब्रह्मा, बाळाच्या मॅट्रिकच्या यशामुळे सर्वांच्याच त्याच्याबद्दलच्या आशा खूप उंचावल्या. त्याच्या आईच्या आकांक्षापुढती तर गगन ठेंगणे. पण तिचा बाळ मात्र पाय घट्ट जमिनीवर रोवून होता. गर्व त्याला शिवला सुद्धा नाही. अभिमान, अहंकार चिमूटभर पण नाही. यशाने तो शेफारून गेला नाही. परिश्रम, चिकाटी आणि विनय हीच त्याची शिदोरी. म्हणून तर तो तो. 'विद्या विनयेन शोभते' चे उत्तम उदाहरण म्हणजे तो.
महाविद्यालयात बाळाने विज्ञान, व त्यातही भौतिकशास्त्र, अभ्यासाकरिता निवडले. ब्रह्मा, भौतिकशास्त्र म्हणजे physics. तुझ्या सृष्टीचे रहस्य उलगडणारा विषय. भौतिकशास्त्राची भाषा म्हणजे गणित. बाळ या दोनही विषयांचा अव्वल दर्जाचा विद्यार्थी. तो काय शिकतो, तो काय वाचतो हे सारे आईच्या आवाक्याबाहेरचे. पण आपल्याला अगम्य असे विषय आपला बाळ अभ्यासतो व महाविद्यालयातही सतत शाळेसारखेच उज्जवल यश कमावतो याचे तिला अमाप कौतुक व अभिमान. ब्रह्मा, आपल्यापेक्षा आपल्या पुत्रकन्यांनी सर्वच दृष्टीने सरस असावे असे सर्वच आयांना वाटते. निरपेक्षच नव्हे तर आईचे प्रेमही अगदी निरागस असते. तो जिंकावा म्हणून तर ती लहानपणी त्याच्याशी खेळतांना हारत असे. आता मात्र तो खराखुरा जिंकत जिंकत पुढे जात होता.
ब्रह्मा, वाड्यात सात सात मुलांच्या मिळून मी शेकडो परीक्षा पाहिल्या. एक दिवस मी बसल्या बसल्या सहज अंदाज घेऊन पाहिला. चक्क गणित मांडले. मास्तरांना सात मुले. सारेच १६-१६ वर्षे तरी शिकले. सगळ्यांनीच कमीतकमी पदव्युत्तर अभ्यासक्रम तरी केलाच केला. काही नंतरही शिकले, पण ते परगावी जाऊन. प्रत्येक वर्षी कमीत कमी ३-३ परीक्षा. शाळेत असतांना तिमाही, सहामाही, वार्षिक असायच्याच. काॅलेजमध्येही वर्षाकाठी ३-४ परीक्षा नक्कीच. प्रत्येक परीक्षेत ५-६ तरी विषय. म्हणजे अंदाजे ७ गुणिले १५ गुणिले ३ गुणिले ६ म्हणजे १८९० परीक्षा. ठीक आहे, पंधराशे समज. हजार समज. इतकेदा मी मुलांना परीक्षेला जाताना पाहिले. एकही वेळ अशी मला आठवत नाही की जेव्हा जाणाऱ्या परीक्षार्थीला म्हातारीने हातावर दहीसाखर दिले नसेल. उजव्या तळव्यावर चमचाभर दही मुलेमुली चाटून खात, आईबाबांना नमस्कार करत व मगच परीक्षेला जात. त्यांना जाताना नजरेआड होईपर्यंत म्हातारी पाहत असे. तेव्हा ती म्हातारी नव्हती म्हणा. मूल परत येईपर्यंत तिचा जीव टांगलेला असे. पेपर सोपा असेल की कठिण, सारे प्रश्न सुटतील की नाही, वेळ पुरेल की नाही, नाना चिंता. परीक्षा आटोपून लेकरू परतले रे परतले की त्याचा चेहरा पाहूनच तिला पेपर कसा गेला ते कळत असे. आधी ती लेकाचा, लेकीचा पेपर पाही. तो सोपा होता की कठिण ते सांगे व मगच ताट पाट मांडून जेवायला वाढे. हजार असे प्रसंग. पण मला कधीच त्यांचा कंटाळा आला नाही. त्यांची गोडी अमृतातेही पैजा जिंके. तू असायला हवे होते वाड्यात त्या काळात.
ब्रह्मा, असेच काहीसे कवितेतली आई तिच्या बाळाविषयी सांगते. दहीसाखर हातावर घेऊन परीक्षेला निघालेल्या बाळाला पाठमोरे पाहिलेले तिच्या मनःपटलावर कायमचे कोरलेले आहे.
रात्रभर अभ्यास करून परीक्षेला जाणारे पोर पाहतांना ती मातृसुलभ प्रेमाने व चिंतेने कुलदेवता जगदंबेचे स्मरण करते. आपले सारे पुण्य जणू पणाला लावते. ब्रह्मा, आई नावाचा प्राणी मोक्षप्राप्तीकरिता पुण्य गाठीशी बांधतो असे मला तरी वाटत नाही. ती फक्त अडीनडीला आपले पुण्य आपल्या पिल्लांच्या कामी पडावे म्हणून उपवास करते, भागवत वाचते, रोज हजार वेळा ॐ नम: शिवाय लिहिते, वगैरे. एकूण काय की पुण्य साठवते. कवितेतली आई याला अपवाद नाही. तीही बाळाच्या यशाची कामना करते. तो चांगलेच करणार याची तिला खात्री असते. त्याचे ते परीक्षेला जाणारे पाठमोरे पाय तिला भूतकाळात घेऊन जातात. पाळण्यातले त्याचे पाय किती मोठे झाले असे तिला वाटते. ते पाय पुढे जातांना पाहून तिचे ऊर अभिमानाने भरून येते. पण कुठे तरी ही बाळाची प्रगतीपथावर अग्रेसर पाउले त्याला आपल्यापासून दूर तर नेणार नाहीत ना असा विचार तिच्या मनाला चाटून जातो. त्याची पुढे जाणारी पाउले त्याला आपल्यापासून दूर पण नेतात हे तिला जाणवू लागते. कवितेत त्याचाच संकेत आहे की काय? पिल्लू आता घरटे सोडून उडणार की काय? प्रत्येक पक्षिणीच्या आयुष्यात पिल्लाच्या प्रगतीचा अविभाज्य अंग असलेला हा हळवा प्रसंग काळीज पिळवटून टाकणारा असतो. सारी तुझीच माया, ब्रह्मदेवा!
ब्रह्मा: मानवच व्हायला हवे मुने हे कळायला. जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे! कंठ दाटून आला नारदा. पण उत्सुकता पण ताणल्या गेली आहे. चल पुढे.
नारद: माझ्या डोळ्यात पण धुळीचा कण गेला बहुतेक. किंवा धूर असावा. डोळे पुसतो आणि वाचतो.
वर्षाकाठी वर्षे गेली, तो दिन सामोरी आला
पराक्रमाला नगर अपूरे, निघसी तू दिग्विजयाला
विज्ञानाने विश्वरूपदर्शन बाळा देता तुजला
डबके सोडुनि बाळा तू सागरविजयासाठी गेला
सीमोल्लंघन हे दसऱ्याचे असे वाटले मला मनी
येशील तू परतून जिंकुनी, विद्यासुवर्ण घेवोनी
वाड्याचा तू कायापालट बुद्धिबळाने करशील
पाळण्यातले पाय तुझे वामनी पराक्रम करतील
'नेऊ नको माधवा अक्रूरा' अशी अवस्था रे माझी
माया वेडी आईची, मी थांबवेन का झेप तुझी?
घट्ट मनाने, ओठ आवळत निरोप देतांना तुजला
गाडीचा तो धूर जाउनी पाणी आले डोळ्याला
ब्रह्मा, बाळाचे शिक्षण भराभर वर्षे ओलांडित होते. शेवटी महाविद्यालयीन शिक्षण संपले. पण भौतिकशास्त्रात B.Sc. व M. Sc. करतांना त्याची प्रतिभा, जिज्ञासा व ज्ञानपिपासू वृत्ती यांची अशी काही सांगड बसली आणि त्यांना असा काही उभार आला की त्याने नोकरी न स्वीकारता उच्चशिक्षणाचा निर्णय घेतला. ते त्याच्या गावी शक्य नसल्यामुळे त्याला घर सोडून परगावी जाणे भागच होते. आईला तशी त्याची चाहूल लागलीच होती. तो पुढे पुढे जाता जाता फार पुढे जाणार हे तिने हेरलेच होते. विज्ञानाचे विश्वरूपदर्शन झाल्यामुळे बाळालाही पाऊल मागे घेणे अशक्य होते. पिल्लू आता घरटे सोडून उडणार होते. बाळ आता डबके सोडून विज्ञानसागरात जाणार होता व त्याच्या तळाशी असणारी सृष्टिसत्याची रत्ने शोधणार होता. तो संशोधक, वैज्ञानिक होणार होता. आईला पाळण्यात हेच तर पाय दिसले होते.
ब्रह्मा, पुन्हा तेच रे. म्हातारीचा बाळ पण M. Sc. झाला तेव्हा शिक्षण संपले असेच सर्वांना वाटले. अत्यंत हुशार असल्यामुळे त्याला सहजच प्राध्यापकाची नोकरी मिळू शकली असती. पण हा विज्ञानाने झपाटलेला विद्यार्थी थोडाच चाकोरीत बसणार होता. त्याला पुढे शिकायचे होते. त्याने नागपूर नगरी सोडून मुंबईच्या इंडियन इंस्टिट्यूट आॅफ टेक्नाॅलाॅजीमधे, म्हणजे आय्. आय्. टी. मधे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयात एम्. टेक. ला प्रवेश घेतला. इंजिनिअरिंग म्हणजे आपल्या विश्वकर्मा सारखा अभियंता तयार करायला लागणारे ज्ञान, अभियांत्रिकी. प्रमोद आता नागपूर सोडून पश्चिमेला मुंबईकडे कूच करणार होता. शुक्रवार तलाव सोडून तो आता पश्चिमेच्या अरबी समुद्राकाठी वसलेल्या मुंबई महानगरात जाणार होता. एकटा. फार मोठी झेप होती ती. वाडेकऱ्यांची दृष्टी विशाल करणारे, साऱ्याच कुटुंबाची दिशाच बदलणारे त्याचे ते पाऊल होते.
म्हातारीसारखीच कवितेतली आई हळवी झाली होती. एकीकडे आईचे पुत्रप्रेम सांगत होते की बाळाने जाऊ नये. पण दुसरे मन सांगत होते, जाऊ दे माते त्याला पुढे.
दसरा, म्हणजे विजयादशमीला घरोघरी संध्याकाळी मारुतीच्या देवळात जायची प्रथा आहे. याच दिवशी आपल्या रामाने रावणावर विजय प्राप्त केला होता असे म्हणतात. त्यात रामभक्त हनुमानाचा मोठ्ठा हातभार होता. त्या पुराणातल्या घटनेची आठवण म्हणून आजही लोक आश्विन शुद्ध दशमीला सीमोल्लंघन करतात. नंतर घरी येऊन ते ताटात तांदुळ पसरवून काढलेल्या रावणाला जंगलेल्या तलवारीने मारतात. त्या रावणाच्या नाभीस्थानी आधीच लपवून ठेवलेल्या सोन्याच्या आंगठीला बाहेर काढतात. म्हणजे रावण मेला असे समजायचे. रावणाचे प्राण त्याच्या नाभीत होते अशी समजूत आहे म्हणून. एकंदरीत काय, तर घरोघरी घरचे राम रावणवध करतात. सत्याचा असत्यावर विजय होतो. वाड्यामधे मास्तर, प्रमोद व नंतर आलेले सहोदर तलवार पेलण्याएवढे मोठे झाले की तेही रावणवध करीत. नंतर म्हातारी सर्वांना औक्षण करे. आपल्या पराक्रमी भावांच्या बहिणी पण तसे करीत. नंतर मग रावणाच्या सुवर्णलंकेतून जिंकून आणलेले सोने मुले आईबाबांना देत. खरे सोने कुठले म्हणा. पण झाडाची पानेच सोने मानून देत. मी हे सर्व डोळे भरून पाहत असे.
हे सर्व मी सांगितले कारण कवितेतल्या आईने अशा सीमोल्लंघनाचा दाखला दिला आहे. ब्रह्मा, आई अत्यंत भाविक. तसे सारेच वाडेकरी म्हणा. म्हणून तर कवितेत हे सारे उल्लेख येतात. आईचा बाळ मात्र आता खरेच सीमोल्लंघन करून दिग्विजयाला निघणार होता. विद्यारूपी सुवर्ण जिंकून तो वाड्यात आणणार होता व इतरांना वाटणार होता. हे विद्याधन वाड्याचा कायापालट करणार होते. ते सर्व होणार हे आईला बाळाच्या बारशाच्या दिवशीच बाळाचे पाय सांगून गेले होते. त्रिलोक जिंकणारे वामनाचे पाय ते तिला वाटले होते. वाड्याच्या अध्यायात आईच्या बटूचे, बाळाचे पुढे पडणारे, सीमा ओलांडून पुढे जाणारे हे पाऊल होते.
ब्रह्मा, कवितेतली आईसुद्धा वाड्यातल्या म्हातारीसारखीच बहुश्रुत असावी. तिने वामनावताराकडे केलेला अंगुलीनिर्देश, लंकाविजयाकडे टाकलेला दृष्टिक्षेप, बाळाच्या उच्चशिक्षणासाठी वाडा सोडून पुढे टाकलेल्या पावलाचे वाड्याच्या भविष्यावर जे दूरगामी सुपरिणाम होणार होते त्याचे महत्त्व अधोरेखांकित करतात. व्वा!
रामावतार, वामनावतार जसे त्या पुढे पडणाऱ्या पावलात दडले होते, त्यातील आशावाद जसा वाड्याच्या भविष्याबद्दल भाकीत करीत होता तसेच आणखी एका अवतारातला करुण प्रसंगही आईला जाणवला. सर्व पोथ्या मनोभावे आत्मसात केलेल्या आईला पोथीतला आणखी एक प्रसंग आठवला. कृष्णाला घेऊन जायला अक्रूर येतो तेव्हा नंदयशोदेची, साऱ्याच गोकुळवासियांची जी स्थिती होते ती तिने अनेकदा वाचली होती. पण आज तसेच कथानक प्रत्यक्षात घडत होते. नंदयशोदानंदकंद बाळकृष्ण गोकुळ सोडून जायला सज्ज होता. कसेबसे ती मन आवरत होती. डोळ्यात येणारे अश्रू, थरथरणारे ओठ आपल्या बाळाला दिसू नयेत व त्याचे मन विचलित होऊ नये म्हणून ती पराकाष्ठेचा प्रयत्न करीत होती. स्टेशनवर बाळाला घेऊन दूर जाणाऱ्या गाडीचा धूर डोळ्यात गेला म्हणून डोळ्यात पाणी आले असे भासवीत होती. पण बाळही काही अजाण नव्हता. त्याला सारे कळत होते. त्याच्याही मनात भावनांचा कल्लोळ उठलाच असेल. पण गाडी सुटली होती. मोहपाश तोडणे आईला व बाळाला आवश्यकच होते.
ब्रह्मा, मी हे सर्व अनुभवले आहे. म्हातारीचा बाळ प्रथमच घर सोडून मुंबईला गेला तेव्हा सारेच स्टेशनवर गेले होते. मीही बसलो एका रिक्षात. ती ताटातूट, ते क्रूर अक्रूर गाडीचे येणे व बाळाला घेऊन जाणे, जाणाऱ्या बाळाचा हात दिसेपर्यंत फलाटावर साऱ्यांचेच निरोपाचे हात हालवीत राहणे पाहून माझ्याही ह्रदयात कालवाकालव झाली. मलाही तेव्हा हेच भजन प्रकर्षाने आठवले होते.
क्रूरा अक्रूरा नकोस नेऊ आनंदाचा ठेवा
नेऊ नको माधवा ।।
खेळगडी तो गोपाळांचा
गिरीधारी रे भक्तजनांचा,
नारी गोकुळकान्हा आमुचा
सर्व सुखाचा अमोल ठेवा ।।
कुंजवनी रे रास रंगली
ताला वरती टिपरी घुमली
धुंद साद रे स्वप्नी उरली
ऐकू दे मज मंजुळ पावा ।।
नकोस नेऊ बाळ मुकुंदा
वेडी होईल गौळण राधा
तुला विनविती नंद यशोदा
अक्रूरा नेऊ नको माधवा ॥
ब्रह्मा: हं. माझ्याही डोळ्यात धूर गेला रे. पुसतो मी आठही डोळे. पण तू बाळाच्या पश्चिमविजयाची कथा मात्र जाऊ दे पुढे.
नारद:
पश्चिमेस तू आता असशी, चंद्रकोर भाऊबीजेची
निरंजनाची ज्योत शोधते कोजागिरी,
जन्मदिनासी
बहिणी ओवाळिती तुला रे, चंद्र बीजेचा तू त्यांचा
ज्येष्ठापत्यनिरंजन येता पूर्णचंद्र रे तू माझा
जुना काळ तो, दूरध्वनीही दूर असे न जसे आता
पत्र तुझे येता घर सारे बंधुभगिनी नी मी ताता
आतुरतेने जवळी येती, वार्ता काय असे त्यात
षष्ठादश कर्णांची तृप्ती यशदुंदुभीध्वनि रे येता
बापरे ब्रह्मा! डिट्टो तेच रे! म्हातारीचा बाळ नागपूर सोडून मुंबईला गेला. त्याची उणीव सर्वांनाच जाणवली. सणासुदीला ज्यास्तच. पण वाड्यातली एक अजबच रीत होती. दिवाळीत भाऊबीजेला त्याच्या बहिणी पश्चिमेकडे तोंड करून बाळाला ओवाळायच्या. मास्तरांचं दिग्दर्शन असायचं या कार्यक्रमाला. माजघरात हा ओवाळणीचा कार्यक्रम व्हायचा. माजघरातून ओसरीतडे तोंड करून ओवाळणे व्हायचे. तीच पश्चिम दिशा होती. हवेतच बाळाला कुंकू लावणे, अक्षदा लावणे, सुपारीने ओवाळणे, अंगठीने ओवाळणे, निरंजनाने ओवाळणे व्हायचे. कारण मुंबई नगर हे नागपूरच्या पश्चिमेकडे. तिथेच यांचा बाळ गेला होता. हा सर्व कार्यक्रम अगदी गंभीरपणे व्हायचा. भाऊबीजेला घरोघरी सर्वच स्त्रिया पश्चिमेच्या चंद्रकोरीला भाऊ मानून ओवाळतात तोच प्रकार.
असाच प्रकार बाळाच्या वाढदिवशी पण व्हायचा. आई त्याला तसेच पश्चिमेकडे नीरांजनाचे तोंड करून ओवाळायची. आश्विन पोर्णिमेलाही, म्हणजे कोजागिरीलाही तोच प्रकार. त्यादिवशी घरोघरी ज्येष्ठ अपत्याला ओवाळतात. ज्येष्ठापत्यनिरंजनम् म्हणतात. वाड्यात त्याला आसनी म्हणायचे. असाच वापरून वापरून गुळगुळीत झालेला शब्द असावा. बहुतेक 'औक्षणी'चा अपभ्रंश असावा. ब्रह्मा, अगदी वायरलेस औक्षण व्हायचे वाड्यात दूर गेलेल्या बाळाचे. असा प्रसंग घरोघरी होत नसावा. पण वाड्याची रीतच न्यारी. कवितेतल्या बाळाकडेही अगदी तोच प्रकार होत असल्याचे ही कविता सांगते.
ब्रह्मा, त्याकाळी आजसारखा फोन बोकाळला नव्हता. खरे म्हणजे फोन फारसे नसतच. पोस्टात जाऊन वगैरे करता येत असे तशीच परिस्थिती असेल तर. मूळ संपर्क पत्रलेखनाने व्हायचा. बाळाला आणि मास्तरांना सविस्तर व नियमित पत्र लिहिण्याची सवय होती. वाड्यात पोस्टमन रोज दोनदा येत असे. पत्र असेल तर वाड्याच्या दारातूनच तो ओरडायचा. कोणीतरी धावत जाऊन ते पत्र घेऊन यायचा. मग लगेच मास्तर ते नीटपणे उघडून मोठ्याने वाचन करायचे. सारे जण अक्षरश: सभोवती जमून शब्दन् शब्द ग्रहण करायचे. प्रमोद सोडला तर आई बाबा व सहा मुले मिळून आठ जण वाड्यात होते. म्हणजे सोळा, षष्ठादश कान आतुरतेने, उत्कंठेने एक एक शब्द ऐकायचे. बाळाच्या प्रगतीचा तो आढावा सर्वांच्या कानांना सुखावून जायचा. दोन कान माझेही होते याची त्यांना कल्पना पण नसे. पण मी अशा सर्वच पत्रवाचन समारंभाचा साक्षी असे. पत्रवाचनासारखाच पत्रोत्तरवाचनाचाही कार्यक्रम व्हायचा. बाबा त्यांचे पत्रोत्तर मोठ्याने वाचून दाखवायचे. बारीक बारीक अक्षरात घरातील बारीक सारीक गोष्टींचे ते बारकाईनेे केलेले वर्णन असायचे. बाबा व बाळाने लिहिलेली सारी पत्रे एकत्र केली तर अठरा हजार श्लोकी भागवत होईल एवढा मोठा तो खजिना होता.
अगदी हाच प्रकार कवितेतल्या आईकडे पण व्हायचा. त्या बाळाला पण सहा भाऊबहिण होते असा अंदाज 'षष्ठादश कर्णांची तृप्ती यशदुंदुभीध्वनि रे येता' या ओळीतून करायला हरकत नाही. आईबाबांचे चार आणि मुलांचे बारा. एकूण सोळा. काय हे साम्य दोन कथानकात!
ब्रह्मा: बापरे! मीही असतो तर आणखी आठ कान वाढले असते. तू आणि मी मिळून दशकर्ण. असो.
नारद: स्वत:च स्वत:वर विनोद केलास ब्रह्मा. आवडले मला चतुरानना, अष्टनेत्रा, अष्टकर्णा. विनोदाचा तो सर्वश्रेष्ठ प्रकार आहे असे म्हणतात. स्वत:वर विनोद करता यायला हवा सगळ्यांना. माझ्यासारखे नेहमी दुसऱ्यांची टिंगल करून फिदीफिदी हसणे योग्य नव्हे म्हणतात. असो.
वर्षाकाठी घरास येता तू, येत दिवाळी दसरा
तुझी कथाकथनाची खूबी, नारद तू जणू रे दुसरा
गोडधडाची आवड तुजला पुरणपोळीवर प्रेम तुझे
सात दिसांची घरी दिवाळी, सरती ते येती जैसे
पुन्हा तोच क्षण, निरोप अवघड, पुन्हा धूर तो गाडीचा
पुन्हा नेत्र पाणावती जाता धूर, पाहता हात तुझा
खीर शेवयांची त्या दिवशी, आस लवकरी भेटीची
तू वैज्ञानिक, मी आई, मज जुनी रीत विश्वासाची
खीर शेवयांची तुज आणी वर्षी सुटीस वाड्याला
असे बोलता मंदहास्य तव, खळी येतसे गालाला
शास्त्री तू, वैज्ञानिक मोठा, प्रमेयात का बसणार?
विश्वासाची भिंत कुडाची, तिला तडा का जाणार?
विज्ञानाची, विश्वासाची सांगड नित्यच वाड्यात
स्नातक, पारंगत ज्ञान्यांचा हांडा इथेच वाड्यात
निष्ठा भागवती, विज्ञानी निष्ठासागर वाड्यात
नवरात्री रात्रारति होता उभे सर्वजण वाड्यात
ब्रह्मा: हं. काही काही समजले बरे. तुझा उल्लेख आहे. पुरणपोळी पण आली आहे कवितेत. शेवयांची खीर पण. बाकी तसे फारसे काही उमगले नाही. तुझ्या खादाडपणाचे वर्णन असावे असा माझा अंदाज. खरे काय ते आता तुम्हीच सांगा पुराणिक.
नारद: हं, माझा उल्लेख आहे खरा. बाकी पुरणपोळीचा उल्लेख काही माझ्याकडे इशारा करून नाही बरे. बाळ मुंबईला असताना वर्षातून एखाद्या वेळेस सात आठ दिवस सुटी काढून येत असे. ते दिवस म्हणजे वाड्यात अगदी दिवाळी दसरा असत असे आई म्हणते. आपला बाळही असाच आठवडाभर घरी येत असे. आठवडाभर घरी अगदी यादीनुसार गोडाधडाचा स्वयंपाक होई. रोज सकाळ संध्याकाळ मेजवानी. बाळाला पुरणपोळी फारच प्रिय. माझ्यासारखीच. ती तर हमखास पहिल्या दुसऱ्या दिवशीच होत असे. म्हणजे मग दोन तीन दिवस ती खाता येत असे. जेवणाची पंगत झाली की रोज गप्पांचीही पंगत बसे. बाळ पाळण्यावर बसून आय. आय. टी. च्या गमती जमती सांगे. तो तसा गोष्टम्याच होता. गोष्टी रंगवून सांगण्यात तो माझ्यासारखा तरबेज होता हे तर मलाही माहीत होते.
पाहता पाहता हे आनंदाचे सात दिवस सरूनही जात. पुन्हा जाण्याचा दिवस येई. निरोपाची घडी येतच असे. जाणाऱ्याला शेवयाची खीर खाऊ घातली की तो लवकर परत येतो अशी एक समजूत आहे. वाड्यातली म्हातारी तर शेवटच्या जेवणात हटकून खीर करायची. म्हणजे बाळ लवकर परत येईल अशी तिला खात्रीच असे. बाळ विज्ञाननिष्ठ असल्यामुळे त्याचा अशा अंधविश्वासावर विश्वास नसे. त्याला चिडवण्याकरिता आई मुद्दाम म्हणे की ती जाताना खीर करते म्हणूनच तो पुन्हा परत येतो. बाळही मिस्किल हासत असे. या विश्वासानेच जर आईला दिलासा मिळत असेल तर त्यालाही ते हवेच असे.
कवितेतल्या बाळाच्या आईला मनोमन हे माहीत होते की तिच्या वैज्ञानिक बाळाचा अशा गोष्टींवर विश्वास बसणार नाही. त्याच्या शास्त्राधिष्ठित प्रमेयात हे बिनबुडाचे विश्वास बसणारच नाही. पण हे विश्वास इतके जुने, भक्कम व मुरलेले, अगदी वाड्यातील माजघराच्या कुडाच्या भिंतीसारखे, की त्यांना सहजासहजी तडा जाणे शक्य नव्हते. विश्वास आहे म्हटले की आहे. तुझ्यामाझ्यावर या लोकांचा जसा आहे तसा. एक वेळ आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेल्या सिमेंटच्या भिंतींना तडा जाईल, पण कुडाच्या भिंतींना, वारंवार रूढींच्या शेणाने गिरविलेल्या विश्वासाच्या भक्कम भिंतींना तडा जाणे अशक्य आहे. हा पिढ्यानपिढ्या मनामनात रुजलेला विश्वास ढळणे काही शक्य नाही. विज्ञानवृत्तीच्या बाळाला, चार्वाकवृत्तीच्या बाळाला हे पटो वा न पटो.
ब्रह्मा, वाड्यामधे मास्तरांचा व आईचा भाविकपणा व त्यांच्या उच्चशिक्षित मुलामुलींची विज्ञाननिष्ठा ह्या दोन्ही परस्पर विरोधी विचारांचा एक अनोखा संगम होता. नव्या व जुन्याचा हा संगम अनुभवण्यासारखा होता. विश्वास नसलेला बाळही देवीच्या नवरात्रात संध्याकाळच्या एक दीड तास चालणाऱ्या आरतीला उभा राहून टाळ्या वाजवत असे. दशमीला, म्हणजे दसऱ्याला रावणही मारत असे. त्यालाही साऱ्या आरत्या तोंडपाठ होत्या. तो म्हणू सुद्धा लागत असे. परस्परविरोधी विचारांचे द्वैत परस्पर आपुलकीमुळे अद्वैतात बदलत असे. परस्परांविषयीच्या निर्भेळ प्रेमामुळे भागवतनिष्ठा व विज्ञाननिष्ठा एकाच छताखाली सहज नांदत असत. कौलारू वाड्यातले हे संगमी वातावरण मला खूप आवडायचे.
ब्रह्मा: नारदा, हे आयायटी का फायायटी म्हणतोस ते म्हणजे गुर्वाश्रमासारखेच का रे?
नारद: हं. त्याचेच आधुनिक रूप म्हण. फक्त येथे गुरू एक नाही, अनेक. देशोदेशींचे दिग्गज शिक्षक एकत्र येऊन देशभरातून आलेल्या निवडक मुलांना कुठलाही भेदभाव न करता शिकवितात. वसिष्ठ, सांदिपनी, द्रोण, कृपाचार्य, धौम्य सारे एकत्र येऊन शिकवतात असे समज. एकलव्य सुद्धा येथे सर्वांबरोबर वर्गात बसून शिकतो. बाहेरून चोरून लपून नाही. काही काही गोष्टी खूप छान असतात रे ब्रह्मा यांच्यात पण.
प्रमोदला सुद्धा हिमालय ओलांडून आलेले सप्रिकिन नावाचे परदेशी शिक्षक शिकवीत. त्यांना तर को इतका आवडायचा की ते त्याला त्यांच्या देशात, म्हणजे रशियाला पुढच्या शिक्षणासाठी घेऊन जाणार होते. पण बाळाच्या नशिबात तू परदेशगमन लिहिले नव्हते. तुझ्यापुढे सप्रिकिनचे काय चालणार? बाळ काही कधी परदेशी गेला नाही.
ब्रह्मा: पुरे आता टोमणे. एक संधी तू सोडत नाहीस. चला आता पुढे. आण, मी वाचतो. अर्थ मात्र तू सांग.
संशोधक तू मोठा सांगे दूरदर्शनाचे बीज
कौतुक सर्वांना त्याचे वाड्यात जरी नव्हती वीज
माजघरी पाळण्यावरी बसुनी तू सांगे सर्वांना
काय तुला पश्चिमेस दिसले, ठिणगी ठरली अनुजांना
श्रद्धा माझी त्याच्यावर, विज्ञान परी तुजला देव
'तो' मज कर्ता शुभाशुभाचा, भौतिकशास्त्र तुझा देव
राम कृष्ण तू माझा, कौसल्या नि यशोदा तुज देव
परस्पर विरोधाचे साक्षी हारजडित घरचे देव
द्वैतातच अद्वैत असावे प्रगतीची हीच निशाणी
वादातच संवाद असावा वाड्याची हीच कहाणी
मतमतांतरांचे पंचामृत, सोळाभाज्या लक्ष्मीला
भिन्न स्वाद एकत्र आणतो तोच खरा उंच फुलोरा
नारद: हं. छान वाचलेस, ब्रह्मा. आवाज थोडा घोगरा वाटला एवढेच. होते असे गहिवरले की. बाळ मुंबई आय. आय. टी.त इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधे शिकत असे. त्याचा संशोधनाचा विषय सिग्नल प्रोसेसिंग व कम्युनिकेशन असा होता म्हणे. मला तरी त्यातले काय कळायचे म्हणा. पण थोडक्यात म्हणजे आज आपण जो टी. व्ही. बघतो, किंवा काँप्यूटर वापरतो किंवा फोनवर बोलतो हे सर्व या विषयात झालेल्या प्रगतीमुळे शक्य झाले आहे. आवाज, चित्रे हवेतून किंवा तारेतून एक प्रकारच्या तरंगातून, लहरीमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे पोहोचवायचे याचे ते शास्त्र. आपण देव वाटेल तेव्हा नभोवाणी करून, प्रकट होऊन वा स्वप्नात जाऊन आपले विचार, आपले आदेश मानवापर्यंत पोहोचवत असू. तसेच काहीसे करायचा यांचा हा प्रयत्न. यांना आपल्यासारखी जादू, चमत्कार करता येत नाही. हे मायावी नाहीत. यांच्यापाशी मंत्रशक्ती नाही. यांनी 'ॐ ठाम ठूम ठैंया ठूस' म्हटले तर माशी सुद्धा मरत नाही. त्याची उणीव हे तंत्रशक्तीने भरून काढतात. यांना भौतिकशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. त्या प्रयत्नात जगभरचे वैज्ञानिक आपला आपला हातभार लावीत असत, आहेत व राहतील. तोच बाळाचाही संशोधनाचा विषय होता. पण काही ठोस हातभार लावण्यासाठी आधी त्या विषयात तोपर्यंत काय काम झाले आहे ते समजावून घ्यावे लागे. हे लोक आपल्यासारखे गर्भात असतांनाच चक्रव्यूहभेद आत्मसात करीत नाहीत. त्याकरिता ते शाळाकाॅलेजात जाऊन शिक्षण घेतात. त्यातच यांचे २०-२२ वर्ष जातात. मग यांचे संशोधन सुरू होते व हे विज्ञानाला एक एक पाऊल पुढे नेतात. सागरसेतू बांधणारी खारूताई असे ह्या प्रत्येक संशोधकाचे वर्णन करायला हरकत नाही. आपला प्रमोद अशीच एक कष्टाळू खारूताई होता. आपले अनुभव तो माजघरात पाळण्यावर बसून लहानथोरांना सांगत असे. शक्य तितक्या सोप्या भाषेत तो त्यांना आपल्या कामाचे मर्म सांगत असे. पश्चिमेला उच्चशिक्षणाने त्याला जणू विज्ञानाचे पूर्वीपेक्षाही विशाल विश्वरूपदर्शनच झाले. तेच तो सर्वांना सांगत असे. हे बाळाचे विज्ञानकीर्तनच म्हण. त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या भाउबहिणींनाही शिक्षणाची ओढ लागली. त्याचे अनुभवकथन त्यांची जिज्ञासा पेटवणारी ठिणगीच ठरली. म्हणून त्या वाड्यात नंतर उच्चशिक्षणाचा वणवाच पेटला. सारेच त्या मार्गाने जायचे स्वप्न बाळगू लागले. त्यांची ती स्वप्ने पुढे जाऊन खरीही ठरली. त्याचे श्रेय बाळालाच द्यायला हवे. जुन्या वाड्यात नवे वारे वाहू लागले ते बाळामुळेच.
कवितेतल्या बाळाचे, आईचे व वाड्याचेही अगदी तसेच. बाळाची आई व बाबा अगदी भाविक, धार्मिक. विज्ञानाशी जवळीक साधल्यामुळे बाळ बराचसा बदलू लागलेला. तू आईचा देव तर विज्ञान बाळाचा देव. तू तिला साऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचा सूत्रधार वाटायचा तर सारे काही निसर्गनियमानुसार, म्हणजे भौतिकशास्त्राच्या नियमानुसार होते हा बाळाचा विश्वास. पण असा जरी विरोधाभास दोघांच्या विश्वासात होता तरी तिची जशी राम कृष्णावर नितांत श्रद्धा तशीच त्यालाही कौसल्या यशोदेच्या मातृत्वाची, ममतेची महत्ता कळत असे. माजघरातल्या देवघरातील देव या वैचारिक द्वंद्वाचे साक्षीदार होते. जुन्या आणि नवीन वैचारिक युगांचा संधिकाल म्हणजे वाडा होता.
नंतरच्या कडव्यात तर वाड्यातील या आगळ्यावेगळ्या घरकुलाचे मर्म सामावलेले आहे. भिन्नभिन्न विचार, विश्वास व धारणांचा आदर सर्वांगीण प्रगतीला पोषक असतो. कट्टरपणा, माझे तेच सत्य हा फक्त दुराग्रह झाला, सत्याग्रह नाही. बौद्धिक पातळीवर वादविवाद हे वाड्याचे वैशिष्ट्य होते. नऊ जणांची नऊ मते. तरी पण ते कुटुंब एक होते.
ब्रह्मा, वाड्यातल्या महालक्ष्म्या मी पाहिल्या आहेत. म्हणून मला पंचामृत म्हणजे काय हे माहीत आहे. वडापुरणाचा स्वयंपाक पंचामृताशिवाय पूर्ण होत नाही. आपण एका अमृताचे एवढे कौतुक करतो. खरे म्हणजे ते अगदी बेचव, अळणी असते. समुद्रमंथनातून निघाले खरे, पण साधी मीठाची पण चव नाही. यांच्या पंचामृतात मात्र पाच चवींचा संगम. आंबट, गोड, कडू, खारट, तिखट स्वाद गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. अहाहा! ओहोहो! तसेच महालक्ष्म्यांना सोळा निरनिराळ्या भाज्या एकत्र शिजवून एक भाजी करतात. त्या भाजीचे नावच मुळी सोळाभाजी. आणि फुलोरा तर तुला माहीतच आहे. सोळा सोळा पात्या, साटोऱ्या व करंज्या मिळून एक फुलोरा. ज्येष्ठा कनिष्ठेच्या डोक्यावर असे दोन फुलोरे टांगलेले. अहाहा! ओहोहो!
ब्रह्मा, वाडा म्हणजे असेच पंचविचारांचे पंचामृत, सोळा विश्वासांची सोळाभाजी, आणि आई-बाबा-मुले यांचा फुलोरा. अहाहा! ओहोहो.
चला ब्रह्माजी, जाऊ द्या बाळगंगा पुढे.
ब्रह्मा:
पश्चिम पादाक्रांत करूनी उत्तरमुख यात्रा आता
सह्याद्री आशिर्वच देई निरोप तू त्याचा घेता
सागर सोडुनि गंगातीरी नवविद्याश्रमी तू जासी
निरांजनाची ज्योत शोधते आकाशी अढळ धृवासी
सांग रे बाबा समजावून. काहीच कळले नाही.
नारद: हं, कठिण आहे ब्रह्मा. म्हातारीचाच हा बाळ आहे असा विचार केला तर अर्थ लागतो. नागपूरच्या पश्चिमेला सागरतीरावर, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मुंबईच्या आय.आय. टी.त M.Tech. चा अभ्यासक्रम आटोपून बाळाची भूक भागली नाही. त्याने आता उत्तरेत गंगातीरावर वसलेल्या कानपूर नगरीस्थित आय. आय. टी.त Ph. D. करिता प्रवेश घेतला. हा कमीतकमी पाच वर्षांचा अभ्यासक्रम. ही मानवांची सर्वोच्च पदवी. Doctor of Philosophy. PhD. संस्कृतमध्ये तत्वज्ञानाचार्य म्हणता येईल. मुंबईला शिक्षण आटोपून बाळ पुन्हा नागपूरला परतेल अशी आशा होती. पण तसे झाले नाही. तो पश्चिम सोडून उत्तरेला गेला एवढाच बदल. आता वाड्यात वाढदिवस, आसनी, भाऊबीज असले की उत्तरेकडे निरांजनाची ज्योत करून बाळाला अक्षवान व्हायला लागले. वाड्याच्या होकायंत्राची सुई जिकडे त्यांचा बाळ असेल तिकडेच वळत असे. बाळाचे वाडेकऱ्यांच्या मनातील स्थान अढळ होते. उत्तरेकडे गेलेला त्यांचा बाळ त्यांचा जणू उत्तरध्रुव होता.
ब्रह्मा, आता वाच हे पद पुन्हा एकदा. तुला समजेल व आवडेल. पुढचेही घे एक दोन कडवे त्याच दमात.
ब्रह्मा:
पश्चिम पादाक्रांत करूनी उत्तरमुख यात्रा आता
सह्याद्री आशिर्वच देई निरोप तू त्याचा घेता
सागर सोडुनि गंगातीरी नवविद्याश्रमी तू जासी
निरांजनाची ज्योत शोधते आकाशी अढळ धृवासी
अढळ तुझी श्रद्धा विज्ञानी, अखंड संशोधन आता
नवी प्रमेये, नव्या पद्धती, नवी मते रुजली आता
अन्यायाची चीड, पुरस्कर्ता सामाजिक न्यायाचा
पैलू पडती नवे नवे तुझिया व्यक्तित्वाला आता
विद्यार्थ्यांचा नेता तू, निर्भीड प्रखर भाषणे तुझी
प्रभुत्व भाषेवर राणीच्या, सवय जुनी तव वादाची
शाळेतील जुनी शस्त्रात्रे, पांडवप्रकृती नित्य तुझी
सभा जिंकणे, वादरणांची लडी लागली नित्याची
विसर न पडला तरी तुला बाळा तुझिया रे ध्येयाचा
पंचवार्षिकी होता सादर केला प्रबंध शोधाचा
सागर, गंगा पडाव मागे, मरुभूमीला कूच तुझे
प्राध्यापक बाळाचा होता मन आनंदित वाड्याचे
नारदा, बऱ्यापैकी समजले रे. तरी पण तू सांगच सांग. तू अनुभवलेली कथा असल्यामुळे तुझे विश्लेषण वेगळेच असते. तसेही मला ते राणी, पांडव उल्लेख काही नीटसे कळले नाहीत.
नारद: ब्रह्मा, बाळ उत्तरेच्या कानपूर आय. आय. टी.त दाखल झाला आणि त्याचे संशोधन सुरू झाले. Ph. D. काही साधी सोपी गोष्ट नाही. असलेल्या ज्ञानात थोडी भर घालावी लागते ही पदवी मिळायला. हे नुसते विद्याग्रहण नव्हे. गुरूला येते तेवढे शिकून होत नाही. त्याही पलीकडे जावे लागते. आता नुसते ज्ञानार्जनच नाही तर ज्ञानवर्धन करावे लागते. आहे त्या जागतिक ज्ञानात भर टाकावी लागते. विज्ञानाचा सत्यशोधक सेतू बांधायला आपणही आपल्याकडून एक दगड टाकायचा असतो. फूल ना फुलाची पाकळी विज्ञानदेवतेला वाहावी लागते. बाळाची ज्ञानदेवतेवर, विज्ञानदेवतेवर नितांत भक्ती. ब्रह्मा, शेवटी भक्ती, श्रद्धा, निष्ठा ही कुठे तरी असावीच लागते. ती नेमकी कुठे असावी हे जो तो आपल्यापुरते ठरवत असतो. कोणाला कुठे पोहोचायचे असते, कोणाला कुठे. कोणी जपमाळेचे मणी ओढत बसतो, कोणी टाळ कुटत बसतो, कोणी नव्या नव्या प्रमेयात, सिद्धांतात निसर्गसत्ये मांडत असतो.
ब्रह्मा, विज्ञानाचे निकष प्रत्येक ठिकाणी लावता लावता प्रत्येकच गोष्ट खरी-खोटी, चांगली-वांगली पडताळून पाहण्याची सवय लागते. बाळाचेही तसेच झाले. त्याचे वाचन, निरीक्षण, परीक्षण तसेही दांडगे होते. त्यामुळे त्याला रस असणाऱ्या गोष्टींचा आवाका सतत वाढता होता. आपल्या सभोवतालच्या घडामोडी, समाजरचना, न्याय-अन्याय इत्यादी विषयांचे त्याचे आकलन वाढले. त्याच्या व्यक्तित्वाला पाळण्यातले पाय दाखवू शकले नसतील असे पैलू पडू लागले. खास करून सामाजिक अन्याय, अंधश्रद्धा, जातिभेद, सत्ताधाऱ्यांची दडपशाही, व्यक्तिस्वातंत्र्यावर आणि विचारस्वातंत्र्यावर सातत्याने होणारे प्रहार यांचा तो प्रखर विरोधी झाला. हा विरोध केवळ दिखाऊ नव्हता. तसेही बाळाला दाखवायचे व खायचे असे दातांचे दोन संच नव्हते. बाळ जसा बाहेरून तसाच आतून. निखळ प्रामाणिक. त्यामुळे तो निर्भीडपणे व परिणामांची तमा न बाळगता सभोवतालच्या अन्यायाविरुद्ध बोलू लागला. लेख लिहू लागला. बाळ म्हणजे काहीही झाले तरी तोंडातून ब्र न काढणारा ब्रह्मदेव नव्हता. काय?
ब्रह्मा: हं. करा थट्टा. अरे मी तोंडातून ब्र न काढता माझे नाव पण कोणाला सांगू शकत नाही. माय नेम ईज ब्रह्मदेव म्हणायला सुद्धा तोंडातून ब्र काढावा लागतो. खरे म्हणजे जनतेने, रयतेने अन्यायाविरुद्ध, असत्याविरुद्ध तोंडातून ब्र काढायला शिकावे, तसा सराव करावा म्हणून मी माझे नाव ब्र पासून ठेवले. पण लोक कुठले ऐकतात? त्यांच्या तोंडी नेहमी 'ना'. नारदाचा ना.
नारद: छान बाजी पलटवलीस हं तू ब्रह्मा. अगदी बाळासारखे वाक्चातुर्य दाखविलेस. नारदाचा ना म्हणे. व्वा. आवडले मला. बाकी तू जाॅनजेनीची भाषा पण बोलू लागला हं. माय नेम ईज ब्रह्मदेव काय ठसक्यात म्हणालास. उच्चार तसे स्वर्गमोळे, पण चालेल. वेल डन. उत्तम.
तर सांगायची गोष्ट म्हणजे कानपूरला बाळामधे कल्पना करता येणार नाही असा बदल झाला. तो तिथे विद्यार्थ्यांचा नेता झाला. त्याची त्या काळची भाषणे व लेख खूप गाजले. तसेही भाषण, निबंध, वादविवादाचे बाळकडू तो प्यायलाच होता. शालेय जीवनातील ते कौशल्य आता अधिकच धारधार झाले. मायबोली मराठी सारखेच, किंबहुना थोडे ज्यास्तच प्रभुत्व त्याला इंग्रजी भाषेवर प्राप्त झाले. कानपूर आय. आय. टी.त भारतवर्षाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी यायचे. विविध मातृभाषा बोलणारे विद्यारथी विद्यार्थी आता बाळाचे मित्र झाले. सर्वच एकमेकांशी इंग्रजीत बोलायचे. इंग्रजी म्हणजे आपल्या जाॅनजेनीची भाषा. भारतासारखेच इंग्रजांचे अमेरिकेवरही राज्य होते. म्हणून तेथेही त्यांची भाषा प्रचलित झाली. त्यामुळेच भारतातही विज्ञान तंत्रज्ञानाचे उच्चशिक्षण इंग्रजीतच होते. इंग्रजांचा देश म्हणजे इंग्लंड, विलायत. तिथे त्यांच्या राणीचे राज्य चालायचे. म्हणून इंग्रजीला थोड्याशा उपहासाने राणीची भाषा, Queen's language म्हणतात. त्याचाच ओझरता उल्लेख कवितेत आहे. बाळाचे इंग्रजी लेख, भाषणे व वादविवाद गर्जू लागले.
एकदा वादविवादाचा विषय 'God does not exist' असा होता. ईश्वरवाद किंवा अनीश्वरवादावरचा हा वादविवाद. अभ्यासपूर्ण भाषणे झाली विद्यार्थ्यांची. सारेच हुशार. पण श्रोत्यांना प्रमोद नावाच्या वक्त्याची प्रतीक्षा होती. प्रमोद म्हणजे बाळ. बाळ ठरावाच्या बाजूने बोलणार होता. म्हणजे निरीश्वरवादाची बाजू घेणार होता. म्हणजे तुझे माझे अस्तित्व नाकारणार होता. साधारणतः वक्त्याचे भाषण संपले की मग श्रोते टाळ्या वाजवतात. पण त्या दिवशी जसेच बाळाला त्याची बाजू मांडायला पाचारण करण्यात आले तसेच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. टाळ्यांच्या कडकडाटातच बाळ भाषणाकरिता उभा झाला. क्षणभर शांतता पसरली. बाळ आपले पहिले वाक्य उच्चारला आणि त्यावर टाळ्यांचा जो कडकडाट झाला की काही सांगू नका राव. ढगांचा गडगडाट फिका पडावा असा टाळ्यांचा कडकडाट.
ब्रह्मा: किती उत्सुकता ताणतोस रे. अगदी कीर्तनकार आहेस. सांग लवकर काय ते वाक्य होते ते.
नारद: God is dead. बाळ उच्चारला God is dead.
ब्रह्मा: हं. तुला मला माहित असलेले, पण कधीही ओठांवर येऊ नये असा रिवाज असलेले हे सत्य तो उच्चारला? आणि इतरांनी त्याला दुजोरा दिला? काय म्हणतोस तरी काय?
नारद: होय ब्रह्मा. नंतरचे त्याचे भाषण खूपच विद्वत्तापूर्ण होते. बाळ विद्वानच नाही तर वाक्चतुर आणि हजरजबाबी होता. God is dead, 'ईश्वर मरण पावला आहे' या वाक्यात खरे म्हणजे बाळाने ईश्वर आधी अस्तित्वात होता किंवा असू शकेल हे कबूल केले. निसर्गातील अफाट रहस्ये व प्राचीन काळी त्यांचा उलगडा न झाल्यामुळे ईश्वर कल्पनेचा झालेला उदय त्याने विषद केला. पण जसे जसे लंगडे विज्ञान प्रगत होत गेले तशी तशी देव ह्या कल्पनेच्या कुबडीची विज्ञानाची गरज कमी झाली व आता विज्ञान स्वत:च्या पायावर उभे झाले आहे असा त्याचा मुद्दा होता. म्हणून God is dead.
बाळाने आणखीही एक विचार मांडला. समाजातील अन्याय, ईश्वर ह्या कल्पनेचा झालेला गैरवापर, ईश्वराच्या नावावर पद्धतशीर माजवलेला मनुवाद, अंधश्रद्धेवर आधारलेला ब्राह्मणवाद, यावर त्याने परखड विचार मांडले. ह्या बोकाळलेल्या सामाजिक विषमतेनेच ईश्वर कल्पनेवर, पूर्वी कदाचित उदात्त असलेल्या, लोकांना दुष्कर्मापासून परावृत्त करायला पुढे केलेल्या बागुलबोवाच्या, म्हणजेच देव या कल्पनेच्या मूळावरच घाव घातला. आणि म्हणून हा ईश्वर, ही मूळ कल्पनाच आधुनिक ज्ञानविज्ञानयुगात मृत झाली आहे असे मत त्याने मांडले.
ब्रह्मा, आजचा काळ असता तर हे भाषण चित्रमुद्रित, कमीतकमी ध्वनिमुद्रित तरी झाले असते. पण तेव्हा तसे झाले नाही. शब्द हवेत विरून गेले. चित्रगुप्ताने लिहून घेतले असतील कदाचित नंतर पापपुण्याचा निवाडा करायला. पण ब्रह्मा, तुझा तो पुत्र, माझा भाऊ तरी आता कुठे आहे? तोही मानवाची कल्पनाच. असो, कवितेपासून खूप दूर आपण भरकटलो. चल नसलेल्या ईश्वरा पुन्हा मूळपदावर.
ब्रह्मा: हं. आत्ता मला कवितेत पांडवांचा उल्लेख कां आला ते कळले. सत्याची बाजू मांडणारा म्हणून बाळ पांडवप्रकृतीचा असे त्याची आई म्हणते. महाभारताकडे संकेत आहे. ते मला कळावे म्हणून तू त्याचे कानपूरचे भाषण उजळले. खरेच बाळ अगदी चार्वाक होता रे. जाॅनजेनीकडे मी विज्ञानाचा उगम नावाचे पुस्तक चाळत होतो. त्यात सुद्धा चार्वाकाचा आदरपूर्ण उल्लेख मानवांचा प्रथम वैज्ञानिक म्हणून होता. पण म्हणूनच अंधश्रद्ध लोक आजही त्याचा तिरस्कार करतात. विज्ञाननिर्मित गोष्टी जरूर वापरतात, पण विज्ञानाला नावे ठेवतात. टाळके वापरण्याऐवजी टाळ वाजवत बसतात.
अरे ती बघ मांजर चोरून दूध पिते आहे. हाकल तिला. शिर्र शिर्र!
नारद: अरे पिऊ दे. तिच्यासाठीच ते ठेवले असेल काकूंनी. तसेही तिला पाप लागणार नाही कारण ती डोळे मिटून पीत आहे. तू आणि मी, म्हणजे देव, तिला तसे करतांना पाहत आहोत हे तिला बिचारीला काय माहीत. सोड तिला. मार्जारीस्वभाव तू सुद्धा बदलू शकणार नाही.
ब्रह्मा, मार्जारी म्हणताच एक छान कोडे आठवले रे. मी ते बाळाची पेन घेऊन एकदा लिहून घेतले होते. पाठ पण केले. सगळ्या कीर्तनात वापरतो. सोडव तू ते कोडे. वाटल्यास ही काकांची जुन्या प्रकारची नीप, म्हणजे nib असलेली शाईची पेन घेऊन लिहून घे. अगदी वाड्यातली टाक-दौत आठवते अशी पेन पाहिली की. बाळ जायचा टाक दौत घेऊन शाळेत. बोटे शाईने लिडबिडलेली असायची नेहमी. मोठा झाला तरी हातात नेहमी लीक होणारी पेन व बोटे शाईने माखलेली. लहानपणापासून जी लेखणी त्याने हातात घेतली ती जणू त्याच्या बोटांना जन्मभर चिकटून बसली. अमाप लेखन केले त्याने. विपुल लेखनसंपदा त्याची. आपल्या व्यासांसारखा व्यासंग त्याचा. असा हा बाळ आपल्या आईचा.
तर ऐक ब्रह्मा ही प्रह्लिका. तिलाच आजकाल पहेली म्हणतात. हा अपभ्रंश शब्दब्रह्माचे काय करेल सांगता येत नाही. प्रह्लिकेची पहेली होते घासून घासून.
कृष्ण-मुखी न मार्जारी द्वि-जिह्वा न च सर्पिणि ।
पञ्च-भर्ता न पाञ्चाली यः जानाति सः पण्डितः ॥
तोंड काळे आहे, पण मांजर नव्हे. दोन जिव्हा आहेत, पण सर्पिणी नव्हे. पाच काळजीदार आहेत पण द्रौपदी नव्हे. जो कोण हे सांगेल तोच पंडित. सांग बरे कोण.
ब्रह्मा: नको परीक्षा घेऊ रे. मी काही पंडित बिंडित नाही. मी काही PhD केली नाही बाळासारखी. चल पुढे आता.
नारद: अरे शाईची पेन, दौतीतला टाक. पेनचे तोंड शाईत बुडून मांजरीच्या तोंडासारखे काळे झालेले असते, तिची जीभ, म्हणजे नीप, मधून सापाच्या जीभेसारखीच दुभंगलेली असते. ती द्रौपदी जशी पाच पांडवांच्या सुरक्षाकवचात असे तशीच लेखकाच्या पाच बोटांनी घेरलेली असते, म्हणून पेन हे या कोड्याचे उत्तर. खरे म्हणजे मी उत्तराकडे अंगुलीनिर्देश पण केला होता. उगाचच पेन पेन टाक टाक म्हणत होतो मी. पेपर मी आधीच फोडला होता. पण तू म्हणजे ना ... आपला म्हणजे ना ... हे म्हणजे ना ... खूपच बा. बरं, चल पुढे जाऊ.
कालांतराने बाळाने आपल्या संशोधनावर आधारित प्रबंध सादर केला. तब्बल पाच वर्षांचे संशोधन. बाळ Ph.D. झाला. ही सर्वोच्च पदवी. शिक्षणाचा शेवटचा टप्पा. आता पुढे काय?
शिक्षण संपले आणि लगेच बाळाला वायव्येच्या वाळवंटात वसलेल्या Birla Institute of Technology and Science मध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली व ती त्याने स्वीकारली. ही संस्था ज्या गावी होती त्याचे नाव पिलानी. म्हणून ही संस्था BITS Pilani, म्हणजेच बिट्स पिलानी म्हणून ओळखली जाते. पश्चिमेचा समुद्र व उत्तरेची गंगानदी यांच्याकाठी M.Tech. व Ph.D. करिता टाकलेला पडाव आता उठला व बाळ मरुभूमीकडे गेला असे कवितेतली आई म्हणते. शिक्षण आटोपून बाळ आता प्राध्यापक झाला, शिष्य आता गुरू झाला म्हणून सारा वाडा आनंदला.
ब्रह्मा, पिलानी त्याच वाळवंटात वसले आहे जेथे अनेक पौराणिक, ऐतिहासिक युद्धे झाली. त्या जमिनीतच तर कलहाचे बीज तू पेरून ठेवले नाहीस? सहज आठवले म्हणून सांगतो. पण त्या वाळवंटातच पुष्कर नावाच्या ठिकाणी तुझे मंदिर पण आहे बरें. तशी तुझी भारतवर्षात ८-९ मंदिरे आहेत. पण त्यातले हे सर्वात प्रसिद्ध. माझे तसे भाग्य नाही. आहे म्हणा पंढरपूरजवळ माझेही मंदिर. नारायण नारायण!
ब्रह्मा: नाही रे! मी काही केले नाही. मी काही कलहाचे बीज वगैरे पेरले नाही. पण महाभारत मात्र घडलेच बरे. ते सोड आता. ऐक हे पुढचे कडवे आणि सांग मला नीट समजावून.
ज्ञानदान नवअध्यायी, ज्ञानार्जन तव नित साथीला
पाहता पाहता आवडता तू होसी रे विद्यार्थ्यांचा
सत्यकाम सत्याग्रहव्रत तव परी नावडे सत्तेला
तुला तमा नाही, पुनश्च तू निघसी पुढच्या यात्रेला
नारद: बाळ तो बाळच रे. सत्यापुढे तडजोड नाही. लौकिकार्थाने बाळाचे ज्ञानार्जन संपले. विद्याश्रम संपला. ज्ञानदान करण्याचे दिवस आले. एका अर्थाने शिक्षकी हा त्याचा खानदानी पेशा. मास्तरांचाच मुलगा शेवटी. झोकून दिले त्याने स्वत:ला त्या पेशात. त्याचे संशोधनही सुरूच राहिले. पाहता पाहता बाळ तेथे आदर्श शिक्षक म्हणून गाजला. विद्यार्थ्यांचा लाडका झाला. विद्यार्थ्यांना व शिक्षणाला पूरक असे अनेक बदल त्याने शिक्षणसंस्था चालवणाऱ्यांना सुचवले. विद्यार्थ्यांची बाजू सत्तेपुढे मांडायचा त्याने पूर्ण प्रयत्न केला. पण सत्ताधाऱ्यांना ते कसे पटणार? ते म्हणजे स्वप्रस्थापित, स्वघोषित राजे. अगदी ब्रह्मदेव. आमची भक्ती करा, पूजा आरती करा, तरच आम्ही पावतो. बाळ कुठला हे करणार. तो वेगळ्याच मातीचा बनलेला. वेगळेच पाणी प्यायलेला. मग काय, रोज वरीष्ठांशी खटके उडू लागले. बाळाच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होऊ लागला. बऱ्याच हितचिंतकांनी बाळाला थोडे पडते घेण्याचा सल्ला दिला. पण बाळ आणि तडजोड यांचे साप मुंगसाचे वैर. सत्याग्रही सत्यकाम बाळाने शेवटी पिलानी सोडायचे ठरवले व आपला राजीनामा दिला.
सत्ताधाऱ्यांना आनंदच झाला असावा. टळली एकदाची पीडा असे त्यांना वाटले असावे. पण विद्यार्थीवर्ग मात्र हळहळला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मुखपत्रात 'एक और सत्यकाम की बिदाई' शीर्षकाचा एक भावपूर्ण लेख प्रसिद्ध केला. बिदाई म्हणजे निरोप. बाळ पिलानी सोडतांना अनेक विद्यार्थी दुतर्फा उभे होते व हात हालवून निरोप देत होते. अल्पावधीत विद्यार्थ्यांच्या ह्रदयात स्थान मिळवणाऱ्या बाळाने त्यांचा निरोप घेतला. छावणी पुन्हा उठली. पुढच्या किल्ल्याकडे बाळाने कूच केले.
ब्रह्मा: नारदा, तूच वाच आता पुढे. डोळ्यात वाळवंटातल्या वाळूचा कण गेला रे बहुतेक.
नारद: आले लक्षात. ऐक तर. की कानातही वाळू गेली?
सन्निध हरीच्या द्वारी येसी, काय असे योगायोग
हिमशिखरांनी साद घातली, काय असे योगायोग
सह्याद्री ते हिमगिरी यात्रा, काय असे योगायोग
ब्रह्मदेव जाणतो, योजितो तोच सर्व योगायोग
शास्त्र आमुचे इतके साधे, खापर ब्रह्माच्या माथी
बरे घडो, न घडो, 'ब्रह्मार्पण' हेच शब्द ओठी येती
तोची लेखक तव नाट्याचा, पंचमुखी दिग्दर्शक तो
रंगमंच तो, पडदा ओढी, पडदा सोडी जो तो तो
हा प्रवेश तव नाट्याचा संपला कधी कळले नाही
पुन्हा हालला तंबू, दक्षिण दिशा निमंत्रण तुज देई
चतुर्दिशा धुंडाळुन झाल्या, भोवरा जणू पायात
तेच निरांजन, तीच आसनी, तीच भाबड्यांची रीत
ब्रह्मा, बाळाचा पुढचा पडाव उत्तरेतल्या रूडकी विश्वविद्यालयात पडला. हे जंबुद्वीपावरचे शंभर वर्षाहूनही जुने विद्यापीठ. रूडकी गाव हरिद्वार पासून एक दहा कोसावर. म्हणजे पाच सहा योजनांवर समज. हरिद्वारला शंकराच्या जटेतून निघालेली गंगा सपाट जमिनीवर उतरते. तोपर्यंतचा तिचा प्रवास हिमालयातूनच होतो. हरिद्वार आणि त्याही पलिकडचे ऋषिकेश ही भाविकांची तीर्थस्थाने. अशा पुण्यदायी ठिकाणाच्या नजीक बाळ आला म्हणून त्याची आई आनंदते.
रूडकी विश्वविद्यालयाच्या मुख्य भवनाच्या प्रांगणात उभे राहिले की समोर दूर हिमालयाची हिमाच्छादित शिखरे दिसतात. अगदी हिमालयाच्या कुशीत आपण आलो असे वाटते. सह्याद्रीने हाक घातली म्हणून बाळ उच्चशिक्षणाकरिता नागपूरहून मुंबईला गेला. आता हिमशिखरांनी साद घातल्यामुळेच बाळ रूडकीला आला असे आई समजते. हे सर्व काही तूच घडवून आणतो असे ती म्हणते. लबाड कुठला! करून सवरून नामानिराळा.
ब्रह्मा: नारदा, चारही गळ्यांची शपथ घेऊन सांगतो की मी हे नाही घडवले. मी संत आहे. इन्नोसंत.
नारद: Innocent रे ब्रह्मा. इन्नोसंट असा उच्चार आहे. इन्नोसंत नाही. हा जाॅनजेनीच्या भाषेतला शब्द. इन्नोसंट म्हणजे अजाण, निर्दोष, निरपराध. हा काही कोणी संत नाही काही. खूप गोंधळ असतो तुझा भाषेच्या बाबतीत. असो. शब्द समजून वापरावे. शब्दब्रह्म असतात ते. तू उच्चारले की ब्रह्मशब्द होतात. त्यामुळे जपून वापरत जा.
आई म्हणते की तिचे शास्त्र अगदी साधे सोपे आहे. त्या शास्त्रानुसार सर्व चांगल्या वाईटाला तू जबाबदार आहेस. मानव फक्त तुझ्या नाट्यातले एक पात्र, कठपुतळी असतो. तू त्याला वाटेल तसे नाचवतो, त्याच्याकडून हवे ते करवतो, वदवतो. बाळाच्या नाट्याचाही तूच लेखक, दिग्दर्शक असा तिचा विश्वास आहे. चतुरानना, ती तुला पंचमुखी म्हणते. आठवते ना तुला आधी पाच तोंडे होती व नंतर एक शिवाने छाटल्यावर चारच राहिली ते? वर नजर ठेवणारे तोंड गेले. आता फक्त चार दिशेला चार. ऐंशी टक्के पंचानन. असो.
पडदा वर ओढणारा तू, पडदा सोडणारा तू. बाळाच्या जीवननाट्याचा हा रूडकीचा प्रवेश तू लवकरच आटोपलास. तू त्याला आता दक्षिणेस जाण्याचा आदेश सोडलास. बिचाऱ्या वाडेकऱ्यांना काय? आता आसनी, भाऊबीज, वाढदिवसाला ते भाबडे निरांजनाची दिशा दक्षिणेकडे वळवू लागले. म्हणजे माजघरातल्या पाळण्याकडून देवघराकडे, देवघरावर टांगलेल्या देवादिकांच्या तसबिरींकडे तोंड करू जाता जी दिशा असते ती. त्या दिशेने अक्षवान व्हायचे. बाळ त्यांना नाहीतरी देवसमानच होता.
हं, आता कथा दक्षिणेकडे तू वळव.
ब्रह्मा:
कानडाऊ विठ्ठलभूमी ती मला, तुला शिक्षणसंस्था
वैज्ञानिक, अभियंता भूगर्भाचा तू ज्ञाता आता
नैसर्गिक आपदा घडवितो ब्रह्मा हरिहर आम्हासी
संशोधन तव शोधू पाहे गूढमूळ भूगर्भासी
कंपन लहरी विश्लेषण तू गणितबद्ध करण्यासाठी
झटशी रात्रंदिन, आम्हाला काय कळावे या काठी
सत्यनदीच्या या काठावर मी, तू पलिकडल्या काठी
दोघांनाही सत्य तेच दृग्गोचर, पूल कशासाठी?
कौतुक मज तव यशगाथेचे, जरी न समजे ती भाषा
कुठेतरी वाडा तुज अंगी, शिक्षण वाड्याचा पेशा
शिक्षक तू राष्ट्राचा होसी, विपुल लेख, व्याख्यानांची
सुरू मालिका, वाचक श्रोते चहूदिशांनी रे येती
नारद: ब्रह्मा, रूडकीला असतांना बाळ एका नव्याच विषयात शिरला होता. मुंबई, कानपूर, पिलानीला तो electrical engineering department म्हणजे विद्युत अभियांत्रिकी विभागात विद्यार्थी वा प्राध्यापक होता. पण रूडकीला तो Earth sciences department, म्हणजे भूविज्ञान विभागात रुजू झाला. स्वत:चे संशोधन तो आता भूगर्भातील रहस्ये उलगडायला वापरू लागला. भूगर्भाच्या कंपनांचे विश्लेषण करून पृथ्वीच्या पोटात कुठे काय आहे, भूकंप कां होतो व तो केव्हा आणि कुठे होणार याचा काही पूर्वसंकेत मिळू शकतो का, वगैरे वगैरे त्याचे अभ्यासाचे विषय झाले. Signal Processing विषयात त्याने केलेले काम येथेही फार उपयोगी पडले. ब्रह्मा, एक पातळी ओलांडली की अमुक विषय, तमुक विषय हे भेद मिटून जातात. सत्यशोध हाच एक विषय राहतो. सगळे विषय फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्रात विलीन होतात असे म्हटले तर ते असत्य होणार नाही. म्हणून तर Physics चा M. Sc., Electrical Engineering चा M. Tech. व Ph. D. बाळ लीलया Earth Sciences चा वैज्ञानिक झाला. मूळ कणा भौतिकशास्त्राचा असल्यामुळेच बाळाच्या ज्ञानाला जशी खोली होती तसेच ते फार विस्तृतही होते. त्यामुळेच तो वरपांगी वेगळ्या वाटणाऱ्या विषयात सहज शिरू शकला व टिकू शकला. असो.
बाळ रूडकीवरून आता थेट दक्षिणेतील कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या बंगलोरला आला. तेथील भारतीय विज्ञान संस्थेत, म्हणजे Indian Institute of Science म्हणजे IISc त प्राध्यापक म्हणून रुजू झाला. हा प्रदेश म्हणजे कानडी भाषिकांचा प्रदेश. आपला विठ्ठल मूळचा येथलाच. म्हणूनच तर त्याला कानडाऊ विठ्ठल म्हणतात. आई म्हणते की विठ्ठलाची भूमी म्हणून तिला कर्नाटक जवळचा वाटतो. बाळ मात्र तेथे IISc हे जगप्रसिद्ध विज्ञानशिक्षण व संशोधनाचे केंद्र आहे म्हणून गेला. त्याचे संशोधन येथेही भूगर्भभौतिकी म्हणजे geophysicsशी संबंधित होते. भूगर्भाचा रहस्यभेद हा त्याचा प्रांत होता. भूकंपासारख्या नैसर्गिक आपदांची आधीच कशी सूचना मिळू शकेल या दृष्टीने मानवांचा अखंड प्रयत्न सुरू असतो. भूकंप म्हणजे आपल्या शिवाचे तांडवच ब्रह्मा. त्याची यांना पूर्वसूचना मिळू शकली तर विनाश टळेल. कमीतकमी कमी तरी होईल. अजून तरी त्यांना त्यांच्या प्रयत्नात यश आले नाही. पण पुढे नक्कीच येईल. बाळाच्या या संशोधनाचा उल्लेख करून आई म्हणते की तिच्यासारख्या विज्ञानाशी फारच फार तर तोंडओळख असणाऱ्यांना भूकंपादि नैसर्गिक आपदांना त्यांचे ब्रह्माविष्णुमहेश, म्हणजेच ब्रह्माहरीहर जबाबदार असतात असे वाटते. ते तसेच मनापासून मानतात.
भूगर्भातून सतत येणाऱ्या कंपनलहरींचे गणित बाळ मांडत असे. त्या व तत्सम लहरींचे विश्लेषण म्हणजेच त्याचे आवडते signal processing, pattern recognition विषय. ते विश्लेषण गणिताच्या चाकोरीत बसविणे हाच बाळाचा अहोरात्र उद्योग. केव्हाही पाहिले तरी तो दिसेल त्या कागदाच्या चिटोऱ्यावर अधिक उणे, म्हणजे + - ची चिन्हे तक्त्यात भरत असे व त्याकडे एकटक पाहत बसलेला दिसे. आई प्रांजळ कबुली देते की हे सर्व विज्ञान व गणित तिच्या आकलनाबाहेरचे आहे. पण तिच्या मते त्याने काय फरक पडतो. सत्य ते सत्यच आहे. ते सर्वांना तसेच दिसते. निसर्ग सर्वांना त्याच रूपात दिसतो. ऊन वारा पाऊस सर्वांना सारखाच. फक्त भाबड्यांच्या मते ते 'तो' घडवतो तर वैज्ञानिकांच्या मते त्याला भौतिकशास्त्राच्या नियमात बद्ध करता येतील अशी कारणे आहेत. आध्यात्मिक, किंवा आधिभौतिक कारणमीमांसा काहीही असली तरी सत्य एकच आहे. नदी तीच आहे. हे एकाच सत्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन म्हणजे एकाच नदीचे दोन तीर आहेत. दोन्ही तीरांवर उभे राहणाऱ्यांना दिसणारी नदी मात्र तीच आहे. भाविक आई आणि शास्त्रज्ञ बाळ तसेच नदीच्या दोन तीरांवर असले तरी दोघांनाही तीच नदी दिसते. तीच दोघांमधील दुवा आहे. मग पूलाची काय गरज? दोघे आपआपल्या तीरावर ठीक आहेत. द्वैतातील अद्वैत आईला समजले आहे असे वाटते ब्रह्मा. चार दिशांना चार तोंडे असली तरी ब्रह्म एकच आहे.
शिक्षकी हा वाड्याचा पेशा. मास्तरांचा वाडा हीच मुळी वाड्याची ओळख होती. तोच पेशा बाळानेही स्वीकारला. बंगलोरला गेल्यापासून बाळाचे संशोधन लेख वरचेवर जगप्रसिद्ध नियतकालिकांतून येऊ लागले. अनेक ठिकाणांचे व्याख्यानांचे निमंत्रण तो स्वीकारी व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करी. पुढे जाऊन म्हणूनच त्याला राष्ट्रीय व्याख्याता, म्हणजे national lecturer म्हणून निवडण्यात आले. भारतभर इतर संस्थांमधे व्याख्याने देऊन तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ राहून संशोधन करण्यास बाळाने प्रवृत्त करावे हाच त्यामागचा उद्देश. एकंदरीत काय, कस्तुरीचा सुगंध शेवटी आसमंतात दरवळूच लागला.
ब्रह्माजी, जाऊ या पुढे की घेऊ या ब्रेक?
ब्रह्माजी: नाही नाही, डोळे मिटले तरी मी ऐकत होतो. खरेच का मानव भूगर्भाचे रहस्य एक दिवस समजेल असा विचार करून करून मी थकलो. पण तसे झाल्याशिवाय तो थांबणार नाही हे मात्र खरे. तो फार जिद्दी आहे. तो निसर्गसत्याचा उलगडा केल्याशिवाय थांबणार नाही. ते सत्यब्रह्म समोर दिसल्याशिवाय तो थांबायचा नाही. 'थांबला तो संपला, धावत्याला शक्ति येई, आणि रस्ता सापडे' हेच खरे.
नारदा, तूही थांबू नकोस. चल पुढे.
नारद: ऐक तर.
विठ्ठल-रुकमाई लक्ष्मी-नारायण जोड्या जगतात
मला जाणवे उणीव, नकळे काय माझिया बाळात
नमस्कार एकेरी जाउन आता दोघे जोडीने
पदस्पर्शाला आले आशिर्वच घेण्या आनंदाने
गंगा आकाशिची मिळाली मंदाकिनी मम ताऱ्यासी
प्रभा उजळता जीवन उजळे, ऊर्जा येत प्रकाशासी
योग असे का आपण घडवू, ते ये केवळ ब्रह्मासी
गाठ बांधली स्वर्गी त्याने, मान वा न तू, मी खासी
वाड्याने नववधू पाहता तगर मोगरा मोहरले
पुन्हा दुपारी फूल शेंदरी वाऱ्यावरती थरथरले
जाईने घेता मिठीत येतसे चमेलीला लाली
गंध अंगणी दोघींचा, बाळा कण्हेरही दरवळली
ब्रह्मा: हं. तुम्हीच पेटवा ट्यूबलाईट नारदा. मला कवितेचा खरेच गंध नाही रे.
ना: ब्रह्मा, वाड्यातल्या पाहुण्यांनाच समजतील असे संदर्भ यात आहेत. आंगणातला सुवास या कवितेत आहे. तुला कळले नाही यात नवल नाही. मनावर घेऊ नकोस. मै हँू ना!
ब्रह्मा, बारसे हा मुलाच्या आयुष्यातला पहिला समारंभ. त्याला अर्थातच तो प्रसंग आठवत नाही. तो बारा दिवसांचा असतो जेमतेम त्या वेळेस. नंतरचा मोठा समारंभ म्हणजे मुंज, मौंज, उपनयन. दोन डोळे जन्मजात असणाऱ्या मुलाचा तिसरा डोळा, ज्ञानचक्षु उघडण्याचा हा सोहळा. जुन्या रीतीनुसार हा समारंभ झाला की मूल गुर्वाश्रमी जात असे. ज्ञानग्रहणाची विधिवत सुरुवात म्हणता येईल मुंजीला. बाळाची मुंज तो ८-९ वर्षांचा असतांनाच झाली. बारशाला माता मुलाच्या कानात नाव सांगते, तर मुंजीला पिता कानात गायत्री मंत्राचा उच्चार करतो. तो मंत्र असा उघड उघड सांगू नये म्हणतात. नाहीतर मी तुला तो मंत्र सांगितला असता. मला कसा कळला हेही एक नवलच आहे म्हणा. कारण तू काही माझी मुंज केली नाही. पण हा एक लांबलचक मंत्र आहे असे समज. बाळाचीही मुंज धूमधडाक्यात वाड्यातच मांडव घालून झाली होती.
मुंजीनंतरचा मुलाच्या आयुष्यातला मोठा प्रसंग म्हणजे त्याचा विवाह. शिक्षण आटोपले की लग्न. सगळ्या आयांना आपल्या मुलाच्या लग्नाची घाई असते. कवितेतल्या आईला पण असेच वाटायचे की आता बाळाचे लग्न व्हावे. आपल्याला सून यावी. ब्रह्मा, बहुतांश देवळात सुद्धा तू जोड्याच बघतोस. राम सीता, लक्ष्मी नारायण, विठ्ठल रुक्माई, शंकर पार्वती. त्याशिवाय पूर्णता नाही रे.
ब्रह्मा: म्हणून तुझी माझी देवळे नाहीत का रे? पण मारुतीचे तर आहे.
नारद: अपवाद असतात ब्रह्मा. पण आता तो विचार सोड. बाळाचे लग्न व्हावे याकरिता आई फार आतुर होती. उशीर होतो आहे असे तिला वाटे. बाळात काय उणीव आहे म्हणून त्याच्या लग्नाला विलंब होतो आहे असे तिला राहून राहून वाटे. पण शेवटी बंगलोरला बाळ असतांनाच तसा योग आला व बाळ चतुर्भुज झाला. मुलाने व सुनेने पहिल्यांदा आईबाबांना जोडीने जेव्हा नमस्कार केला तेव्हा तिला धन्य धन्य झाले.
ब्रह्मा, निरभ्र रात्री आकाशाकडे पाहशील तर तुला विखुरलेले ढग वाटावे असा एक लांबलचक दुधाळ धूसर प्रकाशपुंज दिसेल. काकूंच्या गच्चीवरून दिसतो कधीकधी. त्याला आकाशगंगा म्हणतात. आकाशगंगा खरे म्हणजे असंख्य ताऱ्यांचा एक समुह. आपली सूर्यमाला वगैरे त्याच गंगेतला एक थेंब म्हण. त्याच थेंबाचा एक नगण्य भाग म्हणजे पृथ्वी. आणि त्या पृथ्वीवरचे हे सारे लोक. आकाशगंगेला मंदाकिनी असेही म्हणतात. अशी मंदाकिनी आईच्या ताऱ्याला, म्हणजे बाळाला, मिळाली असे आई म्हणते. सांग पाहू मग बाळाच्या पत्नीचे नाव.
ब्रह्मा: अरे कोड्यात काय बोलतोस? मला कसे कळणार? नवरा बायकोला नावे नसतात असे नाही का? नवरा म्हणजे अहो, आणि बायको म्हणजे अगं एवढेच मला माहीत.
नारद: भोळं रे भोळं माझं ब्रह्म. अरे नववधूचे नावच मुळी मंदाकिनी. म्हणजे मंदा. तर अशा आकाशगंगेचे व आईच्या ताऱ्याचे मिलन झाले. बाळाचे तेज आणखीनच तळपले, उजळले. आता तो अधिक ऊर्जेने काम करू लागला.
ब्रह्मा, लग्नाच्या गाठी तूच स्वर्गात बसून बांधीत असतो असे म्हणतात. तू ठरवतोस सगळ्या अहो आणि अगं यांच्या जोड्या. येथे जसे कीर्तन ऐकताना बाया वाती वळत असतात तसाच तू स्वर्गात सतत गाठी बांधत असतो. हेही लग्न तूच जमवून आणले. तूच हा योग जुळवून आणलास असा आईचा खासा विश्वास आहे. तिचा बाळ मानो वा न मानो. त्याच्या मानण्याने वा न मानण्याने काय फरक पडतो असे ती म्हणते. असो.
लग्न बंगलोरला झाले तरी नंतर नागपूरलाही आप्तेष्टांना मेजवानी देण्यात आली. नव्या सुनेच्या आगमनाचा वाड्याला खूपच आनंद झाला. त्याचेच आईने काव्यमय वर्णन केले आहे. ब्रह्मा, वाड्यात शिरताच डावीकडे आधी तगराचे व नंतर दूधमोगऱ्याचे झाड होते. दोन्हीही फुलझाडे. फळझाडे नाहीत. दोन्ही पांढरी फुले. सुगंधी फुलात त्यांची गणना होत नाही. वाड्याची सून पाहून तगर व मोगरा आनंदाने मोहरले असे आई म्हणते. दूधमोगऱ्याच्या बाजूला कधीकधी एक लहानसे जंगली झाड उगवायचे. बारा महिन्यातून एकदोनदा त्याला एखादे फूल यायचे. या शेंदरी रंगाच्या फुलाची विशेषता म्हणजे ते माध्यान्ही उमलायचे. म्हणून त्याचे नाव दुपारशेंदरी. अत्यंत नाजुक नव्हाळीचे फूल. मला खूपच आवडायचे. तुझे कमळ, म्हणजे ब्रह्मकमळ जसे वर्षातून एकदाच मध्यरात्री उमलते तसाच काहीसा प्रकार. असे हे दुपारशेंदरीचे दुर्मिळ फूल सुद्धा सुनेच्या स्वागताकरिता उमलले व वाऱ्यावर डोलू लागले.
दूधमोगऱ्याच्या बाजूला एकाच मांडवावर जाई आणि चमेलीचे वेल चढवलेले होते. अगदी एकमेकात गुंतागुंत झालेले. अत्यंत धुंद करून टाकणारा सुवास असलेली नाजूक फुले. चमेलीच्या फुलाच्या एका पाकळीच्या कडेला एक सुंदर तांबूस रंगाची किनार असायची. त्याचाही आईने उल्लेख केला आहे. उजव्या हाताला कण्हेराचे झाड होते. कण्हेरीचे फूल लाल. त्याला सुवास असा नाही. पण सून पाहून कण्हेरही दरवळली असे आई म्हणते. तगर, दूधमोगरा, दुपारशेंदरी, चमेली, जाई, कण्हेर यांच्या द्वारे वाड्यानेच जणू आपला आनंद व्यक्त केला.
ब्रह्मा: मस्त करंज्या नारदा. पण तू सांगितल्याशिवाय काय कळणार रे. पुन्हा एकदा वाचून आस्वाद घेईन कधीतरी. पण आता तू चल र गड्या म्होरं बिगी बिगी.
नारद: अरे वा! अगदी वाड्यातल्या सोमाची, लैजाची भाषा बोललास. ते पण असेच गोड बोलायचे. ऐक पुढे.
दक्षिण देता अशी दक्षिणा पश्चिम निमंत्रणा आली
विद्यार्थी अध्यापक झाला, सुई पुन्हा जागी आली
सह्याद्री सागर तेच जुने, 'पुनश्च मुंबई बाळोबा'
शब्द येत ओठात सहजची, भ्रमंती थांबव रे बाबा
पश्चिम उत्तर दक्षिण पश्चिम, वाडा केवळ पूर्वेला
काय तयाचे ब्रह्मलिखित, तू सोडुनि गेला तो गेला
कधीमधी तू येता त्याने क्षण क्षण मनात साठवला
भूक तयाची रवंथ करुनी भागविण्या तोही शिकला
दक्षिणेला बाळाचे लग्न झाले. पण लगेचच बाळाचा तळ तेथून उठला. पुन्हा त्याला पश्चिमेचे निमंत्रण आले. तेही जिथे त्याने काही वर्षापूर्वी M. Tech. केले त्या मुंबई IITचे. फरक एवढाच की आता तो शिकायला नाही तर शिकवायला, विद्यार्थी म्हणून नाही तर अध्यापक म्हणून जात होता. म्हणून आई म्हणते 'विद्यार्थी अध्यापक झाला'.
नागपूर सोडून बाळ प्रथम येथेच आला होता. पश्चिम दिशेकडे निरांजनाची ज्योत वळवूनच आई व बहिणी त्याला ओवाळत असत. आता पुन्हा तो तेथेच आला. वाडेकऱ्यांच्या होकायंत्राची सुई पुन्हा एकदा पश्चिमेकडे वळली. साऱ्या वाड्याकरिता बाळच त्याचा अढळ उत्तरतारा, बाळच त्यांचा ध्रुव. पुन्हा तीच मुंबई, पुन्हा तोच सह्याद्री. वाड्यातली आई गमतीने या घटनेचे वर्णन 'पुनश्च मुंबई बाळोबा' असे करीत असे. तिला बाळाचे हे वारंवार नोकरी बदलणे मात्र आवडत नव्हते. लग्न झाले, आता बाळाच्या आयुष्याला स्थिरता यावी असे तिला वाटायचे. भटकंती थांबवून त्याने आता कुठे तरी स्थाईक व्हावे असे तिला मनोमन वाटे.
कुठेतरी तिला असेही वाटत असावे की वाडा सोडून गेल्यापासून बाळ पश्चिम, उत्तर, दक्षिण, पश्चिम भ्रमंती करतो आहे. तो कधीतरी परत नागपूरला येईल. 'सीमोल्लंघन हे दसऱ्याचे असे वाटले मला मनी ।
येशील तू परतून जिंकुनी, विद्यासुवर्ण घेवोनी ।।' असे तिला वाटत होते. नेमके पूर्वेचे नागपूर कां त्याच्या भविष्यात नाही असा विचार तिच्या मनात येई. ब्रह्माने नेमके नागपूरच त्याच्या भाळी कां लिहिले नसावे हे तिला न कळे. पण तूही हट्टी. लिहिशील ते लिहिशील. थोडा मातेच्या मनाचा विचार केला असता तर तुझे काय बिघडले असते? तिने तुझे असे काय घोडे मारले होते? तूही म्हणजे ना ... अगदी हा म्हणजे ... आपला म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!
ब्रह्मा: सगळ्याकरिता मीच जबाबदार. सगळे जण मलाच दोष द्या. मी कुठे काय करतो रे? तू तरी तिला हे समजवायला हवे होते. पण तू पडला बोक्कामुच्चु. एरवी तुझ्या तोंडात तीळ भिजत नाही, पण मी काही कोणाच्या ललाटाफलाटावर लिहीत बिहीत नाही हे सत्य तू कधी कोणाला सांगत नाही.
नारद: अरे असा चिडतोस काय? ही साधी कविता आहे. तू भविष्य ठरवतो असे बाळाची आई जरी समजत असली तरी बाळाला मात्र तसे वाटत नव्हते बरे. बंगलोर मुक्कामी तर तो अधिकच विज्ञाननिष्ठ झाला. खरे म्हणजे तो प्रखर rationalist झाला. Rationalist म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी. स्वत:च्या बुद्धीचा वापर करून जे तिला पटेल व जे प्रमाणित करता येईल, ज्याचा पुरावा देता येईल, त्यावर विश्वास ठेवायला सांगणारे हे तत्त्वज्ञान म्हण. बाळ निरीश्वरवादाचाही कट्टर पुरस्कर्ता झाला होता, बाळ नास्तिक होता वगैरे म्हणणे हे त्याच्या बुद्धीप्रामाण्यवादी असण्याचे फारच वरपांगी वर्णन झाले. सत्यावर विश्वास ठेवावा, पण त्या सत्याला मागणाऱ्याने मागितले तर प्रमाण द्यायची 'सत्य आहे' म्हणणाऱ्याची तयारी हवी. मी म्हणते ना, आजीने सांगितले ना, सगळ्यांचा विश्वास आहे ना, पूर्वापार चालत आले आहे ना, वगैरे वगैरेला प्रमाण म्हणता येत नाही. प्रमाण दे म्हणजे 'बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर', बुद्धीला पटेल असा पुरावा दे. बाळाचे मित्रमंडळही अशाच अनेक बुद्धिप्रामाण्यवादी तत्त्वचिंतक विद्वानांचे होते. याच काळात बाळ Indian Rationalist Asociation चा सदस्य झाला. १९४९ साली, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून जेमतेम दोन वर्षे झाली तेव्हा या संस्थेची स्थापना झाली. Scientific temper, secularism, freedom of thought and expression यासाठी झटण्याकरिता एकत्र आलेल्या समविचारी बुद्धिनिष्ठांचा हा समुह. कट्टर विज्ञाननिष्ठ, सर्वधर्मसमभावी, विचारस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, सत्याग्रही लोक. अंधश्रद्धा, अंधविश्वास, पुराणमतवाद, जातिभेद यांचे प्रखर विरोधी हे लोक. सारेच नवयुगातील बाळच म्हण ना. सारेच चार्वाक.
ब्रह्मा, म्हणूनच बाळाचा तुझ्या माझ्या अस्तित्वावर विश्वास नव्हता. कारण त्याला पुरावा नाही. पुराणातली वांगी पुराणात. ती बुद्धिप्रामाण्यवादी लोक चाखत नाहीत. चातुर्मासात भाविक लोक सुद्धा वांगी खात नाहीत त्याचे हेच कारण असावे असे मला वाटते. वांगं ते वांगच. ते सत्य नाही. तुझ्या नावाने बोकाळलेल्या रूढी व परंपरांचा तो उपहास करीत असे. त्यामुळेच तो तुला दोष न देता आपले भविष्य स्वत: घडवीत होता. असो. कवितेकडे वळू. तुझी झोपायची वेळ होत आहे. चातुर्मास नजीक आला आहे. त्या आधी कविता वाचून व्हायला हवी.
बाळ बंगलोर सोडून पुन्हा मुंबईला आला हे खरे. तसे खरे खरे सांगू जाता आईलाही कळले होते की तिचा बाळ आता इतका मोठा झाला आहे की तो नागपूरला कधी परत येऊन स्थाईक होणे जवळजवळ अशक्य आहे. त्याच्या संशोधनाला पूरक अशी संस्था नागपूरात त्या काळी नव्हती. त्यामुळे तो नागपूरला स्थाईक होईल अशी वाड्याला इच्छा असली तरी अपेक्षा नव्हती. कधीमधी एखादा आठवडा तो आला की तेवढ्यावरच वाड्याला तहान भागवावी लागे. बाळ सुटीवर आला की वाडा आनंदी होत असे. त्या एका आठवड्याच्या गोड आठवणींची उजळणी करून वाडा वर्षभर आपले समाधान करून घेत असे.
पुनश्च सुटली पश्चिम, आता पुन्हा उत्तरेची पाळी
लिहिता लिहिता ब्रह्माने या खाडाखोड किती केली
'हे घेऊ का ते घेऊ' की 'दुकान उचलुनि का नेऊ'
तत्सम दुविधा त्यास पडे जणु, हे देऊ का ते देऊ
परंतु येथे स्थिरावला तू, लग्न भावले पायांना
येथे तपभर का होईना, तू टिकला रे, शांति मना
स्थिरता येता यशकीर्तीला उधाण आले रे बाळा
ख्याती पसरे चहूकडे, हिमशिखरांशी स्पर्धा आता
राष्ट्र पुरस्कृत करता तुज तव प्रथम पुरस्कारे बाळा
हात जोडले मी जगदीशा, असे भाव माझा भोळा
विज्ञानाचा मुकुटगिरी भटनागर येता शिरी तुझ्या
'मीरा के प्रभु गिरिधर नागर' मनी येतसे रे माझ्या
ब्रह्मा: हं, पुन्हा मोर्चा माझ्याकडेच वळलेला दिसतो. आता कशाचे खापर माझ्या माथी फोडले बाळाच्या भाविक आईने?
नारद: तू करतोसच तसे ब्रह्मा. बंगलोरवरून तीनच वर्षात तू बाळाची उचलबांगडी केलीस आणि त्याला पुन्हा मुंबईला आणलेस. बाळ मुंबई आय. आय. टी. त प्राध्यापक म्हणून रुजू झाला. पण एकाच वर्षात तू त्याच्या नशीबी पुन्हा तीही नोकरी सोडून पुन्हा रूडकीला जायचा योग लिहिलास. चार वर्षात तू त्याला पिलानी, रूडकी, बंगलोर, मुंबई फिरवून पुन्हा रूडकीला आणले. कोणालाही राग येईल. म्हणून आई म्हणते की तू बाळाच्या ललाटावर भाग्यलेख लिहितानाही खूप खाडाखोड करतोस. पिलानी लिहितोस, खोडतोस. रूडकी लिहितोस, खोडतोस. बंगलोर लिहितोस, खोडतोस. मुंबई लिहितोस, खोडतोस. पुन्हा रूडकी लिहितोस. नक्की काय लिहावे, बाळाला कोणते गाव द्यावे हे तुलाही कळत नाही आहे असे तिला वाटते.
ब्रह्मा, त्या काळी दुसरी तिसरीच्या मराठीच्या पुस्तकात, बालभारती नाव असायचे त्याचे, एक कविता होती. आईबरोबर बाजारात गेलेल्या लहान मुलाची खेळण्यांच्या दुकानातील वेगवेगळी खेळणी पाहून जी द्विधा मनस्थिती होते ती या कवितेत खूप सुंदर मांडली आहे. 'हे घेऊ का ते घेऊ, दुकान उचलुनि की नेऊ' एवढेच मला आठवते. तशीच बाळाला कुठले गाव द्यावे हे ठरवतांना तुझीही 'हे देऊ का ते देऊ' अशी तारांबळ उडाली असावी असे ती म्हणते. तशी तुझी टिंगलच आहे. पण असा विचार कर की नेहमी तुला म्हातारा म्हणणारी म्हातारी क्षणभर का होई ना, तुझी तुलना लहानग्या मुलाशी करते. तुला बाळ समजते. असा विचार केलास तर तुला बरे वाटेल ब्रह्मा. म्हणशील तर मी तुझा गालगुच्चा घेतो.
ब्रह्मा: चला, म्हातारा म्हणून तर म्हातारीने मला हिणवले नाही ना. तेही नसे थोडके. पण सतत माझा उद्धार करत असली तरी तशी ती माझी निरपेक्ष भक्तच आहे रे. मी प्रसन्नही आहे तिच्यावर.
नारद: ब्रह्मा, या वेळेस बाळ रूडकीला प्राध्यापक म्हणून आला. Geology & Geophysics Department मधे. Geology म्हणजे भूगर्भशास्त्र. पृथ्वीच्या पोटात तू काय दडवून ठेवले आहेस, ते कुठे कुठे आहे, किती खोल आहे, किती विपुल आहे, कसे तयार झाले हे शोधून काढणारे विज्ञान. Geophysics म्हणजे भूभौतिकी. पृथ्वीचा आतला साचा कसा तयार झाला, दगडमाती कशी तयार झाली, तिच्या उदरात अदृश्य नद्या कुठे आहेत, पृथ्वीच्या पोटात काय खळबळ सुरू असते, भूकंपविज्ञान वगैरे या विषयाचे पैलू. आपण ज्याला पाताळ म्हणतो ते हे लोक पाताळात न जाता यंत्राने जाणतात. त्या दृष्टीने पाहता हे खरे पाताळयंत्री लोक. भूभौतिकी हाच आता बाळाचा संशोधनाचा विषय. तो आता भूवैज्ञानिक झाला होता.
ब्रह्मा, आईचे तुला हिणवणे कामी आले. तू बाळाच्या भाळी रूडकीचे वास्तव्य एक तपाहून ज्यास्त लिहिले. शेवटी आईच्या बाळाने गंगातीरी, हरीच्या द्वारी म्हणजे हरिद्वार निकट, रूडकी विश्वविद्यालयात तब्बल एक तपाहून ज्यास्त काळ तंबू ठोकला. तो पहिल्यांदा खऱ्या अर्थाने गृह-स्थ झाला. आईच्या अगदी मनासारखे झाले. वाड्यातील निरांजनाची ज्योत आता वर्षामागून वर्षे उत्तराभिमुख झाली.
जीवनातील हे स्थैर्य बाळाला खूप मानवले. अनेक दृष्टींनी मानवले. तो आणि दूरवर दिसणारी हिमालयाची शिखरे यात आता दुसरे कोणी नव्हते. त्याकाळी रूडकीचे विभागप्रमुख प्राध्यापक गौड म्हणून होते. त्यांना तर प्रमोद फारच आवडायचा. विभागात, घरी, रस्त्यावर दोघे तासन् तास भिन्न भिन्न विषयांवर विद्वत्तापूर्ण चर्चा करीत असत. गौड स्वत:ही भूभौतिकीचे पंडित असल्यामुळे त्यांना बाळाचे पांडित्य खूप भावले. रत्नपारखी होते ते. त्यांच्या नजरेतून हे असली रत्न कसे सुटेल? बाळाने आपला परखडपणा जरा काबूत ठेवला, आयुष्यात थोडीफार तडजोड केली तर तो फार मोठ्या पदांवर पोहोचू शकेल असे त्यांना वाटायचे. पण तेच तर बाळाला अशक्य होते. स्वत:च्या जीवनमूल्यांशी प्रतारणा बाळ करूच शकत नव्हता. भेसळलेली मूल्ये ती मूल्येच काय? शून्य.
रूडकीला असतांना बाळाचे संशोधन पराकोटीला पोहोचले. त्याचे अनेक लेख प्रसिद्ध झाले. त्यांची संख्या शंभराच्या घरात पोहोचली. येथे असतानाच त्याची राष्ट्रीय व्याख्याता म्हणून निवड झाली. त्याचा उल्लेख आधी आलाच होता. येथे असतानाच बाळाची जगदीशचंद्र बोस पुरस्काराकरिता निवड झाली. याचाच उल्लेख कवितेत आहे. हा पुरस्कार मिळाला तेव्हा त्याचे नाव पाहून भाबड्या सात्विक भाविक धार्मिक आईने जगदीशाला हात जोडले असे ती म्हणते. काय ही अढळ श्रद्धा! माया आणि श्रद्धा यांचा सुवर्णसंगम म्हणजे आई.
मागोमागच प्रमोदला एस् एन् मित्रा पुरस्कार पण मिळाला. त्याचा कवितेत उल्लेख नाही. पण ही आपल्या बाळाचीच यशगाथा असल्यामुळे हा उल्लेख मी करीत आहे. पण कळस झाला तो मात्र नंतर मिळालेल्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने. भारतवर्षात वैज्ञानिकांना मिळणारा हा सर्वोच्च सन्मान. त्याचाही उल्लेख फार मजेदार आहे. भटनागर मधला नागर तेवढा तिला समजला. आणि लगेच मीराबाईचे भजन 'मीरा के प्रभु गिरिधर नागर' तिला आठवले. बाळानेही त्याच्या करांगळीवर संशोधनाचा गोवर्धन उचलला आहे असे चित्र तर तिच्या नजरेसमोर तरळले नसावे? पण खरेच, बाळाचे शोधकार्य आता पहाडाएवढे मोठे झाले होते आणि सतत उंचावत चालले होते.
बाळाने रूडकीला रचलेला इतिहास ज्यांना माहीत आहे त्यांनाच हे संदर्भ कळतील. चातुर्मास संपला की वाच मास्तरांच्या आत्मचरित्रातले बाळाच्या यश़यात्रेचे समग्र वर्णन. मज्जीवनमणिमाला असे त्या आत्मचरित्राचे नाव.
http://sadashivsahitya.
भटनागर पुरस्कार बाळाला दिल्लीला पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आला. बाळ सपत्निक गेला होता. आईबाबांनी तो क्षण टीव्हीवर पाहिला. पाळण्यातले ते काजळटिळा लावलेले पाय आता हिमशिखरांवर उमटत होते असे आईला वाटले.
ब्रह्मा, रूडकीला असतानाच बाळाने आपले पहिले पुस्तक लिहायला सुरुवात केली. त्याने तसे करावे असे इंग्लंडच्या प्रसिद्ध Bradford Universityचे प्राध्यापक बावराॅन यांनी सुचवले होते. Pattern Recognition Transforms असे पुस्तकाचे शीर्षक द्यायचे ठरले. तुला मला काय कळेल म्हणा, पण pattern म्हणजे एकसारखेपणा, साच्यातून काढले असे वाटावे असे वरपांगी भिन्न दिसणाऱ्या माहितीतले साम्य. ते शोधण्याच्या गणिती पद्धतीवर बाळाचे बरेचसे संशोधन असायचे. आता असे बघ की मास्तरांचे कन्यापुत्र तसे नाकी डोळी काही एकसारखे नाहीत. पण त्यांच्यात साम्य शोधूच म्हटले तर त्यांची मोठ्ठी डोकी. बुद्धीने तर होतीच, पण आकारानेही भक्कम. हा त्यांचा पॅटर्न झाला. तुझा पॅटर्न तेहतीस कोटी देवात शोधूनही सापडणार नाही. प्रत्येक गोष्टीत पॅटर्न शोधणे हे मानवांकरिता फार महत्त्वाचे आहे. त्याचा हवामानाचे भाकीत करण्यात आज खूप फायदा होतो. पुढे याच संशोधनाचा भूकंपाचे भाकीत करण्यात उपयोग होईल. पूर्वी जेव्हा जेव्हा भूकंप झाले त्यावेळेस भूकंपाच्या आधी भूगर्भातून आलेल्या लहरींचे अध्ययन करून त्यातला पॅटर्न जर शोधून काढला तर पुढे जेव्हा तोच पॅटर्न आढळेल तेव्हा भूकंप होण्याची शक्यता आहे असे समजता येईल. बाळाचे संशोधन म्हणूनच तर सर्वव्यापी आहे. खरे म्हणजे त्याला शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार भूभौतिकी म्हणजे geophysics मधे मिळाला असे जे म्हणतात ते फारच फार तर अर्धसत्य आहे. हा पुरस्कार त्याला Earth, Environment, Ocean & Planetary Sciences मधे देण्यात आला. भूगर्भ, वातावरण, समुद्र आणि खगोल विज्ञानाचा तो पुरस्कार. या सर्व विषयातील संशोधनात बाळाचे काम हातभार लावते. ब्रह्मा, भूगर्भ, वातावरण, समुद्र आणि खगोल सोडले तर तुझ्या सृष्टीत उरलेच काय रे? स्वर्ग, पृथ्वी, पाताळ आलेच की. तुझ्या सृष्टीचे रहस्य शोधून काढण्यासाठी बाळाची पावले या सर्व विषयात उमटली आहेत. आईला उगाचच वामनावतार आठवत नाही काही.
बाळाचे हे सखोल ज्ञान जगभर विखुरलेल्या वैज्ञानिकांना उपलब्ध व्हावे म्हणून बाळाने हे पुस्तक लिहावे असे त्याला सुचविण्यात आले होते. हे जिकिरीचे काम, हे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान, त्याने स्वीकारले व त्या दृष्टीने त्याचे संकलन व लिखाण रूडकीला असतानाच सुरू झाले.
ब्रह्मा, नागपूरच्या सीताबर्डीच्या टेकडीचा मुंबईला जाऊन सह्याद्री झाला व पुढे त्याचाच रूडकीला हिमालय झाला असेच बाळाचे यश पाहून म्हणावे लागेल.
बाळाची आई बाळाची झेप पाहून खूप आनंदली होती. पण अजूनही कुठेतरी काहीतरी उणीव होतीच. तिला आणखी एक अपेक्षा होती. तिला आणखी एक पुरस्कार हवा होता.
अपेक्षा परी मनात वसते तू व्हावे लेकुरवाळा
पुरस्कार तो घरात येता आजी मी झाले बाळा
हरिद्वारी का कोणी वंचित, हीच भावना पोटात
लक्ष्मी आली सरस्वतिनिवासी विचार मम डोक्यात
समुद्रमंथन विज्ञानाचे सदैव तुझिया डोक्यात
म्हणूनि वाटे लक्ष्मीमागे कौस्तुभ तुझिया पदरात
उत्तर मानवली तुज बाळा, पदरी ये सारे काही
परंतु ऐसे मनात येता दक्षिणेस तू गेलाही
ब्रह्मा सगळ्याच आयांना आजी व्हायचे असते. बाळाची आई पण त्याला अपवाद नव्हती. बाळाचे शिक्षण संपले, नोकरी लागली, लग्न झाले, त्याच्या आयुष्याला स्थिरता आली. पण आता आईला एक उणीव बोचू लागली. केव्हा आपण आजी होतो असे तिला झाले. तीही इच्छा रूडकीनेच पूर्ण केली. बाळाला कन्यारत्नप्राप्ती झाली. सतत विद्येची आराधना ज्या घरी सुरू, जिथे साक्षात सरस्वतीचा वास आहे, तेथे आता लक्ष्मी आली असे आई म्हणते. रूडकी अगदी हरिद्वार जवळ होती हे मी तुला मघाच सांगितले. हरीच्या द्वारी कोणी निराश होऊच शकत नाही असे आई म्हणते. म्हणजेच बाळाला मुलगी होणे हेही देवाजीचेच देणे. मुलीच्या अस्तित्वालाही तूच जबाबदार. तूच सर्वांचा जन्मदाता. तूचि कर्ता, आणि करविता. नमन तुला भगवंता. असो. मुलीचे नाव बाळाने वैशाली असे ठेवले. वैशाली हा रूडकीला सर्वांनाच मिळालेला अनमोल पुरस्कार आहे असे आईला वाटते. बोस, मित्रा, भटनागर पुरस्कारावर कळस.
पण ब्रह्मा, रूडकीचे दान अजून संपले नव्हते. काही वर्षांनी बाळाला रूडकीलाच पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव बाळाने कौस्तुभ असे ठेवले. समुद्रमंथनात लक्ष्मीच्या मागोमाग कौस्तुभ रत्न प्रकटले होते. त्याचा उल्लेख आई कवितेत करते. तिचा बाळही विज्ञानाच्या विशाल सागराचे नित्य मंथन करीत असतो म्हणून ही रत्ने त्याला प्राप्त झाली असे आई सुचवते. पुराणातले दाखले अगदी चपखल बाळाच्या आयुष्यातील घटनांशी ती जोडत असते. मला हा दाखला मात्र आवडला. मुलाचे नाव कौस्तुभ ठेवण्यात आपली पहिली मुलगी लक्ष्मी आहे असे कदाचित बाळालाही सुचवायचे असेल. तो स्वत:ही सारी पुराणे कोळून प्यायला होता. हवे तेव्हा तो त्यातील प्रसंग, गीतेचे श्लोक, वेदांच्या ऋचा उद्धृत करीत असे. त्याच्या पहिल्या ग्रंथात, म्हणजे Pattern Recognition Transforms मधे, जो इंग्रजीत होता व परदेशातल्या प्रकाशकांनी प्रसिद्ध केला होता, त्याने सुरवातच मुळी ऋग्वेदातल्या ऋचेने केली होती. मला आत्ता नेमकी ती आठवत नाही. विसरा़यला व्हायला लागलं आहे आजकाल. पुढेमागे आठवली तर सांगीन. ॠग्वेदातली असल्यामुळे अर्थ मात्र तू सांग. तुझ्या तोंडातून चार वेद सतत स्रवत असतात असे म्हणतात.
रूडकीला बाळ विद्यार्थ्यांचा लाडका होता. विद्यार्थ्यांना शिक्षकांमधे दोन गोष्टी हव्या असतात. त्यांची शिकविण्याची कला आणि निष्पक्षपातीपणा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधे भेदभाव करू नये. त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांची क्रमवारी लावणे हे शिक्षकाचे कामच आहे. पण पक्षपात मुलांना अजिबात आवडत नाही. रूडकीच्या विद्यार्थ्यांनी एकदा एक आलेख तयार केला. शिक्षणाची खूबी आणि पक्षपातीपणा या दोन बाबींवर विभागातील सर्व शिक्षकांना जोखून त्यांना शून्य ते दहा असे दोन बाबींवर गुण दिले. कोणाला शिक्षणकलेवर दहापैकी दहा, पण पक्षपातीपणावरही तसेच दहापैकी ८-९ गुण, कुणाला पक्षपातीपणावर कमी पण शिक्षणकलेवरही कमी. बाळाला शिक्षणकलेवर १० पैकी दहा आणि पक्षपातीपणावर जवळजवळ शून्य गुण मिळाले. म्हणजेच मुलांच्या मते तो सर्वोत्कृष्ट शिक्षक ठरला. ब्रह्मा, महाभारतकाळी असा मतसंग्रह झाला असता तर द्रोणांना शिक्षणकलेवर १० व पक्षपातीपणावरही १० मिळाले असते. त्यांचे नाणे येथे चालले नसते रे.
ब्रह्मा, एकंदरीत बाळाला सर्वच दृष्टींनी उत्तरेतली रूडकी मानवली. त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. बाळ बंगलोर सोडून आला खरे, पण रूडकीला असतांना आणि बंगलोर त्याला मुकले असतांना बंगलोरच्याच Centre for Mathematical Modelling & Computer Simulation चा वरिष्ठ सहकारी म्हणून त्याची नेमणूक झाली. तो वर्षाकाठी एक महिना तेथे जाऊन आपल्या ज्ञानाचा फायदा त्यांना देऊ लागला. आणखीही अनेक संस्थांनी त्याच्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वा परोक्ष फायदा करून घेतला. एकंदरीत काय, रूडकी हा बाळाच्या व्यावसायिक, वैयक्तिक, सांसारिक, कौटुंबिक व सामाजिक आयुष्याचा सुवर्णाध्याय होता. वाडा खूपच सुखावला. पण अचानकच बाळाने रूडकी सोडायचे ठरवले व पुन्हा तो दक्षिणेकडे निघाला.
ब्रह्मा: हं म्हणजे वाड्याचा धृवतारा आता दक्षिणेला गेला तर. पश्चिम, उत्तर, दक्षिण, पश्चिम, उत्तर, दक्षिण. नारदा, बाळ पहिल्यांदा मुंबईला गेला तेव्हा आई जे म्हणाली होती ते मला आठवते.
सीमोल्लंघन हे दसऱ्याचे असे वाटले मला मनी ।
येशील तू परतून जिंकुनी, विद्यासुवर्ण घेवोनी ।।
पण तिची ती अाशा आशाच राहिली रे. मी खरोखरचा ललाटलेखक असतो तर नक्कीच पुनश्च नागपूर लिहिले असते बाळाच्या भाळी. आई मग 'पुनश्च नागपूर बाळोबा' म्हणाली असती. पण मी पडलो काल्पनिक. तिथेच तर गोम आहे. ग आणि ॐ.
नारद: धन्य आहे ब्रह्मा तुझी. अरे ग आणि ॐ म्हणजे गोम नाही काही. असा संधीविग्रह करणारा तू पहिलाच असावा. द्वंद्व समासाचे हे असे उदाहरण देशील तर वाड्यात द्वंद्व होईल. सारेच मराठीचे पंडित होते तेथे. ब्रह्माचा ह्म आणि म्हशीचा म्ह यातील फरक तेथे कळायचा लोकांना. पोटफोड्या ष आणि शेंडीफोड्या श यातला भेद समजायचा साऱ्यांना. वेदातली ऋचा रुचा नसते हे कळायचे त्यांना. आणि आता तूच मराठीचा खून करतोस. असो. दक्षिणेकडे चला आता बाळाच्या मागे मागे.
पश्चिम उतर दक्षिण पश्चिम उत्तर दक्षिण तू फिरता
अनुज तुझे मोठे झाले, विखुरले काळ पुढती जाता
वाडा जैसा जुना पुराणा, आम्हीही तैसे आता
सात जणांची सात घरे अन् घरोघरी बाळे आता
विवाह मुंजी सणासुदीला सारे येता पूर्वगृही
मन जाई मागे मागे, गतयुगात वावरुनी येई
पुन्हा पाळणा, कपाळी टिळा, तीच पाउले बाळाची
अवतारी तो मला आठवे, तीन पाउले रे त्याची
रूडकीला बाळाने १२-१३ वर्षे काढली. अर्थात वाडा व वाडेकऱ्यांचाही तितकाच काळ लोटला. काळ सगळ्यांकरिता एकाच गतीने पुढे जातो. बाळाचे लहान भाऊबहीणही आता लहान राहिले नाहीत. काहींची शिक्षणे आटोपलीत. काहींची लग्ने. काही उच्चशिक्षणाकरिता बाहेर पडली. गजबजलेला वाडा हळूहळू रिकामा वाटायला लागला. आईबाबा पण वार्धक्याकडे झुकले. झुकले काय, वृद्ध झाले. वाडा सुद्धा आता जुना वाटू लागला. काळाने बरीच झीज घडवली. आईच्या सात मुलामुलींची स्वतःची घरे झाली. घरोघरी आईचे नातनातू रांगू चालू धावू लागले.
प्रसंगाच्या निमित्ताने सारे, किंवा जमतील तेवढे नागपूरला येत. बाबांची एकसष्टी, आईची एकसष्टी, दोघांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव, भटनागर पुरस्कारानिमित्त बाळाच्या शाळेने केलेला बाळाचा सत्कार, असे सण येत व जात. वाडा आता आईबाबांना खायला धावे. आईचे मन पुन्हा पुन्हा भूतकाळात जात असे. गोड प्रसंगांची पुन्हा पुन्हा उजळणी होत असे. आई म्हणते की तिला बाळाचे बारसे, त्याचे पाळण्यातले पाय आठवत. तिच्या सर्व आकांक्षा अपेक्षा बाळाने पूर्ण केल्याने तिला समाधान व कृतकृत्यता वाटे. पुन्हा तिला त्रिलोकविजयी वामनावतार आठवे.
ब्रह्मा: नारदा, अचानक कथेची संध्याकाळ झाली आहे असे वाटते रे. पूर्णतेतही कारुण्य डोकावते असे वाटते. जरा बेचैन वाटायला लागले रे.
नारद: ब्रह्मा, काळ पुढे जातोच रे. सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणाला टळले आहेत. वाड्याची संध्याकाळ झाली हे मात्र खरे. रिकामा झालेला वाडा सोडून आईबाबा आता आपण राहतो अशा घरात राहायला गेले. बंगला म्हणतात अशा घरांना. वाड्याच्या मानाने हा बंगला खूपच लहान होता. पण म्हातारा म्हातारीला पुरेसा होता. पण बाळाला मात्र अजून बरेच काही करायचे होते, बरेच काही साधायचे होते. दक्षिणेतही त्याच्यापुढे कामाचा ढीग पडला होता.
या वेळेस बाळ दक्षिणेला गेला खरे, पण बंगलोरला नाही. कानडाऊ विठ्ठलाच्या प्रदेशात नाही, तर हैदराबाद नावाच्या नवीन नगरीत. बाळाची ही नवीन कार्यशाळा झाली. National Geophysical Research Institute, थोडक्यात NGRI मधे बाळ वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून रुजू झाला. आतापर्यंत तो निरनिराळ्या शिक्षणसंस्थांमधे होता. शिकविणे हा त्याचा मुख्य पेशा. अर्थातच संशोधन पण करायचा. ही NGRI मात्र शंभर टक्के संशोधनाला वाहून घेतलेली संस्था. राष्ट्रीय भूभौतिकी अनुसंधान संस्था.
या संस्थेविषयी बाळाला आधीपासूनच आस्था होती. याला दोन कारणे होती. एक म्हणजे ही संस्था त्याच्या विषयात खूप नावाजली होती. दुसरे म्हणजे त्याचे रूडकीचे गौड काही वर्षांपूर्वी रूडकी सोडून येथेच संस्थेचे प्रमुख म्हणून आले होते. बाळानेही त्यांच्या मागोमाग तेथेच यावे असा ते बरेच वर्षांपासून प्रयत्न करीत होते. बाळाला त्यांचे मन मोडता आले नसावे कदाचित. तोही त्यांचा प्रशंसक होताच. तिसरे कारण असेही असू शकते की तू त्याच्या कपाळावर हैदराबादचा योग लिहून ठेवला होता. तू आणि तुझा तो महालेखाधिकारी चित्रगुप्तच बाळ रूडकी सोडून हैदराबादला कां गेला असावा याची कारणे सांगू शकाल. काय?
ब्रह्मा: नारदा, खरे तर माझ्या हाती काही असते तर मी त्याला नागपूरला पाठविले असते रे. बाळाने पहिल्यांदा नागपूर सोडतांना आईला अक्रूर कृष्णाला गोकुळातून कंसमामाकडे घ्यायला जातो तो प्रसंग आठवला तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली रे. कृष्ण जसा पुन्हा कधीच गोकुळात परतला नाही तसा बाळ आता कधीच नेहमीकरिता नागपूरला येणार नाही हे तिला कळले होते की काय? कवितेच्या त्या दोन ओळीत हा अर्थ अभिप्रेत होता असे मला वाटते.
नेऊ नको माधवा अक्रूरा' अशी अवस्था रे माझी
माया वेडी आईची, मी थांबवेन का झेप तुझी
घट्ट मनाने, ओठ आवळत निरोप देतांना तुजला
गाडीचा तो धूर जाउनी पाणी आले डोळ्याला
बाळाचे नागपूर आता कायमचे सुटले असे तिला कळले असावे रे माझ्या बाळा. तरी पण मला अशी आशा होती की कवितेतला बाळ तरी नागपूरला परत येईल. अजून तरी तसे झालेले नाही. बघू पुढे काय होते ते. सध्यातरी चल हैदराबादला बाळाच्या मागोमाग.
नारद: हं, पुढचे पुढे. ब्रह्मा, हैदराबादलाही बाळाचा उन्नतीचा आलेख ऊर्ध्वगामीच राहिला. रूडकीला त्याने हाती घेतलेले ग्रंथलेखनाचे काम पूर्ण झाले. बाळाचा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला.
उत त्वः पश्यन्न ददर्श वाचम्
उत त्वः श्रृण्वन्न श्रृणोत्येनां
उतो त्वस्मै तन्वं वि सस्रे जाया
इव पत्यं उशती सुवासाः
ब्रह्मा: अरे हे काय? पुढची कविता संस्कृतात आहे की काय? मग तर झालेच. समजे ना उमजे.
नारद: काय हे चतुरानना, वेदस्रोता? अरे तुझ्याच चार मुखातून अखंड चार वेद स्रवत असतात. त्यातल्याच ऋग्वेदातली ही ऋचा तुलाच ओळखू येऊ नये?
ब्रह्मा: हं. असू दे. पण हिचा येथे काय संबंध? काय तिचा अर्थ?
नारद: हीच ती ऋचा जी बाळाने आपल्या पहिल्या पुस्तकाच्या मनोगताची सुरुवात करतांना उद्धृत केली आहे. त्याच्या हस्ताक्षरात ती पुस्तकात आहे. तुलाच ती ऐकून ओळखू येत नाही, अर्थ कळत नाही तर बाकीच्यांना काय कळेल? म्हणून बाळाने त्या ऋचेचा अर्थही इंग्रजीत दिला आहे.
Not every man who watches sees the word, and many who hear do not listen to it. And yet to some it reveals itself, radiant, as a bride appears to her husband.
प्रत्येक जण जो शब्द दृष्टीला दिसतो तो पाहतोच असे नाही. प्रत्येक जण जो शब्द श्रवण करतो तो ऐकतोच असे नाही. पण कोणाकोणाला तोच शब्दाकार, तोच शब्दध्वनी असा काही अर्थ देऊन जातो की जशी पतीला नवपरिणित पत्नी दिसावी.
ब्रह्मा, हे शब्दांचे वर्णन आहे. शब्दमहात्म्य आहे. शब्द वाचेल कोणीही. शब्द ऐकेल कोणीही. पण भाषा समजणाऱ्याला तेच शब्दरूप, तोच शब्दध्वनी असा काही अर्थ प्रकट करून जातो की तो समजणारा मुग्ध होऊन जावा. शब्दांचे असेच आहे. शब्दाचा गाभा, शब्दाचा आत्मा म्हणजे त्यात दडलेला अर्थ. तो ज्याला कळला त्याला कळला. नाही त्याला नाही.
बाळाने नेमकी हीच ऋचा कां घेतली? समोर चित्र दिसले, समोर माहिती दिसली की त्यात पॅटर्न दिसायलाही तीच दृष्टी लागते जी शब्दाचा अर्थ, त्यातील अर्थछटा, त्याचा संदर्भजन्य भिन्नार्थ कळायला लागते. ही दृष्टी गणितीय पद्धतीने कुठल्याही तरंगात काय पॅटर्न, काय ठसा आहे हे शोधायला बाळाने बऱ्याच पद्धती सुचविल्या आहेत. तसे करायला Fourier Transforms वापरणे हा बाळाचा छंद होता. त्याचे ते संशोधनच पुस्तकाद्वारे त्याने मांडले.
या पद्धतीने निसर्गाची भाषा समजू शकते. भूगर्भातील कंपने ही जणू निसर्गाची भाषा. ब्रह्मसृष्टीचे शब्द. पण त्यातील अर्थ कळायला असे विशिष्ट तंत्र वापरायला हवे. एकंदरीत काय की निसर्ग आपल्याला काही सांगू इच्छितो, दाखवू इच्छितो. ते ऐकायला, पाहायला, ऐकून समजायला, पाहून उमजायला लागणारी क्षमता प्रदान करणारे बाळाचेे संशोधन या त्याच्या पुस्तकात सामावले आहे.
म्हणून तुझी ऋचा अगदी समर्पक वाटते त्याच्या पुस्तकाच्या सुरुवातीला. शब्द म्हणजे ध्वनीचा पॅटर्न. असे अनेक पॅटर्न्स म्हणजे भाषा. भाषेशिवाय प्रगती शक्य नाही. तसेच भौतिकशास्त्राची भाषा म्हणजे गणित. त्याद्वारे निसर्गसत्यांचा शोध घेतला जातो व ते समजले, समजावले जातात. म्हणून बाळ शास्त्रज्ञ की गणितज्ञ हे बरेचदा कळत नाही.
निसर्गाचे, भूकंपनाचे, लहरींचे शब्द, त्यांची भाषा बाळाला कळली होती. ती त्याची दुसरी भाषाच झाली होती. बाळाचे लेख, पुस्तके म्हणजे हे शब्द, ही भाषा वापरून ज्ञानप्रसार करण्याचा त्याचा अगदी तुकारामी प्रयासच म्हणावा लागेल.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्न करू ।
शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन,
शब्दे वाटू धन जनलोका ।।
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव,
शब्देचि गौरव पूजा करू ।।
असे बाळ खरेच अधिकारवाणीने म्हणू शकतो.
ब्रह्मा: व्वा. सर्वच समजले असे नाही पण छान वाटले ऐकायला. नारदा, पण माझ्या त्या ऋचा का काय म्हणतो त्या मराठीत कां नाहीत रे? अभंगरूपी का नाहीत? असत्या तर वाचून थोडेफार तरी कळले असते. गोडवा तरी जाणवला असता.
नारद: असतात रे. आता बाळाने त्याच्या ग्रंथात उद्धृत केलेली ऋचा मराठीत अशी म्हणता येईल.
कुणी हीस पाहोनि मुळी न पाही ।
दुजा वाणि ऐकोनि ऐकीत नाही ।
स्वामीस प्रकटून गूढार्थ राही ।
वस्त्रांस ढाळून कामातुरा ही ॥
मूळ अर्थाला या भाषांतराने न्याय मिळालाच असे नाही म्हणता येत. ऋचा मराठीत म्हटली की तिला तसे वजन येत नाही जसे संस्कृतात म्हणून येते. तूच मराठीत वेद स्रवायला लागलास तर मग कदाचित त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होईल. पाहा प्रयत्न करून कधी. भाषांतर करून वेद म्हणत जा. असो.
बाळाने हे पुस्तक आपल्या मातापित्यांना अत्यंत आदरपूर्वक समर्पण केलेले आहे. 'To my parents, who offered me both existence and uniqueness' असे त्याने लिहिले आहे. या शब्दात बाळ मूर्तिमंत उमटला आहे. तुला कदाचित खटकेल पण बाळाने त्याच्या अस्तित्वाकरिता आपल्या आईबाबांना श्रेय दिले आहे. तुला नाही काही. त्याने पुस्तक ब्रह्मार्पणमस्तु म्हणून तुझ्या हवाली केले नाही. दुसरा कोणी असता तर 'To God, who offered me both existence and uniqueness' म्हणून आपली लीनता दाखविली असती. तसे अनेकांना खूप आवडलेही असते. त्यावर भाष्य करून विद्वानांनी विदुषींनी गुळचट लेख लिहिले असते व आपणही त्या परमशक्तीपासून फारच फार तर दोन बोटांवर कसे आहोत याची जाणीव करून दिली असती. बाळाने असे केले नाही कारण आता तो तांदुळाचा रावण तलवारीने मारणारा बाळ राहिला नव्हता. तो PhD झाला होता, तत्वज्ञानाचार्य होता. Rationalist होता. प्रामाणिक होता. निरीश्वरवादी होता.
बुद्धिप्रामाण्यवाद बाळाच्या धमनी धमनीत वाहत होता. अस्तित्वाला ईश्वर जबाबदार असतो ही भावना झाली, शिकवण झाली. फारच फार तर तर्क झाला, विश्वास झाला, कयास झाला. सत्य नव्हे. वैशालीच्या जन्माचे श्रेय नाही का आईने तुला दिले? आईचा तोच भाबडा विश्वास पुढच्या पिढीत जसाच्या तसा उतरला असता तर बाळानेही तसेच केले असते. पण त्याने त्याच्या अस्तित्वाचे श्रेय तुला न देता आईबाबांना दिले. कारण आईबाबांनी त्याला अस्तित्व प्रदान केले हे बुद्धिप्रामाण्य सत्य झाले. त्यात शंका घ्यायला जागा नाही.
Uniqueness, खरे म्हणजे nonuniqueness, हा बाळाचा फारच आवडता विषय. त्याच्या संशोधनाच्या विषयाशी याचा खूप घनिष्ट संबंध आहे. खरे म्हणजे साऱ्या विज्ञानाशीच. निरीक्षण परीक्षण करून वैज्ञानिक माहिती गोळा करतात, त्या माहितीचे विश्लेषण करून काहीतरी अनुमान करतात, कयास करतात, तर्क करतात, निष्कर्षा्प्रत पोहोचतात. तोच निष्कर्ष, तोच inference सत्य आहे असे घटकाभर वाटते. पण खरा वैज्ञानिक काहीच सहजासहजी मानत नाही. तो सर्वच बाबतीत बुद्धिप्रामाण्यवादी असतो. स्वत:च काढलेल्या निष्कर्षांवर सुद्धा तो १०० टक्के विश्वास ठेवत नाही. संशय घेतो. पुन्हा पडताळून पाहतो. त्याला बरेचदा त्याच माहितीत, त्याच data मधे दुसरेच सत्य दडलेले दिसते. मग तिसरे. मग चौथे. त्याने काढलेला निष्कर्ष अनेक शक्य असलेल्या निष्कर्षांतला एक असावा असेच तो फार तर म्हणू शकतो. सत्य हे पाऱ्यासारखे स्पष्ट दिसत आहे असे वाटले तरी नेमके हातात येत नाही. अशा सर्व घालमेलीतून आपला बुद्धिप्रामाण्यवादी बाळ अनेकदा गेला असावा. खास करून भूभौतिकीत त्याने केलेले संशोधन, त्याने मांडलेली प्रमेये त्यालाच आव्हान देत असावी. त्याच्याच निष्कर्षांनी त्यालाच बेचैन केले असावे. संशय येणे, मनात प्रश्न उठणे ही वैज्ञानिकाची खूण आहे. प्रमेय हाणून पाडेल, प्रमेय खोटे ठरेल असे पुरावे वैज्ञानिक सतत शोधत असतो. Science progresses by seeking exceptions to the rules असे म्हणतात. यातूनच तर त्याच्या दुसऱ्या ग्रंथाने जन्म घेतला. Non-uniqueness in Geoscientific Inference हे त्याचे शीर्षक. अत्यंत विद्वत्तापूर्ण, स्वानुभवी ग्रंथ. पण त्यावर भाष्य नंतर करू.
पहिल्या ग्रंथात बाळाने आपल्या आईवडिलांना त्याच्या स्वत:च्या uniqueness चे, आगळेपणाचे श्रेय दिले आहे. वरवर पाहता कोणी म्हणेल 'काय हा अहंकार, लेखक स्वत:लाच unique म्हणतो, आगळा म्हणतो, अद्वितीय म्हणतो.'. म्हणोत बापडे. बाळाने मात्र हा शब्द मुद्दामून वापरला. तोच काय, प्रत्येक जीव त्याच्या सारखाच अद्वितीय आहे, एका सारखा दुसरा नाही. कुठल्याच दृष्टीने नाही. आईबाबांचा ज्येष्ठ पुत्र कोण विचारले तर त्याला एकच निस्संदिग्ध उत्तर आहे, बाळ. मी एकमेवाद्वितीयम आहे अशी दर्पोक्ती करणाऱ्यांची हवाच बाळाने काढून घेतली. 'नाही नाही, तुम्ही आगळे नाही' असे न म्हणता तो एवढेच म्हणतो की 'हो ना, मीही तुमच्या सारखाच एकमेवाद्वितीयम् आहे, तोही आहे, तीही आहे. आपण सारेच unique आहोत'.
खरे म्हणजे बाळाने मुद्दाम हा शब्द वापरलेला आहे. वैज्ञानिक निष्कर्षात अशी uniqueness, असा आगळेपणा, अशी निःसंदिग्धता, अशी अंतिमता नसते. पण ती प्रत्येक व्यक्तीत असते. आणि ती तो अस्तित्वात आल्याबरोबरच प्रत्येकाला प्राप्त असते. देवदत्त नाही, तर जन्मदत्त असते. ब्रह्मा, बाळाच्या पहिल्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेतच त्याच्या दुसऱ्या ग्रंथाचा विषय डोकावतो.
आपण आपल्याला असलेल्या माहितीवर आधारित जो निष्कर्ष काढतो तो त्या माहितीवरून निघू शकणारा एकमेव निष्कर्षच असेल असे नाही असे बाळ म्हणतो. पाऊस आकाशातून पडतो, ऊन आकाशातून येते, इंद्रधनुष्य आकाशात दिसते. म्हणूनच आकाशात ईश्वर आहे असा निष्कर्ष काढण्यात आला. अशाच अनेक गोष्टींमुळे ईश्वराचे अस्तित्व सत्यही मानण्यात आले. पूर्वाग्रहामुळे मग इतरांनाही तो दिसायला लागला. जसे देवाचे, तसेच भूताखेतांचे. मी भूत पाहिले, ते निळ्या रंगाचे असते असे सांगून लोक आपल्याकडे लक्ष्य ओढून घेतात. मांजर आडवी गेली की वाईट घडते, पहाटे कुत्रा भुंकला की ओळखीत कोणाचा तरी मृत्यु होतो, वगैरे वगैरे अंधविश्वास, अंधश्रद्धेचे पीकही निष्कर्ष nonunique असू शकतात हे न समजल्यामुळे बोकाळतात. संशय न घेणे, प्रश्न न विचारणे, लहानपणी जे मनात, डोक्यात ठासून ठासून भरले जाते ते मोठेपणीही प्रश्नांकित न करणे हे भाविकतेचे लक्षण समजल्या गेल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाला समाधी दिली जाते. बाळ अशा अप्रश्न मनोवृत्तीचा, म्हणजेच भाविकतेचा, आस्तिकतेचा घोर विरोधी होता. त्याच्या दुसऱ्या ग्रंथात, ग्रंथ तसा गणित, भूभौतिकी, signal processing, pattern recognition इत्यादि त्याच्या आवडत्या विषयांवर आधारित असला तरी, ईश्वरवाद व तत्सम वादांवरही तो कटाक्ष टाकत आहे असे वाटते.
हे पुस्तक लिहितांना बाळ त्यात पूर्णपणे समरस झाला होता. विरघळून गेला होता असेच म्हणता येईल. यात त्याच्या जीवनाचे सारच होते म्हणायला हरकत नाही. त्याला काय म्हणायचे आहे हे इतरांना कळेल, त्यांच्या गळी उतरेल असा विश्वास त्याला नव्हता. पुस्तक कधीतरी प्रकाशित होईल याचीही त्याला खात्री नव्हती. खरे म्हणजे हे पुस्तक कधीच प्रकाशित होणार नाही असेच त्याला बव्हंशी वाटे. अत्यंत गहन तत्वज्ञानच, विज्ञाननिष्ठतेचे सारच त्याने पुस्तकात मांडले आहे. हा ग्रंथ म्हणजे त्याच्या विज्ञानवारीची सांगता, जीवनयात्रेचे मावंद, आयुष्याची इतिकर्त्तव्यताच समजायला हवी. Nonuniqueness वरचे हे बाळाचे पुस्तक मात्र बाळासारखेच unique, अद्वितीय होते.
पुस्तक प्रसिद्धीयोग्य आहे की नाही, त्याला वाचकवर्ग मिळेल की नाही हे पडताळून पाहण्यासाठी प्रकाशक लेखकाकडून प्रस्तावित पुस्तकाचा आराखडा, अनुक्रमणिका व पहिल्या प्रकरणाचा पूर्ण मसुदा मागवतात. तो मग त्या विषयातल्या विशेषज्ञांकडे पाठवण्यात येतो. त्यांचे मत ठरवते की हे पुस्तक प्रकाशनायोग्य आहे की नाही. बाळाच्या ह्या पुस्तकाची प्रकाशनयोग्यता इंग्लंडची Research Studies Press ही प्रकाशनसंस्था अशा रीतीनेच पडताळून पाहणार होती. विशेषज्ञांनी हो म्हटले तर हो, नाही म्हटले तर नाही. हे reviewers म्हणजे ब्रह्मदेव. त्यांचा निर्णय म्हणजे ब्रह्मवाक्य. बरे या ब्रह्मदेवांना पूजा, आरती, जप, तप, नैवेद्य, नवस वगैरे करून प्रसन्नही करता येत नाही. ते सोन्याची पारख फक्त पारिसावर घासूनच करतात.
प्रकाशकांकडून बाळाच्या पुस्तकावर शेवटी विशेषज्ञांचे मत आले. एकही बदल न सुचवता त्याला पुस्तकलेखनाचे काम पुढे नेण्यास सांगण्यात आले. खूप आनंद वा दुःख प्रकट करणे हे बाळाच्या स्वभावात नव्हते. पण आपले अत्यंत आवडत्या विषयावरे काम व तत्त्वज्ञान कधीकाळी ग्रंथरूपात प्रसिद्ध होणार हे कळताच बाळाला अगदी मनापासून आनंद झाला. पण पहिला ग्रंथ जर शिवधनुष्य समजले तर हे दुसरा ग्रंथ लिहिण्याचे आव्हान महाशिवधनुष्यच उचलण्यासारखेच म्हणावे लागेल.
बाळाने हे आव्हान स्वीकारले आणि स्वत:ला या कार्यात झोकून दिले. Non-uniqueness in Geoscientific Inference हा ग्रंथगर्भ बाळाच्या डोक्यात वाढू लागला. ब्रह्मा, बाळाच्या समग्र संशोधनकार्याचा, जीवनविषयक तत्वज्ञानाचा हाच गर्भग्रंथ आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होऊ नये. पण ग्रंथप्रकाशनाला मात्र अजून अवकाश होता.
ब्रह्मा: हं. किती काम करतात रे हे लोक. विसावा म्हणून नाही. चातुर्मासभर मस्त ताणून देणे तर नाहीच नाही. कठिण आहे बा. मी नाही असा ग्रंथबिंथ लिहू शकणार. असे मान मोडून काम करणे मला नाही जमत.
पण नारदा, मला खूपच कौतुक वाटते रे सगळ्याच ग्रंथकारांचे. 'कौतुक ज्याच्या पोटी, अभंग त्याच्या ओठी' असे म्हणतात. पण माझ्या ओठी फक्त वेद येतात. तू कर ना एखादा अभंग बाळाच्या ग्रंथावर.
नारद: ठीक आहे. भूगर्भातून येणाऱे तरंग, लहरींचे विश्लेषण केले की भूकंपाचे अनुमान, तसेच भूगर्भात कोठे काय आहे हे कळू शकते. तुझ्या सृष्टीची रहस्ये सांगणारी ती जणू भाषाच आहे. कळते त्याला कळते. नाही त्याला नाही. तुझी ही भाषा बाळाला कळली होती. तोच बाळाचा संशोधनाचा विषय. त्याकरिताच त्याने आपले pattern recognition चे सखोल ज्ञान वापरले. पण ते निष्कर्ष नेहमी unique असतीलच असे नाही. एकमेव असतील असे नाही, आगळे असतील असे नाही असे तो आपल्या दुसऱ्या ग्रंथात म्हणतो. त्यावर हा संत नारदाचा अभंग ऐक.
भूमीची कंपने ब्रह्माचेची शब्द
त्यासी कळे ज्यासी कळे त्याची भाषा
अभ्यासून त्याते काढावा निष्कर्ष
परी तो आगळा कोण सांगे
मुनी म्हणे बाळे लिहीयेला ग्रंथ
राउळी कळस आयुष्याच्या
ब्रह्मा: हं. किती गोड असतात रे अभंग. तू करू शकतो म्हणून तुझी कीर्तने आवडतात लोकांना. अभंगात माझेही नाव गोवले तूू. छान वाटले. नाही तर अभंग म्हणजे नुसते विठ्ठलाने भरलेले व भारावलेले असतात. बरे, चल पुढे. पुन्हा बाळाच्या होकायंत्राची सुई हालली की काय?
नारद:
विजयपताका नवपीढीच्या, कौतुक त्यांचे सर्वत्र
गंगोत्री तू यशगंगेची, असा असो गुंडा पुत्र
दक्षिणेस तू रुळला वाटे, परंतु रे अघटित झाले
दक्षिण सोडुन तुझी पाउले पुन्हा नवदिशेसी गेले
हैदराबादला बाळाची दोन्ही मुले मोठी झाली. हुशारीचा तोच पॅटर्न, तोच साचा. शाळा, काॅलेजात नेहमी प्रथम. मुंबईशी मात्र या कुटुंबाचा ऋणानुबंधच असावा. बाळाची दोनही मुले काही काळाने पुन्हा मुंबईच्या त्याच IITत शिकायला आलीत जेथे बाळ पूर्वी विद्यार्थी व प्राध्यापक होता.
सर्व यशाची गंगोत्री बाळच होता असे आई म्हणते. खरेही आहे. 'पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा' असे ती बाळाबद्दल म्हणते.
हैदराबादलाही बाळ चांगलाच रुळला. बरीच वर्षे. संशोधन लेख, व्याख्यानांना अधिकच वेग आला. आता लेखांची संख्या दीडशेवर गेली असावी. दुसऱ्या ग्रंथाचे काम पूर्णत्त्वाकडे झपाट्याने गेले. पूर्ण पुस्तक आता पुन्हा परीक्षकांकडे गेले. त्यांच्या मते ते अव्वल दर्जाचे ठरले. आता फक्त प्रकाशनाचीच वाट.
ब्रह्मा, थोडेफार पुस्तकाविषयी मी तुला आंधीही सांगितले. त्यात ठोकळ मानाने काय विचार मांडला आहे तेही सांगितले. पण विचारांसारखीच विचार मांडण्याची शैली सुद्धा अनोखी आहे. त्याच्या विषयातले आपल्याला काय कळणार म्हणा, पण त्याची इंग्रजी भाषेवर पकड थक्क करून जाते. निष्कर्ष आगळे, unique नसतात हाच बाळाने या ग्रंथात मांडलेला त्याचा निष्कर्ष. म्हणून प्रस्तावनेत बाळ एके ठिकाणी म्हणतो:
While talking of non-uniqueness of inference, if you disagree with me, then you agree with me. फार सुंदर paradox, विरोधाभास आहे यात. निष्कर्ष युनीक नसतात या बाळाच्या निष्कर्षाशी जर श्रोते सहमत नसतील तर ते नक्कीच त्याच्या निष्कर्षाला़च दुजोरा देतात. आहे की नाही मज्जा?
पूर्ण पुस्तकच वाचकांना गुंतवून टाकणारे आहे. भाषेची खेळी आणि शब्दांची फेक तर इतकी अद्भुत आहे की काढणाऱ्याने आपल्या बुद्धीनुसार अर्थ काढावा. मला भागवत सोडून इतर कशात फारसा रस नसल्यामुळे या कृतीचा पूर्ण आनंद घेऊ शकलो नाही. पण हे पुस्तक वेगळेच आहे हे मला नक्कीच जाणवले.
ब्रह्मा: हं. वाचू कधीतरी पूर्ण पुस्तक. आपल्याला काय वेळच वेळ आहे. आत्ता कुठे अठ्ठावीस युगे, म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुगाची ७ चक्रे आटोपली. जेमतेम अर्धा कल्प आटोपला. म्हणजे अशीच २८ युगे आणखी गेली की कल्प संपेल. सध्या मात्र कवितेला जाऊ दे पुढे.
नारद: ब्रह्मा, मुंबई, कानपूर, रूडकी, पिलानी, बंगलोर या सर्व ठिकाणी बाळाचे वाहन म्हणजे सायकल. खरे म्हणजे नागपूरला मॅट्रिकला प्रांतात पहिला आला म्हणून शाळेनेच त्याला सायकल घेऊन दिली होती. ती लगेचच चोरी गेली ही गोष्ट वेगळी. काही काळ सारेच हळहळले. पण मग कोणीतरी म्हणाले की असे होणे हा शुभसंकेत आहे. मग काय. सगळे खूश. पण खरेच तेव्हापासून बाळाच्या प्रगतीने जो भरधाव वेग घेतला तो पाहतच राहावा. निष्कर्षच काढायचा झाला तर असे ठामपणे म्हणता येईल की पहिली सायकल चोरी जाणे हा शंभर टक्के शुभसंकेत आहे. विश्वासही बसेल लोकांचा कारण बाळाचे उदाहरण समोर आहे. तोच या निष्कर्षाचा पडताळा पण आहे. मग काय, घ्या सायकल आणि ती कोणाला तरी चोरायला सांगा. झाले, मग मुलांचा अभ्यास वगैरे घ्यायची गरज नाही. तुला पण अशा सगळ्या सायकल चोरी गेलेल्यांच्या भाळी यश लिहावेच लागेल. असो. फारच भाविकपणा झाला हा.
तर सांगायची गोष्ट म्हणजे सायकल हे बाळाचे हैदराबादला आल्यावरही वाहन होते. त्याला एखादे स्वयंचलित वाहन, म्हणजे स्कूटर मोटर वगैरे घ्यावी असे कधीच वाटले नाही. सायकल सुद्धा कालांतराने सुटली. तो सर्वत्र पायीच भ्रमण करीत असे. चरवैती चरवैती म्हणजे बाळोबा. बाळोबा अगदी विनोबा.
पण हैदराबादला मुलांच्या निमित्ताने घरी पहिले स्वयंचलित दुचाकी वाहन आले. कधीमधी बाळ ते चालवीत असे. तेवढे सोडले तर बाळ नेहमीच अगदी स्वयंचलित, स्वयंप्रेरीत, स्वयंभू, स्वयंप्रकाशित. म्हणूनच तो तारा. त्याचा मार्ग त्याने ठरवला. इतर कोणाभोवती तो कधी फिरला नाही. चाकोरीत सापडला नाही. कुठेच थांबला नाही. कुठेच गुंतला नाही. असाच एकदिवस अचानक त्याने मुक्काम बदलला. सूर्य कुंभ राशीतून मकर राशीत गेला.
ब्रह्मा, आता पुढे तूच वाच.
ब्रह्मा: आण इकडे. मी वाचतो. तुझा मूड एकदमच बदललेला दिसतो.
जाता तू ना शब्द बोलला, कुठे जात नाही वदला
पत्र तुझे ना आले, ना तू सणासुदीला रे आला
खात्री मज तो जगन्नियंता तुला पाठविल परतीला
जिथे कुठे तू असशी बाळा आशिर्वच माझे तुजला
अरे, हे काय झाले? असा कसा न सांगता बाळ निघून गेला? नेहमी पत्रव्यवहार करणाऱ्या बाळाने पत्र पण कां पाठविले नाही? सणावाराला पण तो आला नाही म्हणजे काय? हा त्याला घेऊन जाणारा आणि परत पाठवणारा जगन्नियंता म्हणजे कोण? तो पण असा कसा?
नारद: ब्रह्मा, देवा, तूच आईचा जगन्नियंता. तूच सारे नियत करतोस. तुझ्यापाशी तिचा बाळ सुखरूप आहे अशी तिची कल्पना आहे. तूच त्याला वनवासाला धाडले आहेस. चौदा वर्षे झाली आता. पण बाळ अजून परत आला नाही. या कौसल्येचा राम तू परत धाडला नाहीस. पण तो येईल असे तिला वाटते व तसा तिचा आशिर्वाद त्याच्या पाठीशी आहे.
ब्रह्मा: आले नारदा लक्षात. तरीपण मला कां कोण जाणे संध्याकाळ होत आहे असे वाटतच होते. पाहता पाहता सूर्यास्त झाला. मुने, आता कुठे मला त्या पहिल्या दोन ओळींचा अर्थ लागला. वाच आता अंतापर्यंत कविता. अर्थ नको सांगू वाटल्यास.
नारद:
आजवरी ना कधी सांगता कुठेही ना जाशी बाळा
जिथे जिथे तू गेला ते स्थळ नकाशात होते बाळा
त्याच दिशेने औक्षण माझे तवप्रत पोहोचत रे बाळा
आज ज्योत मी निरांजनाची वळवू सांग कुठे बाळा
कुणी सांगती गूढ गवसले, निसर्ग तुज कळला बाळा
कुणी सांगती भूगर्भी तू सत्य शोधतो रे बाळा
कुणी म्हणे आकाशी तू व्याख्यानासी गेला बाळा
कुणी म्हणे टाळ्या श्रोत्यांच्या घनगडगडाट रे बाळा
जिथे कुठे तू असशी, माझी खीर वृथा ना जायाची
लांब शेवई तुला बांधुनी पुन्हा इथे आणायाची
आजवरी ना या समजाला कधी तडा गेला बाळा
माझ्या या विश्वासाखातर तू परतुनि ये रे बाळा
१४ वर्षे झाली बाळा तू वनवासाला गेला
परत राम सुद्धा आला रे, तू कैसा नाही आला?
तुझी दिशांची परिक्रमा तू संपव, स्थिरता येऊ दे
चरवैतीचा वसा तुझा, तू थांब सांगता होऊ दे
मागे वळुनी कधी पाहणे तुज ठाऊक नव्हते बाळा
संथपणा पाण्याला केवळ, खळखळाट नव्हता बाळा
वादळ पुढुनी येता तू ना कधी आड घेई बाळा
मार्ग तुझा तू प्रशस्त केला, झुंजसज्ज तू नित बाळा
बोट, वीत, हाताने का शिखराची उंची मोजावी?
सामान्यांची परिमाणे का प्रत्येकाला मापावी?
तिमाही सहामाही वार्षिक परीक्षा न मोजू शकती
गुण क्रमांक टक्केवारीने का सांगावी तव महती?
दीर्घायुष्य कसे मोजावे दिन महिने वर्षे बाळा,
की कार्याने जे साधाया बुद्धीबळ खपले बाळा?
बौद्धिकवर्षाच्या परिमाणे, शतायू तू झाला बाळा
संशोधन, ग्रंथ, लिखाणाने चिरंजीव तू रे बाळा
खंत वाटली तू जाताना प्रवासास पुढच्या बाळा
उणीव जाणवते सर्वांना लौकिक अर्थाने बाळा
परंतु जाणवते मज आता ते जाणे जाणे नव्हते
अशक्य जाणे मनातुनी, जे खरेखुरे असणे होते
उंची शिखराची, विशालता क्षितिजाची पाहुनि सारे
वरती, पुढती सरती, ओलांडुन आकाशाचे तारे
अढळ उत्तरेचा तो तारा जरी नसे आवाक्यात
त्या ध्येयाने प्रगत पुरस्सर नित्य सहोदर होतात
हाच तुझा वारसा, हेच बा पाळण्यातले रे पाय
इथे चालले, चालवते झाले हे भाग्य कमी काय?
साठाध्यायी बाळविजय हा धीर देउ दे सर्वांना
ज्यांस तुझा पाळणा लाभला, पाय मिळू दे तव त्यांना
ब्र: हं. नारदा, सावर स्वत:ला. जशी जशी कविता पुढे गेली तसा तसा मलाही अंदाज यायला लागला होता की हा बाळ म्हणजे आपल्या वाड्यातलाच बाळ. प्रमोद. प्रमोद सदाशिव मोहरीर. ७५ वर्षे होत आली त्याच्या जन्माला. आज त्याची उणीव भासते सगळ्यांनाच. पण तो कोणा एकाचा का होता? त्याची व्याख्याने हजारोंनी ऐकली. त्याचे शंभरावर लेख हजारोंनी वाचले. त्याच्या पुस्तकांची हजारो पारायणे झाली असतील. हजारो विद्यार्थ्यांना त्याच्या ज्ञानाचा फायदा झाला असेल. त्यांनी आतापर्यंत त्याचा फायदा इतरांना करून दिला असेल. ज्ञानग्रहणाची, ज्ञानदानाची ही मानवी शृंखलाच मानवाची यशगाथा आहे. प्रमोद म्हणजे शुक्लपक्षातला कलेकलेने वाढणारा मानवचंद्रच होता. पोर्णिमा येतायेताच नभी ढग आले हे दुर्दैव.
नारदा, मला तुझ्यासारखी कविता पूर्ण समजत नाही. पण बाळविजयाची शेवटची ओळ मलासुद्धा अंतर्मुख करून गेली. आई म्हणते 'ज्यांस तुझा पाळणा लाभला, पाय मिळू दे तव त्यांना'. मला यात खूपच गहन अर्थ भरला आहे असे जाणवले. पूर्ण कवितेत आईचा भाविकपणा, ईश्वरावरची अगाध श्रद्धा डोकावत असते. तो धागा पूर्ण बाळविजयात विणलेला आहे. पण याच वस्त्राचा दुसरा धागा बाळाची निरीश्वरवादावरची श्रद्धा, विज्ञानप्रेम व बुद्धिप्रामाण्यवादाशी मनोमन निष्ठा हा आहे. आयुष्यभर माझ्यावर विश्वासलेली आई आता म्हातारपणी बाळाकडे कलली की काय असे मला वाटते. आईवडील मुलामुलींवर लहानपणापासूनच स्वत:च्या मूल्यांना पोषक असे संस्कार करतात. आपली मते लादतात. तरीपण आईबाबांच्या अत्यंत ईश्वरनिष्ठ घरी मला न मानणारा निरीश्वरवादी बाळ तयार झाला. त्यांच्या घरातील विचारस्वातंत्र्याचाच हा विजय असावा. बाळाच्या साऱ्या भावाबहिणींनाही त्याचाच पाळणा लाभला. त्याचेच पायही त्यांना लाभो असे आई म्हणते. त्यांचे पाय त्याच मार्गानी जावे ज्या मार्गानी बाळ गेला असेच तिला वाटते. बाळाचा मार्ग विज्ञानाचा. त्यावरच आपल्या इतर मुलामुलींनी सुद्धा जावे असे ती म्हणते. अर्थात बाळाची आईसुद्धा तिच्या संध्याकाळी मी, तू, आपण देव नाही असे समजू लागली आहे असे वाटते. नारदा, मला वाटते की हीच ती सकाळ ज्याची तुला मला सुद्धा अपेक्षा असते. कशाला हवी रे यांना आपल्या कल्पनेची कुबडी? बाळाचे पाय घेऊन विज्ञानमार्गावर ही सारी मानवजात भरधाव धावू दे. सर्व पुरोगामी होवोत हीच म्हातारीची, माझी, तुझी, सर्वांची मनीषा आहे. बाळाचीही होती. तसे झाले तर शेवटी कधीतरी आपणही या कल्पनेच्या जळमटांतून मुक्त होऊ असे मला वाटते.
नारदा, चातुर्मास सुरू होण्याआधी मला हा बाळविजय पुन्हा एकदा सलग ऐकायचा आहे. बाबांसाठी पण एक पाट मांड. रामविजय वाचतांना मांडतात तसा. तेही नक्कीच येतील. तू वाच, मी ऐकतो. पण आता तुझे भाष्य मात्र नको. हळू हळू वाच. मीच मनोमन उजळणी करतो. तसे करतांनाच माझे डोळे मिटावे व चातुर्मास सुरू व्हावा असे मला वाटते. कर सुरू.
नारद: जशी आज्ञा बाबा. ऐका तर अखंड बाळविजय.
चैत्रमासी कृष्णपक्षी माझा कृष्णच आला होता
चैत्रजन्मा ज्येष्ठापत्या! बाबांचा तू रामच होता
रणरणत्या उन्हाने वाडा अनोखा उजळला होता
चौघड्याच्या आवाजाने स्वागताला सज्ज होता ।।१।।
अकरा दिवस कसे गेले सूर्यालाही कळले नाही
बारसे बाराव्या दिवसाला, आनंदाला पार नाही
गोविंदा गोपाळासाठी आजोळाहून ये पाळणा
त्यात दिसले तुझे पाय, माझ्या डोळ्यातही मावेना ।।२।।
टिळवटलेली तुझी पाउले मळवटलेल्या जमिनीवरती
कधी उतरली, कशी ठुमकली, ओसरीतुनी अंगणी आली
माडीवर ती सहजी गेली, पडली, उठली, पहा धावली
तुझी पाउले वाडाभर, स्पर्शाला वंचित जागा नुरली ।।३।।
दिनमपि रजनी सायं प्रात:, वसंत शिशिरे येता जाता
हरिविजया मी पुन: वाचता, वाटे तुझीच तीही गाथा
तुझे बालपण अंगी भिनले, तुझे रूप मी मनी भरविले
तू निजला असताही तव रडणे हसणे मम कानी आले ।।४।।
दोन जीवांची नवमासांची माझी जाणीव जरी पुसटली
बालपणीची सारी वर्षे तुझा जीव मी क्षणक्षण जगली
श्वासोश्वासी तुझीच चाहुल, नजरेआडही तुझीच छाया
धन्य वाटले मला, तृप्त मी, हीच खरी ब्रह्माची माया ।।५।।
वाड्यामध्ये तूच एकटा, तुला न कोणी सवंगडी
मीच सोबती, सखा, सखी खेळायाला पकडापकडी
टिक्करबिल्ला, लपंडाव, नी नदी की पहाडासाठी
मी गेले माझ्या बालपणी बाळा रोज तुझ्यासाठी ।।६।।
लटके माझे रोज हारणे, तुझे जिंकणे नित्याचे
बुद्दु म्हणे मी नित्य स्वत:ला कौतुक करुनी रोज तुझे
पुढे जाउनी, मोठ्ठा होउनि, तूही ते केले बाळा
मला भावले तुझे हारणे, होता तू लेकुरवाळा ।।७।।
शाळेमाजी तू जाता तव प्रगतीला आला वेग
परंतू तुला ना भावे ओनाम्याचा त्यांचा वेग
अआ-क्षज्ञ वा कका-कंक:, अंक नि पाढे मुखोद्गत
शुद्ध नेटके लिहिशी, भिनला दासबोध तव अंगात ।।८।।
शाळेमध्ये विजय पताका अव्वल नंबर पहिलीत
टिक्करबिल्ला जणू खेळिसी, उडी थेट मग तिसरीत
पुढे पुढे तर डंका वाजे, उंच अपेक्षा सर्वांच्या
नवल न कोणा अव्वल येशी बोर्डामध्ये प्रांतात ।।९।।
स्पर्धा साऱ्या तुझा अखाडा, मल्ल न दूजा गावात
चषक शृंखला अव्याहत ये चालुनी तुझिया हातात
निबंध भाषण वादविवादी नुरले कोठे आव्हान
मशाल हाती तुझिया, मागे सहोदरांचीही साथ ।।१०।।
तूच पुढारी, तूच चैत्र, म्हणुनी तू येसी चैत्रात
तूच पायवा, तूच मानकरी यशशिखराचा रे खचित
ग्रहमालेचा तूच गुरू, तू आद्य, ज्येष्ठ, अद्वितीय तू
पाउलवाटा अनुजांना देणारा अग्रज तू तू तू ।।११।।
शाळेतील तुझी यशगाथा नभास नेती आकांक्षा
परंतु पाय तुझे जमिनीवर, विनय परिश्रम मितभाषा
विद्यापीठ महाविद्यालय विज्ञानाचा वारकरी
भौतिकी गणिताचा विद्यार्थी, अगम्य मज, कौतुक भारी ।।१२।।
परीक्षेस तू जाता हाती दही शर्करा देतांना
दारातून वाड्याच्या जाता तुला मागुनी बघतांना
मनी मनोमन जगदंबेला 'उदे गं अंबे' म्हणतांना
तोच पाळणा, तीच पाउले, दिसती पुढती जातांना ।।१३।।
वर्षाकाठी वर्षे गेली, तो दिन सामोरी आला
पराक्रमाला नगर अपूरे, निघसी तू दिग्विजयाला
विज्ञानाने विश्वरूपदर्शन बाळा देता तुजला
डबके सोडुनि बाळा तू सागरविजयासाठी गेला ।।१४।।
सीमोल्लंघन हे दसऱ्याचे असे वाटले मला मनी
येशील तू परतून जिंकुनी, विद्यासुवर्ण घेवोनी
वाड्याचा तू कायापालट बुद्धिबळाने करशील
पाळण्यातले पाय तुझे वामनी पराक्रम करतील ।।१५।।
'नेऊ नको माधवा अक्रूरा' अशी अवस्था रे माझी
माया वेडी आईची, मी थांबवेन का झेप तुझी
घट्ट मनाने, ओठ आवळत निरोप देतांना तुजला
गाडीचा तो धूर जाउनी पाणी आले डोळ्याला ।।१६।।
पश्चिमेस तू आता असशी, चंद्रकोर भाऊबीजेची
निरंजनाची ज्योत शोधते कोजागिरी,
जन्मदिनासी
बहिणी ओवाळिती तुला रे चंद्र बीजेचा तू त्यांचा
ज्येष्ठापत्यनिरंजन येता पूर्णचंद्र रे तू माझा ।।१७।।
जुना काळ तो दूरध्वनीही दूर असे न जसे आता
पत्र तुझे येता घर सारे बंधुभगिनी नी मी ताता
आतुरतेने जवळी येती वार्ता काय असे त्यात
षष्ठादश कर्णांची तृप्ती यशदुंदुभीध्वनि रे येता ।।१८।।
वर्षाकाठी घरास येता तू, येत दिवाळी दसरा
तुझी कथाकथनाची खूबी, नारद तू जणू रे दुसरा
गोडधडाची आवड तुजला पुरणपोळीवर प्रेम तुझे
सात दिसांची घरी दिवाळी, सरती ते येती जैसे ।।१९।।
पुन्हा तोच क्षण, निरोप अवघड, पुन्हा धूर तो गाडीचा
पुन्हा नेत्र पाणावती जाता धूर, पाहता हात तुझा
खीर शेवयांची त्या दिवशी, आस लवकरी भेटीची
तू वैज्ञानिक, मी आई, मज जुनी रीत विश्वासाची ।।२०।।
खीर शेवयांची तुज आणी वर्षी सुटीस वाड्याला
असे बोलता मंदहास्य तव, खळी येतसे गालाला
शास्त्री तू, वैज्ञानिक मोठा, प्रमेयात का बसणार?
विश्वासाची भिंत कुडाची, तिला तडा का जाणार? ।।२१।।
विज्ञानाची विश्वासाची सांगड नित्यच वाड्यात
स्नातक, पारंगत ज्ञान्यांचा हांडा इथेच वाड्यात
निष्ठा भागवती, विज्ञानी निष्ठासागर वाड्यात
नवरात्री रात्रारति होता उभे सर्वजण वाड्यात ।।२२।।
संशोधक तू मोठा सांगे दूरदर्शनाचे बीज
कौतुक सर्वांना त्याचे वाड्यात जरी नव्हती वीज
माजघरी पाळण्यावरी बसुनी तू सांगे सर्वांना
काय तुला पश्चिमेस दिसले, ठिणगी ठरली अनुजांना ।।२३।।
श्रद्धा माझी त्याच्यावर, विज्ञान परी तुजला देव
'तो' मज कर्ता शुभाशुभाचा, भौतिकशास्त्र तुझा देव
राम कृष्ण तू माझा, कौसल्या नि यशोदा तुज देव
परस्पर विरोधाचे साक्षी हारजडित घरचे देव ।।२४।।
द्वैतातच अद्वैत असावे प्रगतीची हीच निशाणी
वादातच संवाद असावा वाड्याची हीच कहाणी
मतमतांतरांचे पंचामृत, सोळाभाज्या लक्ष्मीला
भिन्न स्वाद एकत्र आणतो तोच खरा उंच फुलोरा ।।२५।।
पश्चिम पादाक्रांत करूनी उत्तरमुख यात्रा आता
सह्याद्री आशिर्वच देई निरोप तू त्याचा घेता
सागर सोडुनि गंगातीरी नवविद्याश्रमी तू जासी
निरांजनाची ज्योत शोधते आकाशी अढळ धृवासी ।।२६।।
अढळ तुझी श्रद्धा विज्ञानी, अखंड संशोधन आता
नवी प्रमेये, नव्या पद्धती, नवी मते रुजली आता
अन्यायाची चीड, पुरस्कर्ता सामाजिक न्यायाचा
पैलू पडती नवे नवे तुझिया व्यक्तित्वाला आता ।।२७।।
विद्यार्थ्यांचा नेता तू, निर्भीड प्रखर भाषणे तुझी
प्रभुत्व भाषेवर राणीच्या, सवय जुनी तव वादाची
शाळेतील जुनी शस्त्रात्रे, पांडवप्रकृती नित्य तुझी
सभा जिंकणे, वादरणांची लडी लागली नित्याची ।।२८।।
विसर न पडला तरी तुला बाळा तुझिया रे ध्येयाचा
पंचवार्षिकी होता सादर केला प्रबंध शोधाचा
सागर गंगा पडाव मागे, मरुभूमीला कूच तुझे
प्राध्यापक बाळाचा होता मन आनंदित वाड्याचे ।।२९।।
ज्ञानदान नवअध्यायी, ज्ञानार्जन तव नित साथीला
पाहता पाहता आवडता तू होसी रे विद्यार्थ्यांचा
सत्यकाम सत्याग्रहव्रत तव परी नावडे सत्तेला
तुला तमा नाही, पुनश्च तू निघसी पुढच्या यात्रेला ।।३०।।
सन्निध हरीच्या द्वारी येसी, काय असे योगायोग
हिमशिखरांनी साद घातली, काय असे योगायोग
सह्याद्री ते हिमगिरी यात्रा, काय असे योगायोग
ब्रह्मदेव जाणतो, योजितो तोच सर्व योगायोग ।।३१।।
शास्त्र आमुचे इतुके साधे, खापर ब्रह्माच्या माथी
बरे घडो, न घडो, 'ब्रह्मार्पण' हेच शब्द ओठी येती
तोची लेखक तव नाट्याचा, पंचमुखी दिग्दर्शक तो
रंगमंच तो, पडदा ओढी, पडदा सोडी जो तो तो ।।३२।।
हा प्रवेश तव नाट्याचा संपला कधी कळले नाही
पुन्हा हालला तंबू, दक्षिण दिशा निमंत्रण तुज देई
चतुर्दिशा धुंडाळुन झाल्या, भोवरा जणू पायात
तेच निरांजन, तीच आसनी, तीच भाबड्यांची रीत ।।३३।।
कानडाऊ विठ्ठलभूमी ती मला, तुला शिक्षणसंस्था
वैज्ञानिक, अभियंता भूगर्भाचा तू ज्ञाता आता
नैसर्गिक आपदा घडवितो ब्रह्मा हरिहर आम्हासी
संशोधन तव शोधू पाहे गूढमूळ भूगर्भासी ।।३४।।
कंपन लहरी विश्लेषण तू गणितबद्ध करण्यासाठी
झटशी रात्रंदिन, आम्हाला काय कळावे या काठी
सत्यनदीच्या या काठावर मी, तू पलिकडल्या काठी
दोघांनाही सत्य तेच दृग्गोचर, पूल कशासाठी? ।।३५।।
कौतुक मज तव यशगाथेचे, जरी न समजे ती भाषा
कुठेतरी वाडा तुज अंगी, शिक्षण वाड्याचा पेशा
शिक्षक तू राष्ट्राचा होसी, विपुल लेख, व्याख्यानांची
सुरू मालिका, वाचक श्रोते चहूदिशांनी रे येती ।।३६।।
विठ्ठल-रुकमाई लक्ष्मी-नारायण जोड्या जगतात
मला जाणवे उणीव, नकळे काय माझिया बाळात
नमस्कार एकेरी जाउन आता दोघे जोडीने
पदस्पर्शाला आले आशिर्वच घेण्या आनंदाने ।।३७।।
गंगा आकाशिची मिळाली मंदाकिनी मम ताऱ्यासी
प्रभा उजळता जीवन उजळे, ऊर्जा येत प्रकाशासी
योग असे का आपण घडवू, ते ये केवळ ब्रह्मासी
गाठ बांधली स्वर्गी त्याने, मान वा न तू, मी खासी ।।३८।।
वाड्याने नववधू पाहता तगर मोगरा मोहरले
पुन्हा दुपारी फूल शेंदरी वाऱ्यावरती थरथरले
जाईने घेता मिठीत येतसे चमेलीला लाली
गंध अंगणी दोघींचा, बाळा कण्हेरही दरवळली ।।३९।।
दक्षिण देता अशी दक्षिणा पश्चिम निमंत्रणा आली
विद्यार्थी अध्यापक झाला, सुई पुन्हा जागी आली
सह्याद्री सागर तेच जुने, 'पुनश्च मुंबई बाळोबा'
शब्द येत ओठात सहजची, भ्रमंती थांबव रे बाबा ।।४०।।
पश्चिम उत्तर दक्षिण पश्चिम, वाडा केवळ पूर्वेला
काय तयाचे ब्रह्मलिखित, तू सोडुनि गेला तो गेला
कधीमधी तू येता त्याने क्षण क्षण मनात साठवला
भूक तयाची रवंथ करुनी भागविण्या तोही शिकला ।।४१।।
पुनश्च सुटली पश्चिम, आता पुन्हा उत्तरेची पाळी
लिहिता लिहिता ब्रह्माने या खाडाखोड किती केली
'हे घेऊ का ते घेऊ' की 'दुकान उचलुनि का नेऊ'
तत्सम दुविधा त्यास पडे जणु, हे देऊ का ते देऊ ।।४२।।
परंतु येथे स्थिरावला तू, लग्न भावले पायांना
येथे तपभर का होईना, तू टिकला रे, शांति मना
स्थिरता येता यशकीर्तीला उधाण आले रे बाळा
ख्याती पसरे चहूकडे, हिमशिखरांशी स्पर्धा आता ।।४३।।
राष्ट्र पुरस्कृत करता तुज तव प्रथम पुरस्कारे बाळा
हात जोडले मी जगदीशा, असो भाव माझा भोळा
विज्ञानाचा मुकुटगिरी भटनागर येता शिरी तुझ्या
'मीरा के प्रभु गिरिधर नागर' मनी येतसे रे माझ्या ।।४४।।
अपेक्षा परी मनात वसते तू व्हावे लेकुरवाळा
पुरस्कार तो घरात येता आजी मी झाले बाळा
हरिद्वारी का कोणी वंचित, हीच भावना पोटात
लक्ष्मी आली सरस्वतिनिवासी विचार मम डोक्यात ।।४५।।
समुद्रमंथन विज्ञानाचे सदैव तुझिया डोक्यात
म्हणूनि वाटे लक्ष्मीमागे कौस्तुभ तुझिया पदरात
उत्तर मानवली तुज बाळा, पदरी ये सारे काही
परंतु ऐसे मनात येता दक्षिणेस तू गेलाही ।।४६।।
पश्चिम उतर दक्षिण पश्चिम उत्तर दक्षिण तू फिरता
अनुज तुझे मोठे झाले, विखुरले काळ पुढती जाता
वाडा जैसा जुना पुराणा, आम्हीही तैसे आता
सात जणांची सात घरे अन् घरोघरी बाळे आता ।।४७।।
विवाह मुंजी सणासुदीला सारे येता पूर्वगृही
मन जाई मागे मागे, गतयुगात वावरुनी येई
पुन्हा पाळणा, कपाळी टिळा, तीच पाउले बाळाची
अवतारी तो मला आठवे, तीन पाउले रे त्याची ।।४८।।
विजयपताका नवपीढीच्या, कौतुक त्यांचे सर्वत्र
गंगोत्री तू यशगंगेची, असा असो गुंडा पुत्र
दक्षिणेस तू रुळला वाटे, परंतु रे अघटित झाले
दक्षिण सोडुिन तुझी पाउले पुन्हा नवदिशेसी गेले ।।४९।।
जाता तू ना शब्द बोलला, कुठे जात नाही वदला
पत्र तुझे ना आले, ना तू सणासुदीला रे आला
खात्री मज तो जगन्नियंता तुला पाठविल परतीला
जिथे कुठे तू असशी बाळा आशिर्वच माझे तुजला ।।५०।।
आजवरी ना कधी सांगता कुठेही ना जाशी बाळा
जिथे जिथे तू गेला ते स्थळ नकाशात होते बाळा
त्याच दिशेने औक्षण माझे तवप्रत पोहोचत रे बाळा
आज ज्योत मी निरांजनाची वळवू सांग कुठे बाळा ।।५१।।
कुणी सांगती गूढ गवसले, निसर्ग तुज कळला बाळा
कुणी सांगती भूगर्भी तू सत्य शोधतो रे बाळा
कुणी म्हणे आकाशी तू व्याख्यानासी गेला बाळा
कुणी म्हणे टाळ्या श्रोत्यांच्या घनगडगडाट रे बाळा ।।५२।।
जिथे कुठे तू असशी, माझी खीर वृथा ना जायाची
लांब शेवई तुला बांधुनी पुन्हा इथे आणायाची
आजवरी ना या समजाला कधी तडा गेला बाळा
माझ्या या विश्वासाखातर तू परतुनि ये रे बाळा ।।५३।।
१४ वर्षे झाली बाळा तू वनवासाला गेला
परत राम सुद्धा आला रे, तू कैसा नाही आला?
तुझी दिशांची परिक्रमा तू संपव, स्थिरता येऊ दे
चरवैतीचा वसा तुझा, तू थांब सांगता होऊ दे ।।५४।।
मागे वळुनी कधी पाहणे तुज ठाऊक नव्हते बाळा
संथपणा पाण्याला केवळ, खळखळाट नव्हता बाळा
वादळ पुढुनी येता तू ना कधी आड घेई बाळा
मार्ग तुझा तू प्रशस्त केला, झुंजसज्ज तू नित बाळा ।।५५।।
वीत बोट हाताने का शिखराची उंची मोजावी?
सामान्यांची परिमाणे का प्रत्येकाला मापावी?
तिमाही सहामाही वार्षिक परीक्षा न मोजू शकती
गुण क्रमांक टक्केवारीने का सांगावी तव महती? ।।५६।।
दीर्घायुष्य कसे मोजावे दिन महिने वर्षे बाळा,
की कार्याने जे साधाया बुद्धीबळ खपले बाळा?
बौद्धिकवर्षाच्या परिमाणे, शतायू तू झाला बाळा
संशोधन, ग्रंथ, लिखाणाने चिरंजीव तू रे बाळा ।।५७।।
खंत वाटली तू जाताना प्रवासास पुढच्या बाळा
उणीव जाणवते सर्वांना लौकिक अर्थाने बाळा
परंतु जाणवते मज आता ते जाणे जाणे नव्हते
अशक्य जाणे मनातुनी, जे खरेखुरे असणे होते ।।५८।।
उंची शिखराची, विशालता क्षितिजाची पाहुनि सारे
वरती, पुढती सरती, ओलांडुन आकाशाचे तारे
अढळ उत्तरेचा तो तारा जरी नसे आवाक्यात
त्या ध्येयाने प्रगत पुरस्सर नित्य सहोदर होतात ।।५९।।
हाच तुझा वारसा, हेच बा पाळण्यातले रे पाय
इथे चालले, चालवते झाले हे भाग्य कमी काय?
साठाध्यायी बाळविजय हा धीर देउ दे सर्वांना
ज्यांस तुझा पाळणा लाभला, पाय मिळू दे तव त्यांना ।।६०।।
------------------------------
अरुण सदाशिव मोहरीर
आश्विन पौर्णिमा, कोजागरी
५-१०-२०१७