गोंधळ ब्रह्मा: काय खुडबुड खुडबुड करतोस रे पोरा? आत्ता कुठे डोळ्यांना डोळे लागत होते, तर झाली तुझी खुडबुड सुरू. काय शोधतोस तरी काय? असे काय हरवले तुझे? नारद: हे डोळ्यांना डोळे लागले काय म्हणतोस? डोळ्याला डोळा लागला म्हणतात रे सारे. ब्रह्मा: अरे मी साऱ्यात येत नाही. पसाऱ्यात येतो समज. मी म्हणजे सगळ्या गोष्टींचा पसाराच पसारा. चार चार तोंडं. चार चार नाकं. आठ कान, चार जिभा, आठ ओठ, एकशे अठ्ठावीस दात. आठ डोळे. पसाराच पसारा. तुमच्यासारखं एका डोळ्याला दुसरा डोळा लागून मला झोप येत नाही. चार चार डाव्या डोळ्यांना चार चार उजवे डोळे लागल्याशिवाय झोप येत नाही. म्हणून डोळ्यांना डोळे लागणे म्हटले. तुला मराठी व्याकरण समजते ना? तुला समजत नाही असे नाही. पण वेड पांघरून पेडगावला जायची तुझी सवय. जात असतो तिथे पुन्हा पुन्हा. पण शोधतो काय ते तर सांग. नारद: अगदी मनकवडा आहेस रे ब्रह्मा. अरे खरेच काल पेडगावला गेलो होतो. तुमसर गोंदिया जवळ आहे पेडगाव. तेथे गोंधळ सुरू होता. रमून गेलो त्यात. रात्रभर जागरण झाले. व्वा. मज्जा आली. ब्रह्मा: अरे गोंधळ, जागरण यांनी काय मजा येते? शांत रात्री गाढ झोप...